Thursday, 10 April 2025

माझी डायरी : काही अंश १९८०-८७ - सुरेश सावंत


वाचायला प्रारंभ करण्यापूर्वी एक निवेदन :

१९८० ते १९८७ या काळात माझ्या वयाच्या १५ ते २१ वर्षे या काळात मी दैनंदिनी लिहीत होतो. लिहिताना मध्ये मध्ये नोंद देत गेलो आहे, त्याप्रमाणे यातून माझे तत्कालीन जीवनचरित्र किंवा सामाजिक चळवळीतील सहभाग सुस्पष्ट कळणार नाही. काही संदर्भ किंवा उल्लेख मिळतील. हे लिखाण मूलतः माझ्या भावविश्वाचा, त्यातील आंदोलनांचा आविष्कार आहे. तो स्वतःशीच केलेला संवाद, हितगुज असल्याने त्यात पार्श्वभूमी, स्पष्टीकरणे, कारणमीमांसा तशी नाही. मन मोकळे करण्याची गरज म्हणून हे लिखाण मी करत होतो. तथापि, उद्या डायरीच्या या वह्या दुसऱ्या कोणाच्या हाती लागल्या तर ज्या तपशीलांमुळे माझ्या मित्रांना, संबंधितांना त्रास होऊ शकेल किंवा आवडणार नाही, असे तपशील लिहिण्याचे मी टाळले आहे. तरीही काही तपशील आले आहेतच. माझ्याबद्दलही लिहिताना मी नावे घेतली आहेत, काही प्रसंगांची नोंद दिली आहे, काहींच्या जीवनातील माझ्या हस्तक्षेपाची वर्णने केली आहेत. या बाबी ज्यांची नावे घेतली आहेत, त्यांना त्या उघड होणे आता नको असेल. माझ्या बाबतीतल्याही काही घटनांचे तपशील आता अनावश्यक आहेत. लेखासारखं सगळं सुसंगत नसल्याने चुकीचा अर्थही त्यातून त्रयस्थाला वाचताना लागू शकतो.

एके ठिकाणी ‘यानंतर आयुष्याची जेमतेम ३० वर्षे मिळतील असे गृहीत धरल्याचा’ उल्लेख वयाच्या २० व्या वर्षी मी केला आहे. ती पूर्ण होऊन आणखी १० वर्षे झाली आहेत. आता माझी साठी पूर्ण झाली. तब्येतीचा काही मुद्दा नाही. पण माणूस मर्त्य आहेच. तो कधी जाईल हे त्याच्या हातात नाही. आतापर्यंत सांभाळलेल्या डायरीच्या वह्या अजून पुढे कुठवर सांभाळत राहायच्या हा प्रश्न आहेच. म्हणून आपल्या हयातीतच त्यातील निरुपद्रवी भाग ठेवून बाकी सर्व नष्ट करावा, असे मी ठरवले. नको असलेल्या भागावर काट मारण्याचा प्रयत्न केला. पण तो निरर्थक ठरला. त्याने काही साध्य होईलसे दिसेना. शेवटी हवा तो भाग टाईप करुन तो सॉफ्ट कॉपीच्या स्वरुपात ठेवावा, या निर्णयाला आलो. ही सॉफ्ट कॉपी ब्लॉगवर ठेवता येईल. पीडीएफ करुन ठेवता येईल किंवा प्रिंट करता येईल. जेव्हा मला आपले तत्कालीन भावविश्व पुन्हा वाचावे असे वाटेल तेव्हा वाचता येण्याची ही सोपी सोय असेल. अजून माझ्याशिवाय कोणालाही न दाखवलेल्या या डायरीतल्या नोंदी संभाव्य उपद्रवी व अनावश्यक भाग वगळल्याने माझ्यात रस असणाऱ्या जवळच्या मित्रमंडळींनाही वाचायला देता येईल.

हा टाईप केलेला भाग संपादित नाही. त्या लिखाणाचे नवे शब्दांकन नाही. जे आहे तसेच घेतले आहे. कोणतेही शब्द बदलण्याची, नव्याने रचना करण्याची तशी गरज लागली नाही. क्वचितच एखादा शब्द आता वेगळा अर्थ व्यक्त करेल असे वाटले, तिथे तो गाळला किंवा बदलला. काही ठिकाणच्या संवादात, ते संवाद आहेत, हे कळावे म्हणून अवरतण चिन्हे घातली आहेत. पण हे अगदीच नगण्य. (अधिक स्पष्टतेसाठी कंसात काही ठिकाणी नावे, संदर्भांच्या नोंदी केल्या आहेत.) ज्यांना माझ्याविषयी बोलताना संबोधणे गरजेचे आहे, पण त्यांची त्या संदर्भावेळी नावे नकोत अशांचे उल्लेख ‘मित्र’, ‘ती’ असे केलेत. शाळा, डी. एड. व नोकरी या तीन टप्प्यांत ही डायरी आहे. त्या टप्प्यांच्या आधी संदर्भ चौकट कळावी म्हणून काही विवेचन केले आहे.
____________________

माझं १ ली ते ७ वी पर्यंतचं शिक्षण चेंबूर स्टेशनजवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत झालं. १९७१ ते १९७८ दरम्यान. महानगरपालिकेची शाळा ७ वी पर्यंतच असल्याने सगळ्यांनाच पुढच्या शिक्षणासाठी आसपासच्या खाजगी माध्यमिक शाळांत जावे लागे. माझ्या बरोबरचे बहुतेक सगळे वर्गमित्र मुक्तानंद हायस्कूल, आमची शाळा, सरस्वती विद्यामंदिर इ. जवळच्या शाळांत गेले. मीच एकट्याने वेगळा निर्णय घेतला. सगळ्यांपासून अलग एकटाच थोड्या दूरच्या चेंबूर हायस्कूलला गेलो. १९७८ ते १९८१ या काळात ८ वी ते १० वी तिथे शिकलो. दैनंदिनी लिहायला सुरुवात केली ती इथेच नववीला असताना. १ जानेवारी १९८० रोजी.

____________________

१ जानेवारी १९८०

रजनीच्या निशांत प्रांगणी विहरणाऱ्या सुधाकराच्या सुधावर्षावात न्हाऊन निघत किती एकरुप होत होतो मी! दूरच्या अंधुक धूसरतेत काहीतरी शोधत होती नजर. झोपडपट्टीवर, त्या शेजारच्या रस्त्यावर दूर.

झोपडपट्टी – आज पंधरा वर्षे जिच्या अंगाखांद्यावर खेळून वाढलो. त्याच एका झोपडीत जन्म ते आजपावेतो वास्तव्य. पुष्कळ काहीसं भोगलंय, अनुभवलंय. वेगळं. इतरांपेक्षा खासच वेगळं. जगाचं वेगळं दृश्य याच प्रेक्षागृहातून पाहिलं. त्याची जाणीव माझे पांढरपेशीकरण होऊ देणार नाही, याची खात्री वाटते.

१८ जानेवारी १९८०

आंबेडकर गार्डनला वळसा घालताना मी फारच मोहरुन गेलो. सोनेरी कोवळं ऊन शरीराला पुलकित करत होतं, तसंच मनालाही सुखद गोंजारणं लाभत होतं. सूर्यप्रकाशात कारंज्याचं रुप न्याहाळावं हीच इच्छा त्यावेळेस होती. फार दिवसांनी मी अशावेळेस बाहेर पडलो. या मुंबईत सुद्धा काही ठिकाणी संध्या उपभोगता येते हा नवा प्रत्यय आला. थोडं नंतर चुटपुटल्यासारखं झालं ते यामुळेच की कारंजे मी भोगलं नाही. कारंजं पाहिलं. असं घडण्यास कारण झालं. पाध्ये-जोशीचं (माझे चेंबूर हायस्कूलमधील वर्गमित्र) अनपेक्षित रस्त्यात भेटणं. त्यांच्या गप्पा काही और होत्या. आमच्या वर्गात बहुतेक मुलांत ही गोष्ट रुढ झाली आहे की ‘प्रेम’ म्हणजे नालायकपणा. गलिच्छ शब्द. कुठली मुलगा-मुलगी एकमेकांशी थोड्या मित्रत्वाने वागू लागली की ती त्याची लव्हरच असली पाहिजे अशी ठाम समजूत. यांच्यात बाह्यज्ञानाची फार कमतरता असल्याचं जाणवू लागलंय. हे सारेच पांढरपेशी आहेत. पालक शिक्षित वर्गातले असणारच. मग हे असे का?

आंबेडकर गार्डनच्या डाव्या बाजूच्या रस्त्यावर एक म्हातारं जोडपं अंधारात झाडाखाली बसलं होतं. म्हातारा आंधळा होता. पेटी वाजवत गुणगुणतही होता. मी वळताना काहीसा अडखळलोच. ते लोक गाणे म्हणून पैसे मागणारे होते हे त्यांच्यापुढे ठेवलेल्या वाटीवरून सहज लक्षात येण्यासारखं होतं. मी थांबलोच शेवटी. तिथे फक्त दोघे पांढरपेशी मद्रासी होते. पण तेही आपल्या गप्पांत तल्लीन. त्यांना याची जाणीव नसणार हे मला निश्चित वाटलं.

आपल्या समाजाच्या भेदक स्थितीची पुन्हा एकवार हृदय पिळवटणारी जाणीव झाली. अंतरी नाना तरंग उठले. विचारांचे काहूर माजले. माट्यांचं ‘उपेक्षितांचं अंतरंग’ आठवलं. त्यातील ती कथा ‘हास्याचा शोध’. त्यातील शब्द फेर धरुन माझ्याभोवती नाचू लागले. कारण माट्यांच्या त्या भावना, प्रश्न सारेच माझ्याशी त्याबाबतीत अगदी मिळते जुळते होते. रस्त्यावरील, दारावरील भिकाऱ्यांना पाहून मला जे लहानपणापासून वाटत होतं अगदी तेच, नेमकं तेच; फक्त माट्यांच्या शब्दांत एवढंच. माझ्या मनाचं प्रतीकच जणू. पण मी नंतर मनावर या बाबतीत संयम मिळवित चाललो. कारण नाईलाज आहे आपला यास, याची खात्री पटली. असहाय्यतेची जाणीव झाली. काहूर उठलं मनात तरी दुसऱ्या गोष्टीत लगेच गुंतवून स्वतःला ते विसरण्याचा प्रयत्न करत असतो. शिवाय ते शक्यही होत चाललंय. पण दीन भिकाऱ्याच्या नजरेला नजर भिडविण्याचं धैर्य अजून काही येत नाही. पण काही वेळा या अशा येतात अन् मग त्यांत पूर्ण डुंबायला होतं. त्याच्या भूत-भविष्यकाळाच्या कल्पना नकळत मनात वास करतात नि मग त्या काहुरात काही वेळ मी तसाच हिंदोळत राहतो.

तात्पर्य, या भावनांनी माझ्याभोवती मंडल धरुन कान बधीर करणारे चित्कार करण्यास सुरुवात केली. पण त्यामुळेच माझ्यात ‘अस्मितेचे मूळ’ पक्के असल्याच्या खात्रीस पुष्टी मिळाली.

त्या दोन मद्राश्यांचा मला राग काही आला नाही. पण अशा समाजाची पुन्हा तीव्र जाणीव झाली व हळहळ वाटली.

त्या म्हाताऱ्याचा हात थांबला होता. बहुधा त्याने जाणलं की ऐकण्यास कुणीच नाही म्हणून. त्याच्या निराश तोंडावरील रेषारेषांची स्पष्ट प्रचिती येऊ लागली अंधार होता तरी. आता निश्चितच आपण त्यात गुरफटू या जाणीवेने मागे सरलो. खिसे चाचपले. २० पैसे होते. एका निश्चयानेच मी दोन पाच-पाच पैश्यांची नाणी हातात घेऊन पुढे झालो. भांड्यात डोकावलं. रिकामं होतं ते. मी पैसे त्यात टाकले. तो आवाज एक समाधानाची झलक घेऊन माझ्या शरीरभर पसरला. मी चटकन मागे फिरलो. म्हाताऱ्याची बोटं पेटीवर पडली असावीत. कारण हळूच त्यातून सूर निघत होते. एक आगळं समाधान चाटून गेलं. एकाची अपेक्षा वाढवण्यास आपण कारणीभूत ठरलो. पेरुवाल्याकडे पेरु घ्यावासा वाटला. पण २० पैश्यांच्या वर किंमती पाहून मागे फिरलो. पण कुठचाही न्यूनगंड नव्हता. धुंदीतच मी घरी पोहोचलो.

१९ जानेवारी १९८०

आज तिने (केशव मेश्रामांचे) ‘हकिकत आणि जटायू’ परत केलं; पण तेही एका स्तुत्य अभिप्रायासह. ‘महाबंडल’ पुस्तक म्हणून. अगत्याने सुंदर पुस्तक म्हणून ते लायब्ररीतून मिळवलं होतं. शिवाय अर्धवट सोडून काल हिला दिलं होतं. कारण असे आग्रह, मागण्या माझ्यासारख्या ‘सौंदर्यप्रेमी’ माणसाकडून मोडले जाणे शक्य नव्हतं. सध्या तिच्यामुळेच मी अडीच वर्षांनंतर सामाजिक-कौटुंबिक कादंबऱ्या वाचू लागलोय. खांडेकर, नाथमाधव पालथे घालतोय. तिच्याकडून ही पुस्तके मिळतात म्हणून. २II वर्षांपूर्वी मला या प्रेमी जगताच्या ‘बाबा कदमां’ सारख्यांच्या कादंबऱ्यांचा विलक्षण नाद होता. वाचताना स्वतःत हरवून जायचो. निरनिराळी मृगजळी स्वप्ने पाहायची सवयच मला जडली होती त्यावेळी. त्यानंतर जरी मी अलिप्त झालो, तरी निसर्गप्रेम, सौंदर्यप्रेम व संवेदनशीलता वाढतच राहिली. प्रेमविषयक तत्त्वज्ञान पहिल्यापेक्षा जास्त व्यवहारी व समंजस झाले आहे. या मधल्या कालावधीत मला सामाजिक संवेदनांत पुष्कळ गम्य वाटू लागलं. त्या प्रकारच्या कथा-कादंबऱ्या विशेष खिळवून ठेवू लागल्या.

समाज-उद्रेकाचे ज्वलंत धडे आजूबाजूला रोज नव्याने मिळत आहेत. ‘वेदना’ समजू तसेच उमटूही लागली आहे. त्यामुळे पहिल्या पांढरपेशी कादंबऱ्यांतील जीवनाची या जीवनाशी नकळत तुलना करत होतं मन. नवं खासच श्रेष्ठ आहे पहिल्यापेक्षा याची स्पष्ट प्रचिती मन घेऊ लागलं. त्याबरोबरच तात्त्विक, समाज-संशोधनपर, गंभीर आशयाची पुस्तकेही प्रिय वाटू लागली.

धार्मिक चर्चेची पुस्तके, लेख माझ्या आवडीशी अगदी अविभाज्य आहेत. त्यामुळे अशीच पुस्तके मी नेहमी लायब्ररीतून घेतो. तिला मात्र ही पुस्तके पाहिली की भोवळ येते. तिच्या अभिरुचीच्या विरुद्ध मी घेतलेली ही पुस्तके तिला आवडत नाहीत. म्हणून ती पुस्तके माझ्याकडे मागतच नाही. मी मात्र तिच्याकडून मनमुराद पुस्तके मिळवून विशेष रसिकतेअभावी पण निश्चित वाचून काढतो. तिच्याकडून पुस्तके घ्यायचे सोडत नाही. ती आता एक मला सवयच होऊन गेली आहे. तिने एकदा माझ्याकडचे पुस्तक पाहून ‘राजा-राणीचं आहे?’ अशी पृच्छाही केली. हे तिचं वक्तव्य ‘मुस्कानछायी नजर से’ असलं तरी थोडा राग आलाच; पण क्षणात मावळला. कारण तिच्या ठायी या अभिरुचीचा सध्यातरी अभाव आहे या तात्काळ झालेल्या जाणीवेने. त्यामुळे ‘तशी अभिरुची हवी ना! त्याविना कसं समजेल त्यात काय भरलंय ते’ असं प्रत्युत्तर दिलं.

त्यानंतर घरी पुस्तक उघडलं अन् जो खिळलो तो मग पुरताच. जेवतानाही खाली ठेवलं नाही.

त्या ‘हकिकतीने’ मनात एक नवं तुफान निर्माण केलं. नव्या जाणिवा जाणवू लागल्या. ते जीवन आपल्या वाटेस येऊन आपण निभवावं अशी तीव्र साहसी इच्छा अजून मनात रेंगाळत आहे. नवे निश्चय करावे, नवं जाणावं, नवं-नवं शोधत राहावं...असं पदोपदी मन क्रंदू लागलंय. पण आपल्या परिस्थितीची जाणीव झाली की तो नायक नशीबवान वाटू लागतोय. आपण भोगू शकत नाही ते. ते अनुभव सध्यातरी मिळवू शकत नाही याची फार मोठी खिन्नता वाटतेय. पण नव्या निश्चयांसाठी मात्र मनाने फार मोठी जागा करुन दिली आहे. त्यांचा भरणा करतोय. बाजू-बाजूंनी न्याहाळीत. पारखीत.

२३ जानेवारी १९८०

धाकट्या भावाची आज सहल होती. सकाळी त्याला पोहोचवायला गाडीवर गेलो होतो. मीही त्याच शाळेत पहिली ते सातवीपर्यंतची वर्षे काढलीयत. काही पूज्य, संस्मरणीय, अविस्मरणीय, प्रेमळ आठवणींचं गाठोडं मात्र शाळेपासून दूर होताना घेतलं होतं. आताही आहे. शेवटपर्यंत राहणार आहे. ‘शाळा’ म्हणून जीवन जगलो ते तिथंच. कसं हसत, खेळत अगदी मजेत ती वर्षे गेली. त्या दिवसांत माझ्यात होत गेलेली परिवर्तनं. जिवश्चकंठश्च मित्रांचा अतृप्त सहवास. ४ थी ते ७ वी. किती मोहक, लोभसवाणी वर्षे होती ती! माझ्या बालपणीची सुखाची घागर ओसंडून वाहत होती त्यावेळेस.

इयत्ता तिसरी. नापास झाल्याने दुसरं वर्ष. साऱ्या उनाड, घाणेरड्या सवयी सोडावयास लावल्या त्या याच वर्षाने. त्या अगोदर लहान वयात विड्या ओढणे, तंबाखू खाणे, ट्रेनमधून विदाऊट फिरणे असले प्रकार मी राजरोस केले. परिणाम - तिसरीच्या वर्षाला मुकावं लागलं. त्यानंतर माझ्यात आमूलाग्र बदल झाला.

तो दिवस पूर्णपणे आठवतोय. शाळा नुकतीच सुरु झाली होती. मी ‘तिसरी’तून ‘तिसरी’त प्रवेशलो होतो. कामुलकर बाईंनी मला उभं केलं. ‘देवाचे घर’ पहिली कविता पाठ आहे का विचारलं. पाठ केव्हा करायला सांगितली होती याची मला आठवण देखील नव्हती. मी ‘नाही’ म्हणून खालीमानेने सांगितलं. इतर मुलांप्रमाणे मलादेखील शिक्षा म्हणून छडी मिळेलसं वाटलं. पण झालं वेगळंच. बाईंनी अगदी ममतेने शब्द उच्चारले, “सुरेश, कविता पाठ करावयासच हवी. पुन्हा असं करु नकोस. उद्या येशील पाठ करुन?” झालं. त्या शब्दांनीच एक वेगळी संवेदना शरीरात चमकून गेली. हलकं-हलकं वाटू लागलं. शाळेबद्दलचं, वर्गाबद्दलचं अन् शिक्षकांबाबतचं सारं भीतीयुक्त ओझं तात्काळ खाली उतरलं. अन् एक वेगळंच वातावरण माझ्याभोवती तयार झालं. सहजतेने मी ‘हो’ म्हणून खाली बसलो. नि माझ्यात पहिल्या परिवर्तनाची नांदी झाली.

तो पूर्ण दिवस एकाग्र चित्ताने कविता पाठ केली. अन् दुसऱ्या दिवशी म्हणूनही दाखविली. बाईँकडून पहिली शाबासकी मिळाली. मी पूर्णपणे बदललो. मित्रांची सोबत सोडून दिली. त्या ‘लीला’ही माझ्या साहजिकच बंद झाल्या. नव्या उमेदीने मी अभ्यासास वाहून घेतले; नव्हे मी त्यात वाहून गेलोच. मी अन् पुस्तक एकमेकांचे मित्र. जिवाचे जिवलग. त्या प्रेमळ बाईंकडून मी मनोमन विद्याग्रहण करुन वेळोवेळी शाबासक्या मिळवल्या.

माझ्याकडून ‘नापास’ होण्याचा वचपा काढला गेला. माझा पहिला नंबर आला. ८० टक्के मार्क्स मिळाले. हे सारं अगदी नकळत झालं. मी अपेक्षा केलीच नव्हती कधी अशी. अभ्यास खेळ समजून सहजगत्या करायचा. नंतर मात्र चौथीची पायरी चढल्यावर नवा जोम चढला. सुरुवातीला एक शिक्षक होते. त्यामुळे काहीसा मी नर्व्हस झालो. बाईंची आठवण वारंवार येऊन दुःख व्हायचं. विठ्ठल नि मी बाईंच्या सतत भेटी घेऊन तुम्हीच आमच्या वर्गावर या असा आग्रह धरला. बाईंनी आमच्यासाठी काहीतरी केलेच. त्या शिक्षकांची बदली होऊन आम्हाला जाड्याशा, सुंदर चेहऱ्याच्या, खेळकर मनोवृत्तीच्या मोघे बाई आल्या. त्यांच्या सुरुवातीच्या हजेरीत मी दोन-तीन दिवस गैरहजर होतो. वर्गात गेल्यावर ‘हाच तो सुरेश का?’ म्हणून विठ्ठलकडे माझी पृच्छा केली. माझ्याकडे बघून त्यांनी निर्मळ, प्रेमळ स्मित केलं. मला हायसं वाटलं. नंतर प्रत्येक दिवस मजेत जाऊ लागला. पहिल्या बाईंची उणीव नाहीशी करुन अधिकच मला त्यांनी दिलं.

माझ्या वाचनाच्या आवडीत त्या मला अधिक प्रोत्साहन देऊ लागल्या. मला समजावू व मार्गदर्शन करु लागल्या. जिव्हाळ्याने एखादी गोष्ट पटवून देऊ लागल्या. (सिनेमाला जायचे आहे सांगितले की शाळेतून लवकरही सोडत. पारंपरिक दंडक त्यांनी पाळले नाहीत.)

२५ जानेवारी १९८०

आज प्रकाशच्या शाळेत त्यांच्या मुख्याध्यापकांनी एक परिसंवाद आयोजित केला होता. नाचाचे वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम सुरुवातीला झाले.

मी गेलो तेव्हा कामुलकर बाईंनी सस्मित स्वागत केलं ‘सुरेश, ये ये’ असं म्हणून. किती बरं वाटलं! तिसरीला एकच वर्ष या बाई होत्या तरी किती प्रेम मिळालं! आपल्या हृदयात त्यांच्याबद्दल कायम आदरभावना राहिली. त्यावेळच्या बाई आणि आताच्या बाई पुष्कळ फरक झालाय. आता सारे दात पडलेयत. म्हातारपणाची अवकळा शरीरभर पसरलीय. पण ते पावित्र्य अजून जसंच्या तसं आहे.

फार आपलेपणा वाटला बाईंच्या त्या शब्दांत. कारण त्यांनी मला आडनावाने कधीच हाक मारली नव्हती. अन् आताही तसंच केलं होतं. आडनावाने आपणास एखाद्याने हाक मारावी, बोलावं फार परकेपणाचं वाटतं.

एकाएकी त्या तिसरीतल्या आठवणी भिरभिरत येऊ लागल्या. बाईंहून उंचीने लहान असतावेळच्या. शेवटी परतताना बाईंना येतो म्हटलं. बाईंनी त्याच स्मितावाटे मला निरोप दिला. आणि एका धुंदीत निघालो.

२७ जानेवारी १९८०

आताच मित्रांना मुक्तानंद हायस्कूलच्या माथेरान सहलीस पोहोचवून आलो.

आता अतिशय चुटपुटायला होतंय. याच शाळेत गेलो असतो तर फार बरं झालं असतं. बव्हंशी आपल्याकडील (वस्तीतली) मुलं. इतर (सुभाष नगर) कॉलनीत राहणारी असली तरी मिळून-मिसळून राहणारी. तफावत अशी नाहीच. त्यामुळे सारं आपलंसं वाटतं. प्रत्येक बाबतीत आपलेपणा वाटतो.

मी वेगळेपणासाठी (महानगरपालिकेच्या शाळेतील सातवीनंतर) ‘चेंबूर हायस्कूल’ गाठलं. काही चव यात नाही वाटत. सारं उदास वाटतंय. इथल्या मुलांचे स्वभाव, सहवास नकोसा झालाय.

आठवी ‘ग’ मधून (पहिल्या चाचणीला उत्तम मार्कं मिळाल्यामुळे) ‘अ’ मध्ये ट्रान्सफर केलं तेव्हा तर माझा अगदीच मूड ऑफ झाला. अभ्यासात, कशातच मन लागेना. शाळेची ओढच नाहीशी झाली. ...उणीवेची खोल दरी निर्माण झाली. इथलं हे सारं आणि आपण परस्पर भिन्न टोकांचे. वर्गातही अतिशय कोंडल्यासारखे वाटते. गळ्यात एक जोखडच पडल्यासारखं वाटतंय. कशीतरी निघू देत दोन वर्षे म्हणून जुलुमाने मनाला रेटत नेतोय. प्रोत्साहनाचे शब्द, प्रेमळ, ममतेने भरलेले, आपल्या परिस्थितीबद्दल सज्ञ (जाण) असलेले असे इथे मिळणे शक्य झाले नाही. सुरुवातीस पंडित सरांमुळे माझी आशा पालवली होती. पण तेही आता आपल्या निकट नाहीयेत. (आधीच्या शाळेतले) सारे आठवले की की अगदी सुन्न वाटतं. त्याबरोबरच रखरखीत ओसाड, उदास वातावरणाची चीड येते. कारागृहातील कैद्याचे दुःख काही अंशी जाणू लागलो आहे. ते दिवस आता कधीच येणार नाहीत, याची खात्री पटल्याने ते एक गोड स्वप्न समजून दूर करण्याचा प्रयत्न करतोय.

२२ जून १९८०

आताच रचना साहित्य मंडळाच्या मिटिंगवरुन परतलो. आज संस्थेची घटना तयार झाली अन् कार्यकारिणीची नेमणूक होऊन मंडळाला स्थिरता प्राप्त झाली.

मंडळाची मुख्य प्रेरणा म्हणजे अवधूत वाघ. अनिल विद्वांस, देवेंद्र देवस्थळे, माधव मोंडकर यांच्या सहकार्याने या प्रेरणेस चालना मिळाली. आतापर्यंत या मंडळाने दोन काव्यस्पर्धा आयोजित केल्या. दुसरीचे संयोजन बबननेच केले. मला साहित्यक्षेत्रात ओढण्याचा प्रयत्न बबनचाच. त्यामुळेच मला सुरुवातीस ‘मुक्तछंद’ म्हणजे काय हे समजले.

आणि आज त्यानेच मला या मिटिंगला नेले. अन् मी मला हरवूनच बसलो. माझी ही अशी पहिलीच वेळ. त्यामुळे सुरुवातीस काहीसा नवखेपणा वाटला. पण नंतर मीही त्यातलाच एक झालो.

२३ जून १९८०

आज अतिशय दुःखद घटना घडली. ती म्हणजे सध्याच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी यांचे अपघाती निधन. आज सकाळी साडेआठ वाजता विमान पडून हा अपघात झाला.

आयुष्यच माणसाचं मुळी असं आहे. कोण सव्वा शतक जगतो. तर कुणी जन्मतःच मरते. घराचे आपल्या बाललीलांनी नंदनवन बनवणाऱ्या ३-४ वर्षांच्या बालकाने अचानक निघून जाऊन घराचे स्मशान बनवणे ही फार मोठी शोकांतिका आहे. ते मूल जन्मालाच नसतं आलं तर फार बरे झाले असते, असे मातेला वाटले तर त्यात नवल ते काय?

काही मुले अतिशय बुद्धिमान असतात. भविष्यात ती फार थोर होतील अशी शाश्वती वाटू लागते अन् अचानक ती नियतीच्या जबड्यात नाहीशी होतात. यातून काही वाचतात. ती मग न्यूटन, गॅलिलिओ, आंबेडकर वगैरे बनतात व जग त्यांना आळवू लागते.

हे जीवनच असे सुखदुःखाचे चढउतार असलेले आहे. माणूस जन्माला येतो. लहानपणी आईवडील पालन करतात. नंतर तो मोठा होऊन स्वतःच्या पायावर उभा राहतो. लग्न होते. मुले होतात. त्यांना तो पोसतो. ती मोठी होतात...पुन्हा तसेच...

अखेर यात नाविन्य ते काय? वयात आलेल्या मुलाला प्रथमच एखादी मैत्रिण मिळते. तिच्या सहवासात युगानुयुगे राहावेसे वाटते. पण काही वेळाने त्यांना विलग व्हावेच लागते. नोकरी लागल्यानंतर रोज काम करायचे. पगार घ्यायचा. बायका-पोरांसाठी खर्च करायचा. आठवड्याला पिक्चर पाहायचा. मधल्या काळातल्या आजार, कर्ज, नाना भानगडी त्रासत, चिडत पार पाडत राहायच्या. नवीन उद्भवतच असतात. अन् त्या अपरिहार्य असतात.

संसारच केला नाही तर काय होईल? फक्त शरीरोपभोगासाठी बायको अन् संसार करायचा. ती बंधने पाळायची. कशासाठी? याहून वेगळे जीवन जगता नाही का येणार? या जगरहाटीचा भयंकर संताप येतोय. मन कुढत राहतंय. काहीतरी नवीन असावं. वेगळं वळण मिळावं, असं वाटू लागलंय.

१ ऑगस्ट १९८०

काल रात्री १०.२५ ला आमचा स्वरसम्राट हरवला. आता सकाळी क्लासला जाण्यापूर्वी रमेश-गौतमची वाट बघत बसलो होतो. बाहेर पावसाने थैमान घातले होते. आकाश काळ्या ढगांनी व्यापले होते. वातावरणच एकूण मला जगापासून अलिप्त करणारं होतं. त्यावेळी ‘मुकेश के फिल्मी नग्मे’ व ‘फिल्मी गजले’ ही पुस्तके चाळत होतो. त्याचवेळी गौतम व संजय आले. गौतम म्हणाला, “अरे, काय वाचतोयस ते? तो तर गेला.” मी संभ्रमित झालो. अंती समजले की सुप्रसिद्ध फिल्मी पार्श्वगायक मुहम्मद रफी हृदयविकाराच्या झटक्याने गेले. हे त्यांनी रेडिओवर ऐकले होते. ही घटनाही मला जगाविषयी, जीवनाविषयी अधिक अंतर्मुख होण्यास कारणीभूत झाली.

मुकेश, लता, रफी हे त्रिकूट आमच्या ‘दर्दाचे’ बोलते आविष्कार होते. त्यातला एक रसिकांच्या हृदयावर अढळ स्थान मिळवून गेला आणि हा आता दुसरा तारा निखळला. आता या आवाजाचे नवीन आविष्कार आज संपुष्टात आले.

काल बाईंनी म्हणजे आमच्या मुख्याध्यापिका नागले बाईंनी माझ्या निबंधावरुन अनुमान बांधले की हा पुढे लेखक होणार. बघूया पुढे. नाहीतरी मी येणाऱ्या आयुष्यातल्या कलाटणी चित्रपट पाहावा इतक्या किंबहुना जास्त उत्सुकतेने पाहणार आहे.

आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे. शाळेत स्पीकरवर किंवा हॉलमध्ये कार्यक्रम करुन थोडंफार त्यांच्यावर नेहमीचे ठरलेले बडबडतील. पुन्हा सारं जसंच्या तसं. कोण मरो, कोण जगो. जगाचा व्यवहार आपला चालू. ना वेगाने. ना हळू. नेहमी त्याच गतीत नियतीच्या वेगात.

आताही आकाश काळवंडलेले आहे. मनही असंच विषण्णतेने भरलंय. शाळेत जावं की पिक्चरला जावं हे द्वंद्व संपलंय इतक्यात. पण पडसाद उठतच आहेत. पिक्चरला जायचा निर्णय घेतलाय. ‘सहकार’ला आजपासून ‘दो बदन’ हा मनोजकुमार-आशा पारेखचा पिक्चर सुरु झालाय. मनोज म्हणजे मुकेश असणार. आणि मुकेश म्हणजे माझ्यातला अविभाज्य घटक. त्यात विलीन होण्यास तळमळ चालून आहे मनाची. अन् ती शांत करण्यासाठी मी जाणार आहे. अभ्यास, शाळा, जग, बंधनं सारे काही काळ बाजूस ठेवून. नेहमीप्रमाणे.

९ ऑगस्ट १९८०

आज शनिवार. परीक्षा म्हणजे चाचणी काल संपुष्टात आली. आता ‘पूरब और पश्चिम’ पाहून आलो. मुकेशला पडद्यावर बऱ्याच दिवसांनी ऐकला. ‘दो बदन’ मध्ये मुकेशची गाणी असतील असा माझा अंदाज होता. तो चुकला. रफीची गाणी होती. पण तीही दर्दीलीच.

पेपर लिहिताना मी गोंधळ फार करतो. हे आता जाणवले न् त्यामुळे नाहक मार्कं जाताहेत. गेल्या दोन वर्षांत असं माझ्या मनात आलंच नव्हतं. सरळ बाईंनी पेपर वाटले की दप्तरात कोंबायचे. मला मार्कांचे काहीएक सुखदुःख नव्हते. पास झालं की पुरे. पण हल्ली क्लासला जातो. त्यामुळे गणित समजू लागलंय. त्यामुळे गणिताच्या पेपरला यावेळी डोक्यात जरा कमी प्रमाणात किडे वळवळले.

भौतिक, रसायन, जीव – कशासाठी हे कोणास ठाऊक? मला तर अक्षरशः महिरुन जायला होतंय. ती सूत्रे, वायू वगैरे ‘मुकेश’ रेडिओवर सुरु झाला की अक्षरशः भोवती थयथयाट करणारी भुते वाटतात. लक्षात ठेवणं फार कठीण जातंय. त्यातच घरात अभ्यास करणे म्हणजे फार अवघड.

वर्गातल्या प्रत्येकाच्या घरी निदान विजेचे दिवे निश्चित आहेत. माझ्याकडे ते नाहीत. त्यात विशेष नाही. पण इथे शांतता अशी दिवसाची बिल्कुल नसते. एवढीशी खोली. तीत राहणारी १०-१२ लोकं. कसं जमणार! शिवाय कुणीच शिकलेले नाहीय, अभ्यास करणे म्हणजे काय हे समजण्यापुरतंही. घरच्यांच्या आणि बाहेरुन आलेल्यांच्या गप्पागोष्टी अखंड चालतात. अन् मी सुन्न होऊन अभ्यासाचे पुस्तक डोळ्यासमोर धरुन मनाने कुठेतरी दूर गेलेलो असतो. अभ्यास होत नाही म्हणून घोर संताप येतो. त्यात पुढच्या ध्येयासाठी मन आसुसलेले आहे. त्यामुळे अधिकच त्रागा. यातून कसं करावं, काय करावं? …विचारांनी डोके गंजून जातंय.

मला वेगळं मन मिळालंय असं वाटतं. कारण माझे इतर बांधव आहेत. तेही कष्ट करताहेत. दुःख भोगताहेत. लग्न करताहेत. वर्षभर इकडे मुंबईत राहून एकदा कधीतरी गावी जाताहेत. त्यांना कसा जीवनाचा कंटाळा येत नाही?

अन् आपणास मात्र एवढ्या तेवढ्याशा गोष्टींवरुन जीवनाची पुढील परिणती घोळ माजवताना दिसते. असे का? मला का नाही हे सारं सहन करत जगावसं वाटत इतरांसारखं?

२१ ऑगस्ट १९८०

सव्वाबाराची वेळ होती. शाळेत जात होतो. पाऊस रिमझिमत होता. काही वेळातच थांबण्याचं चिन्ह दिसत होतं. त्यामुळे मी छत्री न नेण्याचा निश्चय केला होता. आला पाऊस तर जाऊ भिजत!

पावसाच्या प्रतिरोधार्थ मी काहीशी मान खाली घालून रस्ता पार करत होतो तेवढ्यात कोणीतरी हाक मारली – “सुरेश!”

मी थांबलो आणि मागे वळलो. चटकन ओळखलं. ती आमच्या वर्गात सहावीत होती. नंतर तिने शाळा सोडली. आता तिने पातळ घातलं होतं. अकाली आलेले प्रौढत्व चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. पण पूर्वीचे तेच मनमोकळं हास्य तिच्या चेहऱ्यावर आताही ओसंडत होतं. किती निरागस निष्पाप होतं ते!

“आता कितवीला आहेस तू?” तिने विचारले.

“मी आता दहावीला आहे.”

“तू दहावीला आहेस?” काहीसा आश्चर्यमिश्रित स्वर.

“हो.” मी म्हटले.

“तू आता शाळा सोडलीस ना?” माहीत असतानाही काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.

“कधीच! माझं लग्नही झालं.”

“लग्न!” - ते झालेलं असणार हे मी आधीच जाणलं होतं. तरी आश्चर्याच्या सुरात उद्गारलो.

“नवरा कामाला आहे ना?” मी पुढे विचारलं.

“तर!” – ती.

“कुठे असतेस आता?”

“कोल्हापूरला. आता इकडे मी एकटीच आले. आम्ही तिकडेच असतो.”

बोलत असताना पुष्कळ विचारांनी मनात थैमान घातलं. त्यावेळेस ती किती निरागस बालिका दिसत होती. पण अल्पवयात लग्न झाल्यामुळे प्रौढ झाली होती. सर्वसामान्य मुलींची हीच स्थिती असते. आता हिच्या त्यावेळच्या मैत्रिणी भेटल्या असतील कोणी कोणी. काय विचारलं असेल त्यांनी हिला? मलाही पुष्कळ वेळा त्या रस्त्यात दिसतात. पण कोणीच बोलत नाही. एखादं चोरटं स्मित चेहऱ्यावर पसरतं. अन् कधी कधी मैत्रिणीच्या कानात काहीतरी कुजबुजणे. बस्स. याउपर काही नाही. फार फार वाटतं त्यांनी थांबावं. बोलावं. त्यावेळच्या आठवणी काढाव्यात. मग मीही माझं मन मोकळं करीन. भूतकाळात काही क्षण चिंब होईन. पण छे..! कुणीच तसं करत नाही. पण आता हिने कशी मला दिलखुलासपणे हाक मारली! बोलतेय किती सहज शब्दांत! बहिणीने भावाशी बोलत राहावं तद्वत. छे..! आपण त्या बाबतीत अभागी आहोत.

सहावीत असताना सुनंदाने मला भाऊ मानले होते. मीही त्यावेळेस आनंदात होतो. ती फार मोकळेपणाने बोलत राहायची. घरातलं मोकळेपणाने सारं काही सांगायची. पण आपणाकडच्या एखाद्या मोठ्या माणसाला पाहिलं की मात्र माझ्यापासून बाजूला दूर उभी राहायची. का म्हणून तिला विचारलं असता म्हणायची, “त्यांच्या नजरा चांगल्या नसतात रे. ती माणसे वाटेल तो गैरसमज करून घेतात. घरी सांगतील की ही त्या एका मुलाशी बोलत होती म्हणून.” एक दिवस ती रस्त्यात समोरून तिच्या आई-वडिलांसह गेली. पण बोलली नाही. नंतर तिने हेच कारण सांगितलं की आई-वडीलही तसेच कर्मठ आहेत.

ती नापास झाली आणि मी वर्गात पहिला आलो. तिचा हा रिझल्ट ऐकून मी बधीर झालो. अत्यंत दुःख झाले. मी सुन्न स्थितीत काही वेळ होतो. बाई सांगत होत्या – “तुझा ‘आई तुला शोधू कुठे?’ हा निबंध केंद्रावर गाजला. तिथल्या एका बाईंनी शंका विचारली की तुला आई आहे ना रे?” बाईंना पेढे आणून दिले. पण कशातच स्वारस्य वाटत नव्हतं. उदासपणेच घरी आलो.

मी सुट्टीत गावी आलो आणि ती बडोद्याला तिच्या मामाकडे गेली. मी चौकशी करतच होतो ती कधी येते याची. तिच्या घरची सर्व मंडळी आली. पण ती नव्हती त्यात. मी बेचैन होतो. त्यावेळी तिच्या भावाने जवळ येऊन एक चिठ्ठी दिली. म्हणाला, “ताईने ही चिठ्ठी गुपचूप तुला द्यायला सांगितली होती.” मी अत्यंत उत्सुकतेने चिट्ठी खोलली.

प्रिय भाऊ सुरेश यास,

आपली बहीण सुनंदाचा आशीर्वाद.

मी नापास झाल्यामुळे वडिलांनी मला इथेच शाळेत घालायचे ठरवले आहे. तरी आता आपली भेट एक-दोन वर्षे होणार नाही.

तुझी बहीण,

सुनंदा

…साऱ्याच अंधारलेल्या दिशा जवळ येऊ लागल्या.

आठवीला चेंबूर हायस्कूल मध्ये आलो. तिथे छाया शिंदे नावाची एक मुलगी आमच्या वर्गात होती. रक्षाबंधनापूर्वी दोन दिवस आधी तिने आपल्या मैत्रिणीकडून मला विचारलं, “तुला बहीण नाही ना सावंत?” मी “का” विचारलं असता तिने “राखी बांधली तर चालेल काय?” असं विचारलं. तेव्हाही त्या पूर्वीच्या भावना उचंबळून आल्या. तिने राखी नंतर मला आणून दिली. मी मोठ्या दिमाखाने ती रक्षाबंधनच्या दिवशी घालून मिरवलो. मला फार आनंद वाटत होता. एका मानलेल्या बहिणीकडून आलेली ती पहिली राखी होती. पण नंतर हुशार विद्यार्थी म्हणून तिला, मला व नेत्राला ‘अ’ मध्ये घातले गेले. जेमतेम महिना झाला आणि ती शाळेतच आली नाही. अन् मीही चौकशी केली नाही. तिचं कदाचित लग्न झालं असेल. तिने शाळा सोडली त्यानंतर आजपावेतो ती मला कुठे दिसली नाही.

त्यानंतर साऱ्याच रखरखीत वाळवंटात आज हे ओअॅसिस दिसलं. फार फार बोलावेसे वाटत होते. पण शाळेची वेळ आधीच झाली होती. “चलतो” म्हणून चालू लागलो. तिच्या निरागस डोळ्यांतून माझ्यासाठी शुभेच्छा प्रकट झाली. ती म्हणाली –

“अभ्यास व्यवस्थित कर हं.”

मी पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिले. भगिनी प्रेमाची तहान पुन्हा एकदा लागली. पण नेहमीप्रमाणेच ती दाबली व त्या धुंद मन:स्थितीत कैदखान्याकडे चालू लागलो.

२५ ऑगस्ट १९८०

आज पौर्णिमा. नुसतीच नाही तर श्रावण, नारळी पौर्णिमा. ढगांत लपंडाव खेळतोय सध्या चंद्रमा. त्याच्याबरोबर धावत सुटावसं वाटतं. ढगांतून लपतछपत. पण कुणासाठी? ..छे! उगीच मी शंका घेतली. पूर्वस्मृती आहेत ना! माझ्यासाठी त्याच तर आहेत. पूर्वी ‘पूर्णचंद्र’ पाहून मी मोहक कल्पनेत गुंतलो होतो.

‘दाराआडुनि खुणावे निशापति तो चंद्रमा

कशास सांगू, भास कुणाचा मज हा गमला’

पण आता स्मृतींच्या दूरात जाण्यात सुद्धा और मजा नाही का?

१२ सप्टेंबर १९८०

ही रात्रीची एवढी ओढ मला का लागते? मध्यरात्रीचं फार फार चालावंसं वाटतं. पूर्वीपासूनच हे होतंय मला. त्या सातवीतल्या भन्नाटल्या स्थितीत या मध्यरात्रीच्या रस्त्यांवरची भटकंती माझी त्या रस्त्यांनाच ठाऊक. माझं या वेळेशी एक अतूट नातं जुळून गेलंय. आयुष्यभर अशीच ओढ राहील का रात्रीविषयी?

गावी खळ्यात कितीतरी वेळ बसायचो मी. अमावस्येचा पूर्णांधळा अंधार. त्यात चिवारीची खसखस. पानांची अस्पष्ट हालचाल. दूर एखाद्याच्या घरातील मिणमिणत्या बत्तीच्या प्रकाशवलयांत घोंगावून जाणं काही और आहे.

शुक्ल पक्षात उजळत जाणाऱ्या चंद्राच्या कोरींचे निरीक्षण किती आगळं! समोरील गुरांच्या वाड्याआड नाहीशी होणारी ती चंद्रकोर. किती चुटपूट लागून राहायची ती! नंतर प्रकाशमान चंद्राच्या चंदेरी रसात वितळणारं निसर्गरुप किती बहारदार!

अंधाऱ्या आकाशात तारकांशी केलेला संवाद, फणसाच्या पानांतून जमिनीवर झिरपणाऱ्या चंद्रप्रकाशाशी केलेले भाष्य. उगवत्या पिवळसर चंद्राला सामोरं जाणं. सुख? माझं मलाच ठाऊक. एका पुऱ्या रात्रीचा आस्वाद लुटायला मिळाला होता. चंद्र उगवल्यापासून अस्तास जाऊन रवीचे साम्राज्य सुरु होईपर्यंत. रानातले, अवकाशातले बदल न्याहाळत.

६ ऑक्टोबर १९८०

एक-दीड वर्षांपूर्वी मी लिहिलं होतं ती स्थिती मी आता अनुभवतो आहे. मी लिहिलं होतं ते असं –

‘एकूण ऋतुचक्रात काही वेळा, दिवस, क्षण असे येतात की, माझे मन एका वेगळ्याच विश्वात भराऱ्या मारू लागतं. गतकाळातील पूर्वसंवेदनांनी मन तसेच शरीरही बधीर, सुन्न होतं. पूर्वघटनांतील विशिष्ट वेळी असलेली विशिष्ट मनःस्थिती त्याच जाणीवेने परिपूर्ण होऊन जाणवू लागते व ते सारं नव्याने मन भोगू लागतं. काही वेळातच एक हुरहूर हृदयात निर्माण होते. काहीतरी अनाम सलू लागतं आणि मग अनामिक, दुसऱ्यास न सांगता येण्यासारख्या यातनांनी हृदय तळमळू लागतं. यातना आतल्या आत कढत, विव्हळू लागतात आणि त्या – या साऱ्यास कारणीभूत असणाऱ्या गोष्टींच्या - अग्रणीस हृदय पुकारु लागतं. दुर्मीळ, असाध्य, समाज संकेतांचा अडसर, या साऱ्यांस काही क्षण ते विसरते. भोवतालच्या अभिप्रेत वातावरणाच्या कणाकणात संचारुन विलीन होतं. शरीराचा अणू-रेणू उसळू लागतो. या वातावरणाशी एकरूप अवस्थेत दीर्घकाळ राहण्यासाठी उत्स्फूर्त होतो. अशा स्थितीतून - शरीराच्या, मनाच्या तसेच पर्यावरणाच्या - एक आगळं, सुरेल संगीत निर्माण होतं. त्यावर दूर निर्मनुष्य, अनामिक बेटावर मन भ्रमू लागतं. अंतर्मुखतेच्या मनोतडागी असंख्य सुखद लहरी पैदा होतात.’

८ नोव्हेंबर १९८०

..अखेर हे सारं करुन माणूस मिळवितो काय? तो जगतो तरी कशाला? एखाद्या शतकाचा घटक म्हणून राहायलाच ना! मला यात काहीच तथ्य वाटत नाही. कुष्ठरोगी भिकाऱ्याच्या, घाणीतून अन्न निवडणाऱ्यांच्या वेदनेचा मी अंश होऊ इच्छितो.

११ नोव्हेंबर १९८०

आईबद्दल मला कसेसेच होते. तिला फार त्रास पडतो. ती आजारी, अशक्त आहे. काम पेलत नाही. घरातल्या भांडणांमध्ये सारवासारव करुन शांतता ठेवण्याचा प्रयत्न करते. कधी कधी मग कपाळावर हात मारुन घेते आणि म्हणते – ‘मेल्या कर्माला कधी सुख नाही.’ बाबाही तिला लागेल असं बोलतात. तेही आता किती थकलेत! खोकतात तेव्हा माझा जीव कासावीस होतो. खोकून कुठेही थुंकतात. कधी माझ्या अंगावर उडते. मी ‘जरा बघून थुंका’ म्हणतो. आतल्या आत कुढतो. ते सकाळी लवकर उठतात. आईला उठवतात. आई चपात्या करते. बाबा चहा आधीच करतात. मग दूधही आणतात. प्रकाशला उठवून त्याच्या अंघोळीची व्यवस्था करतात. मग मला उठवतात. नंतर ते कामाला जातात. सकाळच्या गर्दीतून ते कसे जात असतील याचं मला आश्चर्यमिश्रित दुःखच फार होतं. मी जर आता नोकरीस असतो, तर यांना एवढा त्रास झाला नसता.

२० नोव्हेंबर १९८०

अखेर हे काय आहे तेच कळत नाही. मी काय समजतोय स्वतःला? माझ्या संयमाला? सगळंच निखळून पडतंय.

रात्री भयानक स्वप्न पडलं. कितीतरी जीवघेणं अपराधीत्व अनुभवलं.

तिला नकार कळवल्यावर होणारा परिणाम काय असेल?

तदनंतर मी गावी गेल्यावर माझ्यातील बदल.

मघाशी चंद्र पाहिला. दोन दिवसांवर पौर्णिमा आलेय वाटतं. मेघांच्या पार्श्वभूमीवर तांबूस कडे भोवताली असलेला.

घरात फार भयंकर मनस्ताप.

खोल, प्रचंड, कभिन्न अंधारखाई...!

२७ नोव्हेंबर १९८०

छे! सगळी पिसाट आकांक्षेची भुतं!

____________________

दहावी मी ७७ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो. आमच्या वस्तीत आतापर्यंत एस.एस.सी.ला इतके गुण मिळविणारा मी पहिलाच. शिवाय ‘प्रागतिक विद्यार्थी संघ’ म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अभ्यास आणि इतर उपक्रम केले, त्यामुळे आमच्या वस्तीत एकाच वेळी एस.एस.सी. उत्तीर्ण होणाऱ्यांची मोठी संख्याही पहिलीच. दोन ठिकाणी आमचे सत्कार झाले. माझा वडिलांच्या कामाच्या ठिकाणी नायगावच्या कोहिनूर मिलमध्येही सत्कार झाला. उत्तम गुणांमुळे कोणत्याही शाखेत व कॉलेजला प्रवेश मिळत होता. होस्टेल, स्कॉलरशिप मिळत होती. पण परिस्थिती आणि मनःस्थिती यांच्या वावटळीत सापडलो होतो. ११ वीला दिवसाच्या कॉलेजला घेतलेला प्रवेश रद्द करुन रात्र कॉलेजला घेतला. त्यानंतरचा हा भाग -

____________________

३१ जुलै १९८१

माझं मलाच आश्चर्य वाटलं. अखेर माझी मानसिक अवस्था ‘आत्महत्ये’विषयी उदात्त आहे का? मनाचा हा नवीन पडदा मला दिसत होता. मी गोंधळून गेलो.

‘आशाभंगाइतकं मोठं दुःख जगात दुसरं नाही.’ ‘ययाती’मधील खांडेकरांचे हे वाक्य किती भिडलं हृदयाला! माझा फार मोठा आशाभंग झाला होता. संपून जाण्याचे किती भयानक विचार मनात येत होते. या विचारांमुळेच का मी आत्महत्येचा समर्थक झालो? मीही पुढे कधीतरी याच मार्गाचा अवलंब करण्यास प्रवृत्त होईन का?

सध्या तरी मी ती जाणीव उल्लंघून गेलो. पुढेही जमेल का असेच? शक्यता वाटतेय. अखेर मी मागे म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची मानसिक अवस्था, घटना भिन्न असते. तद्वत ही माझी मानसिक अवस्था आहे.

एक समाधान लाभलं. मी आत्मशोध करु लागलो. बुद्धांने सांगितलंय प्रथम ‘स्व’ला ओळखा. मी त्या मार्गाने चाललोय. पण अखेर हा शोध घेत घेत आपण कुठे जाणार? कसे होणार? मृत्यू अखेर असणार हे निश्चित. मृत्यूला मी घाबरतोय का? नाही. तसं वाटत नाही. त्याची अटळता मनात पूर्णपणे बिंबली गेली आहे.

७ ऑगस्ट १९८१

बेचैनी…बेचैनी…उद्वेग आलाय अगदी! काही सुचत नाही. वाचावसं वाटत नाही. लिहायला सुचत नाही. ...अभ्यासही नाही. अखेर माझं होणाराहे काय? घरचे म्हणतायेत तुझं काही शिकायचं चिन्ह दिसत नाही. काय करतोयस या वर्षी काही समजत नाही.

हो. खरंय त्यांचं म्हणणं. मला शिकावंसंच वाटत नाही. मग काय करावसं वाटतं?

काय करावसं वाटतं? - किती दचकलो मी या प्रश्नाने! अंतर्मनातून कुणी विचारलं मला हे? उत्तर काय देऊ?

अरे, गप्प का? बोल ना! करणाराहेस काय? अव्याहत वाचन करणाराहेस? लिखाण करणाराहेस? स्मृतींच्या वादळात घोंगावणार आहेस? की संपून जाणाराहेस? बोल… बोल…

चहुकडून प्रश्नांचे निनादकल्लोळ. असह्य होतंय. मेंदूत ज्वालामुखीचा उद्रेक होतोय. कवटी छिन्न होऊ पाहतेय. कोण विचारतंय हे प्रश्न? उत्तर देणे अपरिहार्य आहे का? नाही दिलं तर…?

स्मृतींनी अंतर पिळवटून निघावं आणि भराभर कागदावर उतरावं. हे तर होतच नाही. जळजळणाऱ्या आठवणी मात्र फेर धरत असतात भोवताली. संवेदना बधीर व्हाव्यात नि मी वाचनात स्वतःला विसरून जावं. पण हेही होत नाही. संवेदनांची कुचंबणा झालीय.

हे मी लिहितोय नि विहाराच्या खिडकीवर एक चिंब कावळा कावकाव करतोय? काय उद्देश आहे त्याचा? फार वेळ झाला. तरी त्याची कावकाव थांबत नाहीये. किती सुखी आहे तो!

प्रत्येक पक्षी किती सुखी आहे? ना शिक्षण. ना नोकरी. नाही निसर्गाशी प्रतारणा. मुक्तपणे भटकावं. खावं. जीवनाचा आस्वाद लुटावा. एके दिवशी निघून जावं. भेदभाव, बेकारी, क्रांती, राजकारण काही काही नाही त्यांच्या जगात. ...आणि आम्ही मानव?

‘अजगर करै न चाकरी, पंछी करै न काम। दास मलुका कह गए सब के दाता राम’

पण मला हे पटतंय का? नाही. मानवाला काम करणे अपरिहार्य आहे ..आणि मला? मलाही. पण कसलं…?

…अरे कावळा उडून गेला! नि मी –

१२ ऑगस्ट १९८१

…पण आषाढ्यातल्या सरी कितीही मुसळधार असल्या तरी कातळाला कधी चिरा जातात का? अखेर बिचाऱ्या सरीच थंडावतात. पण तो मात्र कोरडा ठणठणीत!

१८ ऑगस्ट १९८१

तेच प्रवेशद्वार. तेच आवार. तीच इमारत. सर्व काही तेच. पण ते दिवस –

केव्हाच गेले अशारीर जखमा देऊन!

सर्व काही नश्वर असतं ना! पण हा कालावधीत फरक का? ही इमारत, हे आवार ज्याअर्थी निर्मिलं गेलंय त्याअर्थी नष्ट पावणार. पण त्याला जवळचा कालावधी नाही. पण शरदातल्या चांदण्यासम स्वप्ने फुलवणारे ते दिवस कधीच गेले. चटका लावून. शरदात दिवसाला रात्र गिळंकृत करते व शुभ्र चांदणे सृष्टीतख्तावर विराजमान होते. पण काही कालावधीतच, निशा दिवसाला जन्म देते. स्वप्नमयी दुनियेचा अंत होतो व रटाळ व्यवहारी जिणं सुरु होतं.

यावेळी हळहळ वाटते. पण आशा असते - रात्र काही कालावधीनंतर होणारच आहे. शरद चांदणे अवतरणार आहे. नि माझ्या आयुष्यात–

का ही तुलना करतोय मी? स्वतःचे उणे का काढतोय मी? आशा ठेवली की हे परिणाम होतात. तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे. खरं आहे हे. अगदी खरं.

पण आशा ठेवली नाही तर हा व्यवहारी जीवनाचा मार्ग कसा काटणार? नि आशांचे हे उद्ध्वस्त अवशेष तरी किती जपणार?

पण सध्या आशेच्या बहरासाठी नावीन्याचा मोसमच नाही. मी स्वतःला दडवू पाहत आहे.

आयुष्य म्हणजे भेटायचं. निरोप घ्यायचं. दरम्यान बोलायचं. बस्स! एवढंच!

२३ ऑगस्ट १९८१

…आणि मी त्यावेळी कुठे असेन? अनिश्चित भविष्याच्या भोवऱ्यात. गरगरत. स्वतःच्या इच्छेविरुद्ध. अपरिहार्य म्हणून. स्वप्नांची मृगजळं नाकारावीशी वाटतात. शुष्कपणे वर्तमानाशी जुळवत. भूतकाळ आपला म्हणत. भविष्याची फिकीर न करत चालत राहायचं.

२४ ऑगस्ट १९८१

वाटलं होतं हे वर्ष मानसिक यातनाविरहित काढेन. पण तसं होईल याची शक्यता नाही वाटत. जाऊ दे. तडफड! तडफड! आयुष्यभर तडफड!

२५ ऑगस्ट १९८१

…बोटे किती सुंदर! पाची बोटांची नखे वाढलेली. तिच्या शेजारी बसलो असताना हळूच हात हातात घेऊन म्हटलं होतं – “काय गं ही नखं!” नि एक हळूच चिमटीत धरुन दाबलं. ती चित्कारली. हात हिसकावून म्हणाली – “दाबू नको रे!”

त्या स्मृतिस्तव मीही नख वाढवलं होतं. पण गेलं ते! माझं म्हणून काही राहतच नाही. माझ्या मालकीचा फक्त माझा भूतकाळ. त्या कटू-गोड आठवणी व माझे संवेदनशील मन. या माझ्या म्हणण्याजोग्या वस्तू.

२७ ऑगस्ट १९८१

काल काही मित्रांसोबत भुजंगकडे गेलो होतो. आम्ही बोलत बोलत वरळी सी-फेसवर जाऊन बसलो. बऱ्याच वेळाने उठलो. लाटांच्या फेसाळत्या गाजेत तल्लीन होण्याचा प्रयत्न केला. पण पूर्वीइतकी तल्लीनता लागली नाही. आठवणींचे जहरी डंख सुद्धा हृदयात खुपसले गेले नाहीत. आताही तसंच वाटतंय. कदाचित ही बधीरता असावी. कारण कुठेतरी तुंबल्यासारखं वाटतंय.

आज दिवसभर ‘उमरखय्यामची फिर्याद’ हे श्री. के. क्षीरसागर यांचं वाङ्मयीन टीकेचं पुस्तक वाचत होतो. छान पुस्तक आहे. प्रीत, शरीरनिरपेक्ष आकर्षण इत्यादिंचं विश्लेषण चांगलं केलंय. प्रथमच रवींद्रनाथांच्या काव्याच्या ओळी दिल्यात. त्या अशा: love came, and went, leaving an open door and will not come again. रवींद्रनाथ वाचला पाहिजे असं तीव्र जाणवू लागलंय. वाचायचं पुष्कळ आहे. पण हवं ते जवळपास उपलब्ध नाहीये. मिळेल ते वाचतोय.

२८ ऑगस्ट १९८१

आज वर्गात शिक्षक शिकवत असताना मी मागे खांडेकरांची ‘पांढरे ढग’ वाचत होतो. तसा प्रयत्न करत होतो. ती असंच वाचन करायची. भन्नाट वाचायची. समोरच्या शिकवण्याची तिला फिकीर नसायची.

आता मला अनेक पुस्तकं मिळताहेत. पूर्वीसारखं तिला मी पुस्तके देऊ शकत नाही सध्या. तिलाही तिच्या कॉलेजच्या लायब्ररीमधून शिवाय इतर कुठून मिळतच असतील पुस्तके.

२९ ऑगस्ट १९८१

‘इस रात की तनहाई में आवाज न दो’ …मुकेश के दर्दभरी स्वर दुरून कुठून तरी ऐकू येत आहेत. आधीच व्याकुळ असलेल्या हृदयाला पिळवटून काढताहेत.

३० ऑगस्ट १९८१

दुपारी भुजंग व त्याचे दोन मित्र आले. दीपक जाधव हा इथेच शेल कॉलनीत राहतो आणि दुसरा शशिकांत वायदंडे. दोघेही गझल - गीतांचे वेडे. गातात छान. मग आमची मस्त मैफिल रंगली. चेंबूर हायस्कूलच्या मैदानात. एका झाडाखाली आम्ही बसलो. मुकेशची गीते व गुलाम अलीच्या गजला दीपक जाधवने पेश केल्या. आलाप, आवाज, दर्द खास आहे त्याच्या आवाजात.

१ सप्टेंबर १९८१

लोकलच्या डब्यातून बाहेर पडलो लोंढ्यासरशी. समोर दिसलं - एक म्हातारा, हाडांचा सापळा झालेला, भिकारी असावा. धक्क्याने पडल्यासारखा पालथा पडला होता. त्याची पॅन्ट कमरेखाली बरीच सरकली होती. त्याचं गाठोडं बाजूला पडलं होतं. एका माणसाने त्याच्या नाकाजवळ सूत धरून पाहिलं. निकाल - तो मेला असावा. माणसांचा लोंढा पुढे पुढे सरकत होता. मीही त्यांच्याबरोबर हताश होऊन चाललो होतो.

त्याचे कुणी नातेवाईक असतील का? असले तरी त्यांना याची बातमी लागेल का? की हा बेवारशी आहे? अखेर त्या प्रेताचं काय करतील? कुणीच नाही आलं, तर त्याचे अंत्यसंस्कार कसे उरकले जातील? कोण त्याच्यासाठी आसवं ढाळील?

अशा तऱ्हेने त्याच्या मरणामागचं कारण काय? या स्थितीचं प्रयोजन काय?

तो भिकारी होता.

का झाला भिकारी? गरीब होता म्हणून? गरिबी कशी येते? बापाच्या गरीबीमुळे? न शिकल्याने? का नाही शिकला तो? कर्तृत्वाच्या अभावी?

या रस्त्याने गाडीतून हिंडणाऱ्या, ऐषारामात जगणाऱ्या, गुबगुबीत अगडबंब देहाचे ओझे सांभाळत जाणाऱ्या श्रीमंत व्यक्ती कर्तृत्ववान आहेत का?

१६ सप्टेंबर १९८१

बरेच दिवस झाले मला मी भेटलोच नाही.

का बरे भेटला नाहीस? काय विशेष कारण?

विशेष तसं काहीच नाही.

अरे यार कुछ प्रयोजन तो जरूर होगा ना?

नाही रे तसं काहीच नाही. उगीच आपला गुंतत गेलो होतो.

बरं मग काय केलंस एवढ्या दिवसांत?

अशीच बातमी लागली बीएमसीमध्ये क्लार्कच्या अप्रेंटिसशिपसाठी फॉर्म मिळत आहेत. एसएससी ला ६५ टक्के गुणांची अट होती. माझे तर ७७% होते. बाकी सगळ्या अटींत मी बसत होतो. पण वयात गेलो रे! अठरा वर्षांची अट होती आणि मला तर सोळा वर्षे ८ महिने पूर्ण. दिला फॉर्म एकाला नंतर. बसलो चूप.

१७ सप्टेंबर १९८१

काल चेंबूर स्टेशन मध्ये रात्री आम्ही बसलो होतो. काही भिकारी, असेच कोणी घरदार नसलेले झोपले होते. कोणी झोपत होते. थोड्या वेळाने आम्ही आलो तेव्हा पोलीस त्यांना उठवत होते. बिचाऱ्यांना उठावंच लागलं. हाय रे देशा! कुठे यांना थारा? ‘काश्मीर ते कन्याकुमारी भारत एक है’. ‘सुजलाम, सुफलाम…सस्य श्यामला मातरम’ काय वचनं आहेत!

जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत जीव जगवताना काय यातना होत असतील रे यांना? ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ त्यांना अशा वेळेस समजावून सांगितले तर काय वाटेल?

…कविता, कथा करणं किती चांगलं असतं काँक्रीटच्या चार भिंतीत! टेबल लॅम्पच्या उजेडात विद्रोही शब्द रेखाटून संमेलनात ज्वलंत समस्येवर विद्रोही शब्दांत कविता म्हणायची. दुःख, दारिद्र्य, व्यवस्था यावर झोड उठवायची. मंच सोडल्यावर कशी झाली कविता म्हणून प्रश्न विचारायचा. चहापान घ्यायचं आणि घरी जाऊन सकाळच्या वर्तमानपत्राची वाट पाहत झोपायचं; विषय मिळावा एखाद्या ‘बेलछी’चा म्हणून. (१९७७ ला बिहारमधील बेलछी इथे उच्चवर्णीय जमिनदारांनी दलितांचे सामूहिक शिरकाण केल्याची वेदना-संताप आमच्या वातावरणात होता.)

अरे अशी का करता प्रतारणा? रणात उतरा. पेटवा साऱ्या झुंडशाह्या. टाटा-बिर्लाच्या संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करा. दोनदा का होईना प्रत्येकाला जेवण मिळावं. या उंच गढ्या खाली खेचा. पुरे झाली आता अहिंसा. उपसा शस्त्रे म्यानातून. वाहूद्यात रक्ताचे पाट. आप्तांचे वाहिले तरी चालतील. पण वाहून जाऊ द्या त्यातून सर्व काही. जातिभेद. बेकारी. श्रीमंती.

१९ सप्टेंबर १९८१

लिहावं कशासाठी?

अंतःकरणात साचत नाही म्हणून?

न साचण्याइतपत घडतंय काय?

उगीच आपलं नेहमीचं रटाळ गाणं! ...आता तर उदास मळभ दाटलेलं वाळवंटच भोवतालची. ना झरा कुठे, ना मृगजळाचा आभास. अशात लिहायचं तरी काय? विषय तर केव्हाचा संपलाय. परिशिष्टे पुरे आता.

१० ऑक्टोबर १९८१

सामाजिक घटना माझ्या आयुष्यात वारंवार घडतात. मला एक झळाळी देऊन जातात. पण त्यांचा उल्लेख मी फार अल्प प्रमाणात करतो असं मला वाटतं. पण त्यास माझा नाईलाज आहे. लिहावंसं वाटत नाही ते माझ्या हातून कसं लिहिलं जाईल? पण मग लिहावसंच का वाटत नाही…?

हा प्रश्न उभा राहिला की मी गुंत्यात अडकतो. समर्पक उत्तर, खुलासा माझ्याजवळ नाही. पण पुन्हा पुन्हा विचार करून एवढं निश्चित जाणवलंय की अशा घटनांचा उल्लेख करणं म्हणजे ‘आत्मस्तुतीचा’ दोष आपल्यात निर्माण होणार. नि हे लिहून मला त्यातून वाचून काही सुख मिळतं असंही नाही. त्याचा संबंध समाजाशी. समाजाच्या मनावर ते प्रतिबिंब उमटतं. ते समाजातलं आपलं रुप वेगळं असतं. समाज ते जतन करतो. माझं दुसरं रुप आहे ते फक्त माझ्यासाठी. याच जाणिवेतून कदाचित हा पक्षपात होत असावा.

३१ ऑक्टोबर १९८१

मित्र म्हणतो – “शील, नीती या संकल्पना कोणाच्या? माणसाच्याच ना? सुरेश, तू हे बोलतोयस हे फक्त पुस्तकातलं. सध्याच्या जगात असं काही बोलणं, वागणं वेडगळपणा समजला जातो. यानंतरचा जमाना असा येणार आहे. तेव्हा सध्या जे कुठे पावित्र्य, शील टिकून आहे ते सारं संपुष्टात येणार आहे. कोण कोणाला ओळखणार नाही. म्हणून बोलणं सोपं असतं. बुद्ध, आंबेडकर यांचा जमाना वेगळा होता. आताच्या काळात तसं कोणी होणं अशक्य आहे. म्हणून आपण जगतोय तर सर्व सुखं उपभोगायची का वंचना करायची? यार सुरेश, तुझे भी एक दिन इसी रास्ते से जाना होगा.”

या मित्राच्या आयुष्याविषयी काही लिहायचं मी आवर्जून टाळतो. पुढे कधीही मी त्याच्या आधीच अचेतन झालो आणि हे लिखाण उजेडात आले, तर त्याच्याविषयीचे उल्लेख त्याच्या स्वरूपावर बराच झोत टाकतील आणि असा झोत टाकण्याचा मला काहीही अधिकार पोहोचत नाही.

१६ नोव्हेंबर १९८१

भोवती काळोख असो वा चांदणे. उन्हाळा असो की पावसाळा. कुठलाही ऋतू असो. रात्र म्हणजे रात्र. सर्व आठवणी उगाळत बसण्याची वेळ.

‘याद के जुगनू रात के सुने आंगन में फिर रक्सकुनां हैं

भूले बिसरे चेहरे जो नजरों से निहां हैं

दिल में आईनाखाने मे जलवाफशां हैं’

...रात्रीच्या वातावरणाचा वेध घेत मीना या ओळी लिहून जाते. कितीतरी वेळ ती बसून राहत असावी. जसा मी असतो.

खरंच, आपली फार मोठी चुकामूक झाली मीना..!

४ जानेवारी १९८२

अस्वस्थता जेव्हा कमी असते तेव्हा मी लिहीत नाही. खरंच हा स्वार्थीपणा आहे का?

कॅफे रॉयल…

आमचं चहाचं ठरलेलं हॉटेल. बाहेर गप्पा मारत बराच वेळ बसता येतं. शिवाय ५० पैसे चहा असल्याने आम्ही नेहमी इथेच येतो. अस्वस्थ असताना इथं येऊन बसावं. फार बरं वाटतं.

दर सायंकाळी हल्ली येतोय इथे. पश्चिमेकडे तोंड करून बसले की पुढे दिसते ते रस्त्याच्या पलीकडे निष्पर्ण झाड. नावाला एक पान नाहीये त्यावर. फांद्याच उघड्या बोडक्या वाढलेल्या. कावळ्यांची कावकाव त्यावर सुरु असते. अवकाशाच्या निळसर लाल पार्श्वभूमीवर ते असं काही दिसतं की माझं प्रतीकच माझ्यासमोर आहे असं वाटतं.

हळूहळू अंधारु लागतं. झाडाच्या वर शुक्र तेजाळू लागतो. तो अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला की झाड अस्पष्ट होऊ लागतं. शुक्राभोवती वलय दिसू लागलं की झाडाला अंधाराने गडप केलेले असते.

____________________

११ वी नापास झालो. मी अभ्यास केलाच नव्हता. कॉलेजला नियमित गेलोच नव्हतो. तरीही मुख्याध्यापकांचा सल्ला होता मी संस्था चालकांना भेटून प्रयत्न करावा. कारण ११ वी ची परीक्षा आणि निकाल अंतर्गतच होता. दुसरा मार्ग फेरपरीक्षा देण्याचा. मी दोहोंना नकार दिला. चेंबूर हायस्कूलला मी उत्तम गुणांनी १० वी झालो. त्याच संस्थेच्या, त्याच इमारतीत रात्र कॉलेजमध्ये मी होतो. दहावीला असताना संस्थाचालकांशी नामांतरासंदर्भातल्या माझ्या भाषणाच्या संघर्षाची पार्श्वभूमी असल्याने संस्थाचालकांना विनंती करणे माझ्या अस्मितेच्या आड आले. ही पार्श्वभूमी नसती तरी अशी विनंती करणे मला मंजूर झाले असते असे वाटत नाही. कारण चूक माझी होती. मी नापास माझ्या कर्तृत्वाने झालो होतो. नंतर डी. एड. ला प्रवेश मिळाला. १९८२ ते १९८४ ही दोन वर्षे परळच्या शिरोडकर हायस्कूलच्या परिसरातील डी. एड. कॉलेजमध्ये मी होतो. त्या काळातील हा भाग -

____________________

३१ जुलै १९८२

खरंच मी चित्रपट बघतोय की काय सुरेश सावंत या व्यक्तीच्या आयुष्याचा?

पण इतका रममाण होऊन की वेदनांत मीही पोळून जावे, नि सुखात हुरळून जावे!

१ ऑगस्ट १९८२

...आणि प्राचार्य उभे राहिले. म्हणाले, “मी आता खरे व गुजर बाईंनी दिलेला निर्णय वाचत आहे.” मी उत्सुक झालो. सरांनी वाक्य उच्चारलं, “या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे प्रथम वर्ष ‘अ’ च्या सुरेश सावंत याला.” मी मनोमन आनंदाने उसळलो. टाळ्यांचा कडकडाट झाला.

७ ऑगस्ट १९८२

गेलं वर्षभर रिकामा होतो. पूर्णपणे रिकामा. पण भयंकर अस्वस्थतेने भरलेला. जिवंत असूनही मृत. एखाद्या नापीक माळासारखा. नाही. माळावर निदान विरळ गवत तरी येतं. अगदी महावीर कर्णाला अग्नी दिला त्या कुमारी भूमी सारखंच माझं आयुष्य होतं गेलं वर्षभर. जिथे एकही हिरवा अंकुर कधी उगवत नसतो.

आणि आता? आता पूर्ण घाईत, पण स्वतःच्या मस्तीत. किती वेगळी कलाटणी मिळाली माझ्या आयुष्याला! जीवनात ‘दिव्यत्व’ या संकल्पनेने पुन्हा किती वेगाने संचारायला सुरुवात केलीय.

१८ ऑगस्ट १९८२

आज अचानक पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन केले. मी कॉलेजवर पोहोचलो. पण परतणं मुश्किल झालं. जे थोडे लोक आले होते ते परतायचं कसं याच काळजीत होते. या आंदोलनात वरळीला दोन शाळकरी मुलं व एक पोलीस ठार झाले. दादरला सुद्धा गोळीबार झाला. तेरा बसेस जाळल्या. ५३ च्या वर फोडल्या. गाड्या सगळ्या बंद. मी शेवटी साडेतीनला कॉलेजवरुन निघालो ते सरळ चालत आलो. बरोबर वर्गमित्र अशोक कांबळे होता. तोही इकडेच पेस्तम सागरलाच राहतो. आम्ही साडेपाचला पोहोचलो.

काय चाललं आहे हे! प्रत्यक्ष संरक्षक पोलीसच आंदोलन करु लागले म्हणजे संपलंच की सारं!

२१ ऑगस्ट १९८२

आपल्या भोवतीचे सगळे भासच असतात. यात काही खरं नसतं. ती सगळी मृगजळं असतात. अशाश्वत. पण मनात अभिलाषा निर्माण करणारी. आपण उगीच मग त्यांच्या मागे धावू लागतो. आपण जसे धावतो तसे त्यांची आपल्यावरची पकड सुद्धा वाढत जाते नि एक दिवस ते भासच लुप्त होतात. आपण हवालदिल होऊन भेदरटासारखे पहात राहतो आजूबाजूला. जत्रेत चुकलेल्या लहान मुलासारखे. कारण तो भास हेच आपलं तोपर्यंतचं जग असतं. तो लुप्त म्हणजे आपलं जग लुप्त. आपल्या भोवतालचं जग म्हणजेच अनोळखी माणसांची जत्रा.

...दैव मी मानत नाही. पण आयुष्यात एकदा दुःखांची मालिका सुरू झाली की थांबत नाही काहींच्या आयुष्यात.

यावरुन आता मनात निर्णय ठरत चाललाय तो असा. कधीही अशा मोहांना बळी पडून दिवास्वप्ने पाहायची नाहीत. जेवढ्यास तेवढे वागायचं. समाजसेवा या पुढच्या ध्येयात स्वतःला झोकून द्यावं. तेच आपलं जीवन. तेच अंतिम ध्येय. तेच सर्वस्व. बाकी सगळं झूठ. कधीही न पाहिलेल्या मुलीबरोबर लग्न. मुले. कुटुंब...छे! आपणास हे काहीच नको. वैयक्तिक व्यथा गुंडाळून ठेवून समाजाला वाहून घ्यायचं. शिक्षक होऊन मुलांत त्यांच्यासारखं होऊन मिसळायचं. साने गुरुजींप्रमाणे तेच आपलं जग बनवायचं. निसर्गाशी बोलायचं. चांदण्याशी खेळायचं.

…पण हे शक्य होईल का?

२३ ऑगस्ट १९८२

...नंतर निघताना जाधव बाईंनी माझी घरची चौकशी केली. ओघात पुस्तके घेऊ न शकल्याबद्दलही बोललो. बाई लगेच म्हणाल्या की मी तुला उद्या सगळी पुस्तके घेऊन देते. मी नकार देत होतो. पण त्यांनीच आग्रह धरला. ...माणूस जिवंत आहे अजून!

२५ ऑगस्ट १९८२

या जगात माणूस अजून जिवंत आहे. या युगाच्या धकाधकीत सुद्धा कुठेतरी माणूसपण आहे, याची जाणीव आज प्रकर्षाने झाली. जाधव बाईंनी आज पुस्तके घेऊन दिली. सगळ्या पुस्तकांची एकूण किंमत ९० रुपये. एवढा धीर बाईंनी करावा याचं मला आश्चर्य वाटतंय. या ‘स्व’ च्या युगात असे धैर्य काही साधं नव्हे. आयुष्यात कधीच विसरणार नाही मी बाईंचे हे उपकार. या पुस्तकांवरुन मी जे यश मिळवेन त्याचं श्रेय बाईंचं असेल. माझी ऐपत होईल तेव्हा बाईंना ही किंमत परत घेण्याचा आग्रह करेन.

१६ नोव्हेंबर १९८२

मी इथं असेपर्यंत वक्तृत्व स्पर्धेचं पहिलं बक्षीस इतर कुणी घेणार नाही, अशी सगळ्यांची खात्री झाली आहे. एकजात सगळे छान बोलतो म्हणतात. परंतु मला अजून माझा आवाका येत नाहीये. त्यामुळे मी साशंक आहे.

१३ डिसेंबर १९८२

प्राचार्य वर्गात सर्वांना बोलतात तसे मला युनिफॉर्मबद्दल बोलले. म्हणाले, “आता काहीतरी व्यवस्था करणे तुला आवश्यक आहे.” नि मला भडभडून आले. पण संयम ठेवला. नंतर प्राचार्यांना भेटलो. ते म्हणाले, “आपण काहीतरी व्यवस्था करु. जा तू.” नंतर शिरोडकर सर भेटले. ते म्हणाले, “तुझा युनिफॉर्मचा खर्च किती तो कॉलेजला अर्ज करुन मदत म्हणून घे. नंतर सवडीने परत कर, असे प्राचार्यांनी सांगितले आहे.” मी हो म्हटले.

१४ डिसेंबर १९८२

प्राचार्यांना आज अर्ज दिला. अर्जात फक्त शंभर रुपयाची मागणी केली. कारण पांढरा शर्ट माझ्याकडे होता. फक्त काळ्या पॅंटचाच प्रश्न होता. सर म्हणाले, “एवढ्यात बसेल का रे?” मी म्हटलं, “माझ्याकडे जुना शर्ट आहे. फक्त पँटच घ्यावी लागेल.” सर म्हणाले, “पुढच्या वर्षासाठी सुद्धा राहिला हवंय. बरे, जा तू आधी. मी बघतो नंतर.” सरांनी पुन्हा बोलावले आणि शंभरच्या आकड्यातल्या एकचे दोन करायला सांगितले. एकूण दोनशे रुपये मला मिळणार.

संप. वडील आजारी. भयानक परिस्थितीतून जाताना मी कॉलेजमध्ये सुखी असतो. परंतु सरांच्या बोलण्याने भडभडून आले. नंतर त्यांना भेटायला गेलो, तेव्हा तर रडूच कोसळले. सगळे परके, सुखवस्तू वाटू लागले. आयुष्य बिकट आहे, हे मी विसरु पाहत असलेली जाणीव भळभळू लागली.

१७ डिसेंबर १९८२

आजवर ती फक्त माझ्या भावना उमजत होती, हेच माहीत होतं. पण तीही माझ्यामुळे अस्वस्थ होऊ शकते हे सत्य, नवी सुखद अनुभूती पहिलीच, आयुष्यात पहिलीच होती.

आमची ही मैत्री, निखळ मैत्री खरंच किती काळ टिकेल? अखेर आम्ही परके होणारच ना!

तिला हे परकेपण नकोय. पण अखेर ती सुद्धा व्यवहाराच्या कानशीवर भावनांना बोथट करुन परकी होणारच. या जगाच्या दृष्टीने आयुष्य हे भावनांवर नसतंच मुळी. ती यास अपवाद ठरेल का?

१८ डिसेंबर १९८२

‘मोहे भूल गये सावरीया...’ रेडिओवरील शेवटचं गाणं आताच संपलं.

बैजू बावरा. लताच्या आवाजात गाणारी मीना. मीनाची एक कविता मी कॉलेजच्या हॉलमध्ये म्हटली –

‘तुम लोग तो बादल हो, हवाओं के साथ आये

कुछ देर आस्मां पर छाये रहे

बरसे

और कहीं दूर चले गये

हम चट्टाने हैं

अपनी जगह पर कायम

और हमें मालूम है की

जानेवाले लौटकर नहीं आते’

..मी मनाला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी हे कटू आणि विदारक सत्य आहे की गेलेले पुन्हा कधीही येणार नाहीत. आहेत तेही निघून जाणार.

..काल ‘विकास’ चे प्रकाशन. वर्सोवा कॉलेजच्या प्राचार्या हकीम प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्या हातूनच उद्घाटन आणि पारितोषिक वितरण झाले.

मला निबंधाचे प्रथम पारितोषिक म्हणून २५ रु. चे एक पुस्तक मिळाले. सोबत ‘विकास’ मधील माझ्या निबंधाचे कात्रण.

८ जानेवारी १९८३

ती रडली.

काल रडली. वर्गात रडली. माझ्या शेजारी बसून रडली.

ती माझ्यासाठी रडली. हो, माझ्याचसाठी रडली.

या पंधरा-वीस दिवसांत बरंचसं घडून गेलं. ती कविता करु लागली. पहिली कविता तिने दाखविली अन् बरंचसं जाणवून गेलं. त्यानंतर तिच्या नजरेतले भावही बरेचसे बोलके झाले. काहीतरी सांगत होते. पुकारत होते.

मी भांबावलो तसाच आनंदलो होतो. एक जवळची मैत्रिण याच भावनेनं मी आजपर्यंत तिच्याकडे बघत होतो. तसं मनात कितीतरी वेळा येऊन गेलं होतं. ही आपल्याला आयुष्यभर लाभली तर... पण तो विचार झटकून टाकत असे. आपण जवळ आलेल्या प्रत्येक मुलीत गुंतत जातो.

पण तिने कविता केली आणि आपलं मन प्रकट केलं. कदाचित कवितेतल्या भावना या दुसऱ्याविषयीही असू शकतील. आपल्याला अभिप्रेत अर्थ काढण्याची आपली सवयच आहे. म्हणून तोही विचार मी झटकून टाकू लागलो. पण मनात कुठेतरी आशा पालवतच गेली.

दुसऱ्या दिवशी तिने दुसरी कविता आणली. तिने तर मी उडालोच. उत्कट अनुभूतीशिवाय अशी कविता उतरु शकत नाही.

२७ एप्रिल १९८३

नेहमीप्रमाणे लेखणी यावेळीही दीर्घकाळ हितगुज करेनाशी झाली होती. आताही ती उत्सुक आहे, आतुर आहे अशातला भाग नाही. पण आता लिहावेसेच वाटतेय.

तर सुरुवात कोठून करावी?

‘रणांगण’ मधला चक्रधर विध्वंस समोर उभा राहतोय. तोही सुरुवातीला असंच म्हणतो. सारं जगच तात्पुरतं माझ्यासाठी उलटं झालंय.

तसंच काहीसं आता वाटतंय. आदि, अंत कोणता तेच शोधता येत नाहीय.

आदि म्हणजे काय?

सुरुवात. आरंभ.

तो कोठून झाला?

आणि अंत कुठे झाला? कसा झाला? केव्हा झाला? पण अंत तरी झालाय का?

अंत झाला, मग सीमा कुठेच का दिसत नाही?

हा अंत असीम कसा?

आता लिहायचे म्हणजे मागे वळून पाहायचे. पण आपण मागे वळून केव्हा पाहतो, तर काही मागे राहते तेव्हा. मागचे दिसत नाही तेव्हा.

इथे तर सारेच फेर धरुन नाचते आहे. नेमके काय पकडावे हाच प्रश्न आहे.

‘किती कलंदर आयुष्य आहे ना आपलं?’ – काहीही सुचेनासं झालं की लिहिण्यासाठी ठरलेलं वाक्य. स्वतःला विशेष समजण्यासाठी.

आयुष्य कुठून येते? जाते कुठे? आपण मुकाट चालत असतो. त्याच्याबरोबर. एखाद्या कैद्याप्रमाणे. ते नेईल तिकडे.

बाहेर पूर्ण चंद्र उगवलाय. पण कितीसा बघायचा?

गात्र न् गात्र शिथिल झालंय. मनही गारठलंय.

असे आपण कितीसे चालणार आहोत?

अज्ञात दिशेने. एकाकी. पूर्ण एकांतात.

.....

कविता संपली. खरंच संपली?

कवितेलाही अंत असतो? पण तिच्या या कवितेनेच सर्व सुरु केले.

ती आली. माझी प्रेयसी झाली. अन् निघूनही गेली. पुन्हा आली. पुन्हा गेली.

खूप पाहिलं. खूप अनुभवलं. खूप भोगलं. उदा. कोंबड्यांच्या तडाख्यात सापडावे एखादे उंदराचे पोर.

ताई मिळाली. विजयाची ताई झाली. माझी एक तहान चिंब भागली.

एके दिवशी ताईने व्यक्त केले. अशोकला प्रेयसी मिळाली. अतिशय ग्रेट. अशोकचा ‘अवि’ झाला.

.....

मी एकटा उरलोय. सगळ्यांचा केंद्रबिंदू मी. कापसाच्या सरकीसारखा. पण आता मीच आधारहिन झालोय.

काल दैनंदिनीच्या वह्या घेऊन बसलो. त्या चाळू लागलो. आणि आयुष्यच चवताळून उठलं.

२८ एप्रिल १९८३

आज बाबांना अॅडमिट केलं. काल संध्याकाळपासून पुन्हा तब्येत बिघडली. केसपेपर काढून अॅडमिट करेपर्यंतची दगदग मनस्तापाची तीव्रता वाढविण्यास खूपच कामी आली.

मी ५-६ वर्षांचा असल्यापासून बाबांचे हे असेच मधून मधून हॉस्पिटलचा पाहुणचार घेणे सुरु आहे.

संप झाला आणि खूपच यातनांना सामोरे जावे लागले.

डोके दुखायला सुरुवात झाली होती. क्रमाक्रमाने वेदना वाढतच चालल्या होत्या. ताईने बाम लावला. तेलाने डोके चोळले. दोन क्रोसिनच्या गोळ्या घेतल्या.

....

आज मी किती भयानक मानसिक तणावात होतो. फिरुन सगळंच गिधाडांच्या जथ्यासारखं माझ्यावर तुटून पडलं व लचके तोडू लागलं. आता या वेदना मी किती व कशा आणि कोणत्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करु.

मित्रांना सावरणे हे माझे कामच झाले आहे. ते मला पुरेपूर जमते. मला सावरायला मात्र कुणीच सबळ नाही. मलाच बळ आणावे लागते.

पाडगावकरांच्या गझलेतील दोन ओळी आठवतात.

‘जाळ्यापरी मी हे शब्द फेकिले

हातात शून्य येते; हा अर्थ लाभला’

हे माझ्या वैयक्तिक बाबतीत शंभर टक्के खरे असले तरी दुसऱ्यांच्या बाबतीत मात्र –

‘जाळ्यापरी मी हे शब्द फेकिले

हातात सर्व येते; हा अर्थ लाभला’

आर्थिक अवस्था अधिकाधिक बिकट होते आहे. अमृतेबाईंनी मला सांगितले की मी तुझ्यासाठी काहीतरी प्रयत्न करते. जूनपासून त्या मला शिकवण्यासुद्धा मिळवून देणार आहेत.

१ मे १९८३

सकाळी मी निघता निघता किरणने एक शेर सुनावला.

‘गमे दिल में भी क्यों बसा करते हैं ये हसरतों के काफिले

चलते चलते सरे राह में क्यों हसा करते हैं गम सारे’

छान शेर लिहिला त्याने. माझा पाठही होऊन गेला.

दरवाजातून बाहेर पडणार एवढ्यात किरणने विचारले, “कसे चालले आहे तुझे? काही पत्र वगैरे?”

तिचे आधीचे पत्र पाहून किरण आणि वहिनीने निष्कर्ष काढला होता की ती कधीच धोका देणार नाही.

ते पत्र असे होते :

प्रिय सुरेश,

‘हमे तुमसे प्यार कितना

ये हम नहीं जानते

मगर जी नहीं सकते

तुम्हारे बिना’

मी आतापर्यंत तुला दुःख आणि दुःखच दिलं आहे. पण आता येणारे आषाढमेघ न बरसता निघून जाण्यासाठी नव्हेत. या गदगदणाऱ्या शिशिराची झळ आपल्या वसंत बहाराला लागणार नाही याचे आश्वासन देते. मला तुला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. तुझं भवितव्य उज्जवल आहे यात तिळमात्र शंका नाही.

चांगला अभ्यास कर.

तुझी आणि तुझीच,

……….

(पत्राच्या खालच्या मोकळ्या जागेत मोठी ठळक आद्याक्षरांना हंसाचा आकार दिलेली आमची दोघांची नावे.)

.....

आमचे एक सर भविष्यवेत्ते आहेत. त्यांच्या भोवती मुलींचा भविष्य जाणण्यासाठी गराडा पडे. त्यांनी तिला ‘मी धोका देणार आहे’ असे सांगितल्याचे मला कळले. वास्तविक ती भविष्य या कल्पनेवर कोरडे ओढत असते. आमच्या एका वर्गमैत्रिणीने या सरांची एक दिवस चांगलीच रेवडी उडवली.

दोन पत्रिका आणून तिने त्यांना दाखवल्या. विचारले – “या दोघांचे लग्न ठरते आहे. तरी तुम्ही यांचे भविष्य सांगा.”

सरांनी अगदी उलटे सांगितले. त्या मुलीचे आणि मुलाचे पूर्वायुष्य विपरीत रीतीने सांगून त्यांचे जमणार नाही, हे लग्न करु नये, असा सल्ला त्यांनी दिला.

नंतर आमच्या मैत्रिणीने सरांना सांगितले – “सर, या दोघांचे कधीच लग्न झाले. काहीही अडचण आली नाही. एकूण सगळं सुखात चाललंय.”

थोबाडात मारल्यासारखे सरांना झाले. आता ते या आमच्या मैत्रिणीकडे बघत नाहीत.

मी एकदा त्यांच्याकडे गेलो व म्हणालो, “सर, तुम्ही बऱ्याच जणांना भविष्य सांगता. माझेही सांगा ना!”

ते म्हणाले, “आता माझा मूड नाही. पुन्हा केव्हातरी जरुर सांगेन.”

नंतर पुन्हा एकदा त्यांच्याकडे गेलो. तेव्हा म्हणाले, “मला चेहऱ्यावरुन वाटले तर भविष्य सांगतो. हात बघत नाही. मला ती विशिष्ट सिच्युएशन समजली पाहिजे. चेहऱ्यावरुन ती समजते. तरच मला स्टिम्युलेशन होते व मी भविष्य सांगतो.”

अखेर सरांनी शेवटपर्यंत मला भविष्य सांगितले नाही. मी वक्तृत्व,निबंध स्पर्धेत जिंकत असे. मात्र माझे या सरांनी कधीही अभिनंदन केले नाही.

३ मे १९८३

‘एक हमारा सायाही जो साथ था पहले सो अब भी है

एक फ़किरोंसा एहसास जो पहले था सो अब भी है

हर नुक्कड पे ढूँढा जिनको, मुठ्ठी से वह फिसल पडे

और हाथ हमारा खालीही जो पहले था सो अब भी है’

....या मीनाच्या ओळीच खऱ्या. माझी सावली माझी दैनंदिनीच आहे. पण सावलीत फक्त आकृती दिसते. व्यक्तीचे रंगरुप दिसत नाही. दैनंदिनीत आकृतीपेक्षा अधिक सापडेल. पण दैनंदिनी पूर्ण प्रतिबिंब असेलच असे म्हणता येणार नाही.

मानसशास्त्रात दैनंदिनी मनाचे प्रतिबिंब मानतात. परंतु, मनाचे सर्वच कंगोरे त्यात उमटतीलच असे नाही.

काहीही असो. सध्या तरी माझे सगळ्यात जवळचे म्हणजे माझी दैनंदिनीच होय.

४ मे १९८३

‘तीन तरुण, दोन तरुणी व एक बंड’ आज वाचून संपले. डॉ. भाल पाटलांनी वर्णलढ्याचे विद्यार्थी पातळीवरील आंदोलन सुरेख रेखाटले आहे. ‘केन’ फारच हृदयात रुतला.

संध्याकाळी बाहेर चाललो असता एका कॅसेटच्या दुकानातून ‘चुपके चुपके’ ऐकू आले. थबकलोच. गझल संपली नि चालू लागलो.

पहिल्यांदा ही गझल ऐकली ती दीपकच्या तोंडून. तेव्हा गुलाम अली पहिल्यांदा भेटला. मग सतत भेटत राहिला. आता तर कायमचाच.

त्या दिवशी आम्ही बबनकडे गेलो होतो. तिने दिलेला पहिला नकार तेव्हा जखमा फुलवित होता.

टेपरेकॉर्डरवर बबनने ही गझल लावली. नि ती खूपच गंभीर होत निघाली. आर्ततेकडे झुकू लागली. आणि नंतर तिच्या डोळ्यांत पाणीच तरळले. मी पटकन तिला हलवले. एक विनोद करुन तिचे लक्ष विचलीत केले. मैफलीत रडू नको होते. सगळेच त्यामुळे गंभीर बनले असते.

तिचे पाणावलेले डोळे खरे तर मला खूपच सुखदता देऊन गेले.

त्यानंतर काहीच दिवसांत आमचे पुन्हा जुळून आले.

६ मे १९८३

गावच्या आठवणीने खूपच ओढ लागते. पण ती दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो. या शहरातच स्वतःला दडपण्याचा प्रयत्न करतो.

काय मिळवतो मी गावी जाऊन?

निसर्गाचे रमणीय सान्निध्य. विजनातील एकाकी हितगुज. रानवाऱ्याचे संगीत. रानफुलांचा रानसुगंध. उंच डोंगर. खोल दऱ्या. त्यातून मनाचे अलगद झेपावणे. कभिन्न काळोखात अवकाशातील तारकांचा ठाव घेणे. सकाळी सूर्याच्या किरणांचे गवताने घातलेले रत्नजडित मुकुट न्याहाळणे. पानावरुन घरंगळणारा दवबिंदू सावरणे. आणि सगळ्या निसर्गालाच आपल्या व्यथांचे कुंपण घालणे.

हेच करतो मी गावी जाऊन. येताना ढसढसा रडतो. गाव सोडवत नाही म्हणून. मुंबईचा कर्कश गोंगाट साहण्यास मनाला निर्दयपणे चिरडून टाकतो म्हणून.

या क्षणी वादळल्या मनाला तो निसर्गच अत्यावश्यक होता. पण त्या निसर्गात हे वादळलेले मन सातत्याने वादळाला स्वतःभोवती घुमवित ठेवणार. येताना नवे वादळ मनात तयार करुन. वादळल्याची तीव्रता वाढवूनच मी येणार.

त्यापेक्षा आहे त्याचीच सवय मनाला लावण्याचा प्रयत्न करु.

शिवाय पैश्यांची उपलब्धता तरी कुठे आहे गावी जायला..!

७ मे १९८३

आज लहू आणि मी फोर्टला गेलो होतो. लहूने तिकडचा भाग अजून पाहिलाच नव्हता कधी.

गेटवे, जहांगीर आर्ट गॅलरी पाहून नंतर म्युझियममध्ये आम्ही घुसलो. प्रागैतिहासिक काळापासून १९ व्या शतकाखेरीपर्यंतचे विविध वस्तूविशेष इथे अनुभवायला मिळाले.

एकूण आजचा दिवस फिरण्यातच गेला.

८ मे १९८३

आजच्या ‘सकाळ’मध्ये बबनची कथा आलीय. कथेचे नाव ‘पत्र-उत्तर’. नावाप्रमाणे दोन पत्रे आहेत. स्वप्नील हा प्रसिद्ध साहित्यिक आणि त्याची एकेकाळची प्रेयसी मीना यांची ही पत्रोत्तरे. एकूण कथा खूप भिडली. तशी बबनने सुरुवातीला लिहिली तेव्हा नेहमीप्रमाणे तिचा पहिला वाचक मीच होतो. पण आता ती नव्याने जाणवली. कथेचा आकृतिबंधसुद्धा अभिनव वाटला.

१० मे १९८३

आज डॉ. सदा कऱ्हाडेंचं ‘दलित साहित्याच्या निमित्ताने’ वाचलं. आता ‘रसेलचे निवडक लेख’ भा. वि. कविमंडन यांनी अनुवादित केलेले पुस्तक वाचतोय.

मी वाचत असलेल्या, वाचलेल्या पुस्तकांवर कधीच लिहायचे म्हणून लिहीत नाही. दैनंदिनीत असे विरळ उल्लेख सापडतील. तात्त्विक, सामाजिक बाबतीत माझे विचार मी दैनंदिनीत मांडतच नाही. मी आखलेला पुढील समाजप्रबोधनाचा मार्ग यावरही काही लिहिले किंवा लिहीत नाही.

खरे तर हे सर्व मी चर्चेत, गप्पा मारत असताना बोलत असतो. समाजात माझे लिखाण पसरणार आहे ते याच बाबतीतले. मी दैनंदिनीत लिहितोय ते नाही. समाजाला त्याचा उपयोग नाही. माझ्या या दोन भूमिकांपैकी सामाजिक भूमिकाच मुख्यत्वेकरुन माझी ‘आयडेंटीटी’ ठरेल. माझे वैयक्तिक, व्यक्तिगत असे हे आयुष्य मुक्तपणे प्रकटणार नाही. आणि तेच मी खोलात रुतत, गुंतत दैनंदिनीत साठवून ठेवतोय.

त्यामुळे उद्या कोणी माझ्या दैनंदिनीद्वारे माझ्या वैचारिक जडणघडणीचा मागोवा घेऊ लागले तर तो वृथा प्रयत्न ठरणार आहे. माझ्या सामाजिक कार्याचा व त्याबाबतच्या अनुभवांचा मागमूस लागणेही कठीण होणार आहे.

बरे, मी हे लिहीत नाही, याचे मुद्दाम असे काही कारण नाही. दैनंदिनीत मी लिहितो, ते मला वाटते ते. आणि मला वाटते ते वैयक्तिकच प्रकर्षाने. तेच मी लिहितो. तसे पाहिले तर सामाजिक आणि व्यक्तिगत या दोन्ही संवेदना तितक्याच प्रमाणात माझ्यात आहेत. परंतु, इथे लिहिताना मात्र व्यक्तिगतच येतात. कुठे कुठे या दोन्ही जाणिवा संमिश्र प्रमाणात आढळण्याची शक्यता आहे. पण असे अत्यल्पच.

दोन्ही जाणिवा, माझे विचार, वाचन, त्यावरील भाष्य, नवे आराखडे, सामाजिक घडामोडी, ध्येये, उद्दिष्टे हे सर्व माझ्या लिखाणात दैनंदिनी लिहिताना यावे असे वाटते. पण प्रत्यक्ष लिहिताना एकच जाणीव प्रकर्षाने उमटत राहते.

याचे मानसिकदृष्ट्या एक कारण मला दिसते. सामाजिक जाणीव ही मला प्रकटपणे व्यक्त करुन मन रिकामे करता येते. हलके करता येते. परंतु, व्यक्तिगत जाणीव सहजासहजी प्रकट करता येत नाही. दोन्ही ठिकाणी मनाचे रिक्त होणे आवश्यक आहे. एका ठिकाणी ते सहज शक्य आहे, तर दुसऱ्या ठिकाणी ते थोडे कठीण आहे.

म्हणूनच दैनंदिनी ही एक सखी समजून मी तिच्याशी बोलतो, ते आतले असते.

मित्रांच्या आयुष्याविषयीसुद्धा खोलवर मी लिहीत नाही. प्रत्यक्ष साक्षीदार असतानाही मी ते लिहिण्याचे टाळतो. कारण मी मागे एकदा एका मित्रासंबंधी लिहिताना स्पष्ट केले होते. माझ्या मृत्युनंतर जेव्हा ही दैनंदिनी उजेडात येईल, तेव्हा माझ्याबरोबर त्या मित्रांच्याही जीवनाचा नाहक बाजार होईल. त्याला जबाबदार मीच असणार आहे. आणि हेच मला नकोय. उजेडात येईल ते माझ्यासंबंधीच असावे.

१५ मे १९८३

विसरशील तू सगळं? नरिमन पॉइंटवरील आपली जवळीक, गुरुदेवमधल्या मैफली. तूच म्हणाली होतीस ना – “लग्न केले तर तुझ्याशीच. नाहीतर नाही!”

‘ए चांद तन्हा है, आस्मा तन्हा

थरथराता रहा धुआँ तन्हा

हमसफर गर कोई मिले भी कहीं

दोनो चलते रहे तन्हा तन्हा’

...ज्या घरात मीना तुझ्या आसवांची शिल्पे झाली, ते घर सुद्धा या जगाने लिलाव केले. अगदी माझ्या समोर. काही दिवसांपूर्वी. बरे झाले तू लवकर गेलीस!

असा किती वेळ या मध्यरात्री मी रडत राहणार आहे?

१७ मे १९८३

या देशातली गरीबी, भ्रष्टाचार, बेकारी, जातियता माणसाच्या रंध्रारंध्रात विष पेरत आहे. तरीही हा माणूस जगण्याचा आनंद शोधत, सापडल्याचा आभास करत जगतो आहे. गरीब आणि श्रीमंत आपापल्या उच्चतम बिंदूंकडे वाटचाल करत आहेत. बलात्कार, खून, मारामाऱ्या, जाळपोळ यांत माणूस पिचत असतानाही आलिशान इमल्यांतून, पंचतारांकित हॉटेलांतून मदमस्त संगीताच्या तालावर ऐश्वर्याच्या लुसलुशीत मांड्या, नितंब, स्तन अनिर्बंध वळवळत आहेत.

‘जिन्हे हिंद पे नाज है वो कहां है?’

गुरुदत्त, सर्वच प्रतिकूलतेच्या गर्तेत ‘मृत्यू’ हाच पर्याय आहे का रे?

…..

जगण्यासाठीच्या मूलभूत गरजाही मी भागवू शकत नाही.

बाबा गांधी हॉस्पिटलमध्ये असताना शिरोडकर सरांनी ४५० रु. दिले. त्याच्याआधी प्राचार्यांनी कॉलेजमधून गणवेशासाठी २०० रु. दिले. जाधवबाईंनी ९० रु. ची पुस्तके घेऊन दिली. खरेबाईंनी त्यांच्या गणपतीला दान म्हणून आलेले २० रु. मला दिले. हे सर्व काही मी बिकट आर्थिक परिस्थितीत आहे म्हणून करण्यात आले. मला इथे माणुसकीचा झरा सापडला. पण या झऱ्यातूनच माझ्या परिस्थितीचे नकळत वचपे निघाल्याच्या वेदना जाणवल्या. व्यथांची खोली गहिरी झाली.

बाबा अॅडमिट. घरी पैसे नाहीत. सगळा कोंडमारा. अशावेळी तिचा दिलासा हे सुसह्य करु शकला असता. पण त्यावेळी तिनेही पाठ फिरविली. भयाण पोकळीतील एकाकीपणाच्या जीवघेण्या कळा नित्यनेमाने तेव्हापासून विस्तारत गेल्या.

१८ मे १९८३

आज एक जिन्सची पँट व चपला घेतल्या. स्कॉलरशिपचे उरलेले पैसे जवळ जवळ संपले. पँट व चप्पल या खूपच आवश्यक गरजा झाल्या होत्या.

२० मे १९८३

आता व्यथा, वेदना मांडणे, आळविणे पूर्णतः बंद करावे. दडपून टाकावे. असह्य झालं तर तडफडावं. पण शब्दांत व्यक्त करु नये, असे वाटतेय. कारण यातून कालापव्यय, जखमांचे निरंतर भळभळणेच फक्त साध्य होते. इतर सर्व प्रगतीचे व्यवहार कुंठित होतात. माझे कितीतरी वाचन, ठरविलेला अभ्यास जसाच्या तसा आहे. तो केला तर काहीतरी मिळवेन. साध्य करीन. म्हणून या निरर्थक आत्मनिष्ठ तरलतेच्या कोषातून बाहेर पडावे हे उत्तम.

२४ मे १९८३

संजयला झब्बा घेतल्यावर आम्ही नरिमन पॉइंटला निघालो. पण अर्ध्यात संजय म्हणाला, “नको. तू लवकर उठणार नाहीस.” मीही न जाण्यास पटकन तयार झालो.

रात्र झाली होती. त्रयोदशीचा शुक्ल पक्षातला चंद्र होता. समुद्रावरील क्षितिजाच्या धुसरतेत मी काय शोधत राहिलो असतो? ...तोच तो कट्टा. जिथे मी तिच्या कुशीतील धडधड अनुभवित गालांवरुन, पापण्यांवरुन, मानेवरुन, गळ्यावरुन बोटे रेखाटत तिचे गाणे ऐकले...पत्ता पत्ता बूटा बूटा. समोर पसरलेली तेव्हा चंदेरी समुद्रवाट. क्षितिजापर्यंत.

१७ जून १९८३

अमृतेबाईंनी त्यांच्या ७ वीत शिकणाऱ्या मुलीची गणिताची टयुशन घेण्याबद्दल विचारले. आठवड्यातून तीन दिवस. माझ्या सोयीने. मी होकार दिला.

......

...किती हे अनोळखीपण! तल्लीनतेने माझ्या काव्यवाचनात रमणारी ती कुठे गेली? मला ‘तुझ्या तोंडून कविता ऐकायला आवडतात’ म्हणणारी ती कुठे गेली?

‘अलिकडे आपले चेहरेही अनोळखी झाले आहेत एकमेकांना

पुन्हा एकदा त्या सनातन नदीच्या अनादी प्रवाहात पाहू आपली प्रतिबिंबे

कदाचित ती ओळखतील परस्परांना’

शांताबाईंची (शेळके) ही कविता तुला ऐकवायची होती. पण आता तू समांतर रेषेवर उभी आहेस. आणि ही रेषा जिथे आवाजही समांतर जातो, अशा प्रदेशातली. आता मी कुठे ऐकवू तुला कविता?

१८ जून १९८३

आईने सकाळपासून तगादा लावला होता, मावसभावाकडे जाऊन काही पैसे माग. मला हे पैसे मागणे जीवावर आले होते. आपणहून कोणी दिले तर ठीक. पण आईचा आग्रह अन् बिकट परिस्थिती. मन घट्ट करुन गेलो. आधी मावसबहिणीकडे गेलो. तिने २० तारखेला मावसभावाकडे जा, त्यावेळी त्याला पगार की कसलेसे पैसे मिळणार आहेत असे सांगितले. निरोप घेताना तिने मला १० रु. दिले.

......

ती म्हणाली, “तू हल्ली कोणाशीच बोलत नाहीस. लवकर का जातोस?”

औपचारिक उत्तर दिलं – “गाडी मिळत नाही म्हणून लवकर जातो.”

आली तशी ती निघूनही गेली.

आज ती मी दिलेलं ग्रीटिंग कार्ड हरवलं म्हणून सांगायला आली होती. अर्थात, तिने ते जपून ठेवावं, हा माझा आग्रह नाही. नि तसा मी धरावाच का?

मधल्या सुट्टीत तसाच मी स्वाध्याय रुमच्या त्या खिडकीत जाऊन उभा राहिलो. वर्ष संपेपर्यंत याच खिडकीत मी किती वेळ अश्रू ढाळणार आहे, कोण जाणे!

२० जून १९८३

आई आज खूप वैतागली होती. मला म्हणते, कुठूनतरी पैसे आण. आता कुठून आणू? प्रकाशला पुस्तके नाहीत अजून. मला एक वहीसुद्धा घेतलेली नाही. बाबांनी ज्यांना पोसलं. ज्यांची लग्नं केली. ते आता कोणीच आम्हाला बघायला तयार नाहीत. आई सगळ्यांचा उद्धार करत होती.

२६ जून १९८३

मावसभावाने ५० रु. पाठवले. ते किती दिवस पुरणार? त्याच्याही अनेक अडचणी आहेत. मावसबहि‍णीनेच प्रयत्न केले. मी प्रत्यक्ष पैसे मागायला गेलो नाही.

२७ जून १९८३

मृत्यूपासून ताईने खूपच दूर आणले. तो पुन्हा पुन्हा मोहवितोय. बोलावितोय. पण काहीच शक्य नाही आता. इकडे ताई. दुसरीकडे यातना. मध्येच गुदमरत राहायचे. मन जगू देत नाही. पण ताई मरु देत नाही.

२९ जून १९८३

बाथरुममध्ये असताना मित्राने माझा चष्मा मस्करीत लपवला. मी बाथरुमध्येच अडकून राहिलो. चष्म्याशिवाय मला बाहेर येववेना आणि मित्र काही मला तो आणून देईना. अखेर प्रार्थना झाली व मी वर्गात तसाच प्रवेश केला. माझा पारा खूप चढला होता. बाई हजेरी घेत होत्या. वर्ग शांत होता. मी जवळ गेलो तसा मित्राने चष्मा पुढे केला. मी चष्मा घेतला नि काही कळण्याच्या आतच त्याला दोन वाजवल्या. बाई काय झालं म्हणून विचारु लागल्या. त्या अधिक आमच्यात पडल्या नाहीत. त्या बहुधा समजल्या असाव्यात. मुलांना बहुतेकांना ते वेगळंच वाटलं असणार.

त्याच्या शेजारीच जागेवर बसलो. माझा पारा लगेच शून्यावर आला होता. मी हे असे काय केले, माझे मलाच कळेना. मित्राला सॉरी म्हटले. पण त्याने रडायला सुरुवात केली होती. त्याला समजावले. “गप्प हो” म्हटले. तो एवढंच रडण्याच्या उमाळ्यात म्हणाला, “एवढ्याशा गोष्टीवरुन तू माझ्यावर हात उगारावा?”

नंतर शिरोडकर सरांनी त्याला कामानिमित्त बाहेर पाठवलं. तो आला तेव्हा मी व तो पुन्हा बोलू लागलो. अगदी एकमेकांना समजून घेऊन.

मी काही वेळा माझ्या काबूत राहत नाही. मागे सुद्धा एका मित्राला असेच मारले होते. माझा राग चढतो त्याच वेगाने उतरतोही लगेच.

या मित्रावर मी हात उगारला. मलाच माझे मन खाऊ लागले आहे. कदाचित इतर बऱ्याच गोष्टींचा राग मी त्याच्यावर काढला नाही ना?

२ जुलै १९८३

आज मुलांनी पुस्तके घेतली. मला फक्त बघत राहावे लागले. वह्या घ्यायच्या आहेत. इंग्रजी परीक्षा व टाचणवहीचे पैसे द्यायचे आहेत. कुठून देऊ? अशी परिस्थिती अशा मानसिक स्थितीत नको होती.

प्रकाशचेही शाळेचे हाल चाललेत. नाईलाज आहे. अमृतेबाईंकडून त्यांच्या मुलीच्या ट्युशनचे मिळणारे पैसे जेमतेम ५० रु. च असणार. २५ रु. वरचे प्रवासखर्च होणार.

सारं थंडपणे स्वीकारता आलं असतं तर किती बरं झालं असतं!

३ जुलै १९८३

आईने अखेर कुठूनतरी ५० रु. काढून दिले. प्रकाशला पुस्तके घेतली. मला एक वही घेतली. प्रकाशला, मला चित्रकलेसाठी साहित्य हवंय. कसं भागवावं एवढं कळत नाही.

अमृतेबाई आज विचारीत होत्या, “पुस्तकांचे काय केलेस? नाहीतर मी घेऊन देते.”

प्राचार्यांना भेटून स्कॉलरशिपमधून कापून आगाऊ पैसे मला पुस्तकांसाठी मिळतील का, विचारायचे आहे. तसं नाही झालं तर मला बाईंनाच सांगावं लागणार.

घरी खायचं काय, हा बिकट प्रश्न पडलाय.

ही अशी परिस्थिती का? या देशात कम्युनिस्ट हुकूमशाही प्रणालीच रुजवायला हवी. बाकीचे सगळे तोटे सोसता येईल. पण पहिल्यांदा इथला प्रत्येक माणूस किमान जिवंत तरी राहील. सर्वांना समान उत्पन्न, संपत्तीचे समविभाजन अत्यंत आवश्यक आहे. एकही भांडवलदार नको. सर्व जनतेच्या हाती असू दे. पहिल्यांदा पोट नंतर उरलेले भरल्यापोटी सोडवायचे प्रश्न बघून घेऊ.

५ जुलै १९८३

ताईचं पत्र वाचलं. ती म्हणतेय – ‘सुरेश, तुला बरेच दिवस सांगेन सांगेन म्हणतेय. पण धैर्यच झाले नाही. मन घट्ट करुन सांगतेय. त्या दिवशी मी तिला भेटले. ती फार रडली माझ्याजवळ. तिच्या मते मी मजेत असते तो एक मुखवटा आहे. तिच्याही मनात दुःख आहे. तीही दुःखाने, यातनांनी पोळलेली आहे. तिने स्पष्ट सांगितले, ‘सुरेशला सांग माझा आता विचारच करु नको. मला पूर्ण विसरु जा. मीही त्याला विसरतेय.’ ’

आता हे लिहिताना अजून तरी मी रडत नाहीये. खूपच शांत आहे. कदाचित असं तर नसावं की जखम झाल्यावर काही क्षण आपण बधीर होतो. नंतर मग वेदना तीव्र होत जाणवू लागतात.

.....

रविवारच्या म. टा. तला सुरेश भटांचा लेख वाचला. सुरेश भट खऱ्या अर्थाने मला माझे वाटले. मला जाणवलेलं त्यांनी आपल्या सिद्धांतांत मांडलंय. हे सिद्धांत शास्त्रीय नव्हेत. हा लेख आत्मपर, त्यांचा व्यक्तिगत जीवनानुभव व्यक्त करणारा आहे. यात सुरेश भटांनी कोणताही आडपडदा न ठेवता तपशील टाळून आशय मांडला आहे.

सुरेश भटांचे आयुष्य भन्नाट गेले. अनेक स्त्रिया जीवनात आल्या हे ते मोकळेपणाने सांगतात. परंतु त्यांची नावे घेत नाहीत. त्यांना आता या काळात बदनाम करण्याचा मला अधिकार नाही, असे त्यांचे म्हणणे. जखमा करणारे कोण होते यापेक्षा जखमा कशा झाल्या हे महत्वाचे. झंकार करणारे हात कोणते यापेक्षा उठलेला झंकार महत्वाचा.

‘पांढरपेशा घरातील मराठी मुलीकडून खऱ्या उत्कट प्रेमाची अपेक्षा करणे म्हणजे काकूबाईकडून कव्वाली गायनाची अपेक्षा करण्यासारखं होय’ हे भटांचे वाक्य सिद्धांतवजा आहे.

प्रत्येक शेर म्हणजे एक संपूर्ण कविता. एक जखम असते. हेही किती अर्थपूर्ण! ‘अंड्यात राहून मी टरफलात चंद्र पाहिले नाहीत’ यातून ते भणंग आयुष्य सुचवितात. सारं अनुभवताना विक्षिप्त, दुःखी होतातच सुरुवातीला. परंतु नंतर समजुतदारपणा आणतात व एकप्रकारची दुःखाची मस्ती अंगात भिनवतात. तिच्यातून कविता म्हणजे गझल प्रसवली.

मानलं सुरेश भटांना. हा माणूस मला इतका जवळचा असेल असं वाटलं नव्हतं. सुरेश भटांचा हा लेख बरीच शक्ती देऊन गेलाय, असे राहून राहून वाटतेय. सुरेश भटांना प्रकर्षाने भेटावेसे वाटतेय.

७ जुलै १९८३

‘सृजन’साठी लिहीत होतो. बराच वेळ. आज वेदनांनी बरेच हाकारले.

मित्र म्हणतोय, तिनेही सुरेश भटांचा लेख वाचला. ती वरुन हसतेय. आतून तीही खूप दुःखी आहे. – हे त्या दोहोंच्या संवादातले सार.

८ जुलै १९८३

‘सृजन’ साठी तिनेही लिहिलंय.

हे वाक्य लिहायला न् रेडिओवर गुरुदत्तचं ‘प्यासा’तलं ‘जाने वो कैसे लोग थे’ सुरु व्हायला एकच गाठ पडली. आर्ततेने गुरुदत्त गातोय.

‘बिछड़ गये हर साथी...

किसको फुरसत है जो थामे दिवानों का हाथ

इसकोही जिना कहते हैं तो यू हीं जी लेंगे

उफ ना करेंगे लब सी लेंगे आँसू पी लेंगे

गम से अब घबराना कैसे गम सौ बार मिला...’

गुरुदत्त, यू हीं जी लेंगे म्हटलंस. पण जगलास का रे तू? ....का नाही जगलास?

तिने ‘सृजन’ साठी हेच लिहिलंय की, ‘एकांतात दुःखे आपलीच असतात. पण चारचौघात आपण हसले पाहिजे. हसण्याने इतरांनाही आनंद मिळतो. नको त्या विचारांना कवटाळून अश्रू ढाळण्यात काय अर्थ आहे? दुःख सर्वांनाच असते. जगी सर्व सुखी असा कोण आहे?’

तुझ्या हसण्यामागेही व्यथा आहे. मान्य मला. पण ती व्यथा तू स्वतःहून निर्माण केलीस. तटस्थपणे विचार केला तर तुझी सगळीच कारणे दुर्बल ठरतात या व्यथेच्या निर्मितीची. तू डरपोक निघालीस हेच खरे.

मी मृत्यूचा आवर्त अनुभवतोय नि तू उपदेशाचे अप्रत्यक्ष डोस पाजतेयस. आताही मी हसत असतो. पण मध्येच गंभीर होतो. रडतो. जर तुझ्यापासून दूर कुठे असतो ना तर सतत मी हसतच राहिलो असतो. सगळं आत दाबून. पण इथे प्रत्येक क्षणाला माझ्या रंध्रारंध्रात जहरी सुया घुसताहेत त्याचं काय? तुझं माझ्यासमोरील सातत्याने असलेले अस्तित्वच या सुया तयार करतात, हे तुला माहीत आहे का? (दोन वर्षे आम्ही एकाच वर्गात होतो.)

माणसाच्या मृत्यूचे दुःख हे एका नश्वर जीवाचे अस्तित्वहिन होण्याचे दुःख असते. ती व्यक्ती पुन्हा येणार नसते. दिसणार नसते. ते दुःख नंतर हलके होते. संपूनही जाते. पण इथे प्रत्येक क्षणी नव्याने माझा ‘जनाजा’ निघतोय त्याचे काय?

या वेदनांची तीव्रता तुला होत नसणार. कारण खेळ उधळलास तूच ना! ज्या मर्यादा, संकेत तू स्वीकारलेस, त्यांची सुखदता तुला तीव्र वेदना जाणवूच देणार नाही.

गुरुदत्त, मीना तुझ्याही दृष्टीने अतिरेकीच. कारण व्यवहाराच्या कानशीवर भावना बोथट करण्याची शक्ती तुझ्यासारखी त्यांना कधीच लाभली नाही. असो.

मृत्यूचे दार उघडून मला मागे ओढले ताईने. नाही तर तुला हे लिहिण्याचे प्रयास मुळीच पडले नसते.

गुजरबाईंनी ‘सृजन’ वाचले. माझ्या लिखाणाची प्रशंसा केली. आता ही कोरडी प्रशंसाच असणार आहे. पोकळ कौतुक. बाईंना मी दोष देत नाही. त्यांनी प्रामाणिक मत दिले. पण शेवटी या कौतुकाचा काय उपयोग मला? जगण्याची तीव्रता थोडीच कळलेली असते बोलणाऱ्याला, वाचणाऱ्याला!

सारंच निरर्थक. चाललंय. चालू दे. मुकाट सोसणे. हेच सत्य.

१० जुलै १९८३

अमृतेबाई म्हणत होत्या – “आम्हा सगळ्यांच्या मते तू मार्ग चुकीचा निवडलास. तू कॉलेजला जाऊन एम. ए. करायचे, प्रोफेसर व्हायचे होतेस. गुजरबाई म्हणत होत्या, अहो, तो मुलगा काय लिहितो! काय म्हणून तो डी. एड. ला आला?”

बाईंना मी पुन्हा सांगितले- “डी. एड. माझी तडजोड आहे. नोकरीसाठी. मला कुठे मिळाले असते असेच काम? मी काही वर्षे शिक्षक म्हणून काढणार. नंतर एम. ए. होऊन कॉलेजमध्येच लागणार.”

११ जुलै १९८३

प्रकाशला रात्रीपासून ताप येतोय. कॉलेजवरुन आल्या आल्या आईने त्याला दवाखान्यात न्यायला सांगितले. मी नकार दिला. उद्या सकाळपर्यंत बघू म्हणालो. आई खूप चिडली.

डॉक्टरांचे खूपच पैसे आमच्या अंगावर बऱ्याच वर्षांपासून आहेत. बाबाही इथे नाहीत. ते गावी आहेत. संप संपणेही कठीण आहे. अशावेळी या डॉक्टरांकडे आणखी उधारी ठेवायला मी कसा जाऊ? मला सहन होत नाहीये हे.

टेन्शन...टेन्शन... बाबांच्या तब्येतीचे पत्र नाही. गावी पाऊस, वादळ यांनी आकांत माजवलाय. सगळ्या बाजूंनी परिस्थिती निर्दयपणे चावे घेतेय.

...आणि ती मला तत्त्वज्ञान सांगण्यासाठी ‘सृजन’ मध्ये लिहितेय. तुला फाडफाड सुनावून तुझे तत्त्वज्ञान तुझ्याच तोंडावर फेकावेसे वाटतेय. पण आवरतोय मला. काय मिळवणार आहे मी हे करुन?

तुझा आपलेपणाचा एखादा शब्द हा व्यथासागर पार करण्यास पुरेसा होता मला यावेळेस. पण आता ही अपेक्षा निव्वळ दिवास्वप्नच आहे...

सगळ्या नकारात्मक दिशांनी एक क्रूर सापळा उभारलाय माझ्याभोवती. मी मेलो तर कितीसे दुःख होईल कोणाला?

हे जग म्हणजे एक बकवास आहे नुसती! बेचव, कळाहिन, यातनामयी. सापासारखी कात टाकून पुन्हा तारुण्यमयी होणारी!

१२ जुलै १९८३

आज रमझान ईदची सुट्टी होती. बबनकडे गेलो. मी येऊन काही मिनिटे होतात न होतात तोच ताई आणि ती आल्या. चहा घेतला व मी निघतो म्हणालो. ती ओरडली – “बस ना!”

पण मी निघालोच.

तिचं हे अधिकारवाणीने ओरडणे मला हवे होते. पण ते माझ्या ‘तिचे’ हवे होते. ही परकी ‘ती’ होती. हृदय पोखरु लागलं. रात्रीचे आईचे प्रकाशला दवाखान्यात नेत नाही म्हणून चिडणे आठवले. पैसे नाहीत. मी कंगाल आहे. मी पूर्ण फाटका आहे. माझे स्वतःचे काही नाही. मी भावाला औषधोपचार करु शकत नाही.

...तू केलेली जखम कधीच खपलीबंद होणार नाही का?

याक्षणी काहीच माझ्या हाती उरलं नाही. फक्त रित्या ओंजळी. पाणी झिरपून गेलेल्या.

१७ जुलै १९८३

मृत्यू खूपच सुखद आहे. मीना आपल्या ‘सुहानी खामोशी’ या कवितेते म्हणतेय –

‘कभी ऐसे पुरसुकून लम्हात भी आयेंगे

जब

मै भी उसी तरह सो जाऊंगी

वह खामोशी

कितनी सुहानी होगी

मौत के बाद

अगरजे महज खला है

सिर्फ तारीकी है मगर

वह तारीकी

इस करब-अंगेज उजाले से

यकीनन बेहतर होगी’

रोज अशा भयानक सकाळ उगवतात. किती दिवस अजून त्यांना तोंड देऊ? कधीच आशादायी किरणांनी उजळलेली सकाळ उगवणार नाही का?

मीनाने म्हटल्याप्रमाणे मृत्युनंतरच ‘सुखद शांतता’ लाभणार आहे. त्याआधी फक्त होरपळणे. आतल्या आत जळत राहणे.

१३ जुलै १९८३

इंग्रजी परीक्षेची फी एका वर्गमैत्रिणीने भरलीय. पैसे तिला द्यायचेत. टाचणवहीचे पैस द्यायचे आहेत. लुंगी फाटली. ती घ्यायची आहे. अजून बरेच.

सगळ्या बाजूंनी कोंडमारा सुरु आहे. असू दे. यातनांचा उरुस सतत रक्तवाहिन्यांतून साजरा होतोय. हे कधीच थांबणार नाही का?

१४ जुलै १९८३

आज सकाळपासून मन बरेच ताजेतवाने वाटतेय. काही चुकार उदास पाखरं मनाच्या आवारात शिरु पाहत होती. पण त्यांनाही हुसकावून लावण्यात आलं.

घडलं काहीच नाही. पण खूपच शांत वाटतंय. आज आमचे प्रागतिक विद्यार्थी संघाचे ५ वी ते ७ वीचे क्लासेस सुरु झाले. तिन्ही वर्ग मीच घेतोय. मुले १४ जणच आज होती.

मुलांना शिकवताना नेहमीप्रमाणे रमून गेलो होतो. खूप समाधान वाटले. मुले घरी जायला मागत नव्हती. इतकी तीही शिकण्यात दंग झाली होती. मी चांगले शिकवू शकतो, याचा मला खूप आनंद होतोय.

ही या मागास विभागातील मुले. पुरेशा संधीअभावी मागे राहिलीत. नाहीतरी यांच्यातही बुद्धिमत्तेची, चाणाक्षतेची वाण नाही. म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिकतात. हे शिक्षक म्हणजे नुसते पगार घेण्यासाठी. शिक्षक म्हणून आपले विशिष्ट योगदान आहे, याची पुसटशी जाणीव नसलेले.

मी मुलांना बरेच देऊ शकेन. हीच माझी कमाई.

१५ जुलै १९८३

ती खूपच समजुतदार होती. पण तिनेही घर पाहिले आणि ‘जात’.

आता काहीही अधिक कॉमेंट्स कराव्याशा वाटत नाहीत. तिला दोन दिवस मनाने खूप समर्थपणे पेललंय. असेच चालले तर मी निश्चित सावरेन. (की बधीर होईन?)

१६ जुलै १९८३

दुपारी कॉलेजमध्ये ‘सृजन’ बद्दल प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परिचय करुन देण्याच्या निमित्ताने बोललो. सृजनवर होणारे आक्षेप ‘प्रेममय अधिक असते’ यावरही बोललो.

(कॉलेजच्या या भित्तिपत्रिकेतल्या माझ्या कवितेतली एक ओळ अशी होती- 'तिच्या स्तनांचे व्रण अजूनही ताजे छातीवर माझ्या'. त्यावरुन वादळ उठले...'हे अश्लील आहे.' काही दुस्वास करणारे असले तरी हा आक्षेप घेणारे काही सगळे माझे वैरी नव्हते. मला शिरोडकर सर भेटले. समजावू लागले...'हे कळण्याइतकी प्रगल्भता सगळ्यांत नसते.' वगैरे. माझी भूमिका - 'हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना प्रतिमा कळत नसेल, त्यातील शब्द वाच्यार्थाने घ्यायचे नसतात हे समजत नसेल तर त्याला मी काय करु?' भित्तिपत्रिकेचे संपादन मीच करत होतो. ती कविता किंवा ओळ काही काढली नाही. या वादात पुढच्या भित्तिपत्रिकेची वेळ झाल्याने तो प्रश्न तिथेच संपला.)

प्राचार्यांनी नंतर सुचवले की प्रत्येक वर्गातून एक जण घेऊन वाङ्मय समितीच्या अध्यक्षांसह ‘सृजन’ तयार करा. म्हणजे आक्षेप येणार नाहीत.

एकूण ‘सृजन’चा भाव या चर्चेने वाढला हे निश्चित. अन् तेच तर हवे होते. आता बघायचे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांतून कोण ‘सृजन’ मध्ये यायला उत्सुक आहे ते.

आज आमची एक सिनिअर भेटली. तिचं कॉलेज संपलं होतं. माझी भाषणे तिला अजून आठवतात. बरीच वाखाणणी केली तिने. ती कॉलेजमध्ये असताना आमचा बोलण्याचा प्रसंग कधी आला नव्हता.

१८ जुलै १९८३

आज ‘सृजन’ ची बैठक घेतली. प्रथम वर्षाचे अशोक हिरे, राजू व भारती राणे, छाया परब, पाटील या मुली ‘सृजन’ सांभाळायला इंटरेस्टेड आहेत. थोडक्यात कामाची माहिती दिली. सोमवारचा अंक काढायला प्रथम वर्षाचेच हस्ताक्षर वापरायचे आहे.

१९ जुलै १९८३

ती म्हणाली – “सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ कार्यक्रम स्टेट बँकेने ठेवला होता. शनिवारी तुला सांगायचे होते. पण तू उशीरा आलास.”

थोडं औपचारिक बोललो. आटोपलं.

२२ जुलै १९८३

आज ‘सृजन’ छायाकडे लिहिण्यासाठी सोपवले. बऱ्याच गोष्टी समजावून दिल्या.

भारती-छाया दोघींची जोडीच आहे. भारती बोलकी आहे. विशेष आश्चर्य म्हणजे या भारतीला माझी इथली कारकीर्द, त्यापूर्वीचेही काही तपशील असे बरेच ठाऊक आहे.

स्टेशनकडे चालत येताना आम्ही सोबत होतो. तिने बरेच संदर्भ सांगितले. माझ्याविषयी हे सर्व कुठून कळलं हे सांगण्यास ती तयार नाही.

मी सायन्सला प्रवेश घेतला होता इथपासून माझे वडील संपावर आहेत, आजारी असतात, मला पडलेले कमी मार्क्स, शिक्षकांच्या माझ्याविषयीच्या अपेक्षा इथपर्यंत सारं काही अगदी तिने रेकॉर्ड केल्यासारखं. इतके बारीक तपशील तिला कसे व कुठून मिळाले?

पण मुळात हे तपशील मिळविण्याची तिला का एवढी पंचाईत? काय आवश्यकता होती? आमची एवढी अजून पुरती ओळखही झाली नाही. तोवर हे तपशील का?

मी एक चविष्ट विषय (शिक्षकांच्या) स्टाफरुमध्ये आहेच. परंतु विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा माझ्या आयुष्याची लक्तरे खूप प्रिय दिसतात.

२५ जुलै १९८३

सकाळी भारतीबरोबर बोलत होतो. ती म्हणाली, “मी तुला त्या दिवशी बोलले त्याचा तुला राग आला का रे?”

“नाही. बरं वाटलं.”

“का? कोणीतरी आपल्याला अधिकाराने बोललं म्हणून?”

मी “हो” म्हणालो.

तुझी टाचण वही मला दाखव, म्हणून ती मागे लागलीय. तिला सांगितले, “हे बघ. माझी टाचण वही घेऊ नकोस. टाचण एकीकडे आणि मी एकीकडे असे पाठ घेतलेत. टाचणं त्रोटक आहेत. त्यापेक्षा मी तुला आदर्श अशी दुसऱ्या कोणाची तरी वही देतो.”

“नाही. मला तुझीच हवी. कशीही असू दे.”

भारतीचा हट्ट कायम. शेवटी “देतो बाई” म्हणून तिला गप्प केलं.

२६ जुलै १९८३

माणुसकीचे प्रत्यंतर कॉलेजमध्ये नित्याचेच आहे. प्राचार्यांना ग्रंथालयातली पुस्तके -अभ्यासक्रमाची- मिळण्यासाठी अर्ज केला. सरांनी खूप मोठ्या मनाने मला एक सेट मिळवून दिला. १२५ रु. ची पुस्तके मला घेणे कसे शक्य होते?

पुस्तकांशिवाय खूपच अडत होतं. एक मोठी अडचण दूर झाली. जाधवबाईंनी त्यांचे विज्ञानाचे पुस्तक मला दिले होते. ते परत केले आता.

भारतीला ‘विकास’ चा माझा लेख असलेला गेल्या वर्षीचा अंक दिला. ती मागत होती बरेच दिवस.

२९ जुलै १९८३

परवा भारतीला टाचण वही दिली. मी ज्या गोष्टींचा हट्ट करेन, ती गोष्ट मिळविल्याशिवाय राहत नाही, हे तिचे म्हणणे.

आता सूक्ष्म पाठांची टाचणे मागतेय ती. उद्या न्यायची आहेत.

३० जुलै १९८३

बोलता बोलता भारतीने सांगितले की तिचे वडील सुद्धा शिक्षक होते. आता कॉर्पोरेशनमध्ये युनियनचे काम करतात. भांडूपला आमचा बंगला आहे.

‘बंगला’ म्हटल्यावर मी उडालोच. ती घरी ये म्हणतेय. मी हो म्हटलं. पण तिला-छायाला माझा विश्वास नाही. आणि अर्थात मी ‘येईन’ हे आश्वासनच दिलं होतं. निश्चित ठरवलं नाही. माझ्या घरी यायचं म्हणतेय. मी ये म्हटलं.

भारती हट्टी तसेच हळवी आहे. स्वतःचंच खरे करणारी आहे. तशीच निरागस आहे.

१ ऑगस्ट १९८३

१ ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धा झाल्या. मी दुसरा आलो. ताई तर पूर्ण उडाली. सगळ्यांनाच अनपेक्षित निकाल.

दुसऱ्या दिवशी अमृतेबाईंकडून उलगडा झाला. त्यांच्या सोबत परीक्षक असलेल्या बाईंनी पक्षपातीपणा केला. खरेबाई अमृतेबाईंवर चिडल्या की तुम्ही का नाही त्यांना रोखलंत?

या सहपरीक्षक असलेल्या बाई स्टाफमधल्या सगळ्यांच्या नावडत्या. विद्यार्थ्यांच्या तर कपाळातच बसलेल्या. थोड्या थोड्या गोष्टींवरुन चिडणाऱ्या. सहकार्य न करणाऱ्या. आमच्या आधीच्या मुलांनी तर त्यांच्या विरोधात लेखी तक्रारी केलेल्या. अमृतेबाई म्हणाल्या की त्यांनी एकदा का एखाद्यावर डूख धरला की तो कायमचा.

माझ्या निरीक्षण वहीतील निरीक्षणे अपुरी, अव्यवस्थित आहेत या कारणावरुन त्यांनी मागे मला प्राचार्यांपर्यंत नेले होते. खूप बडबडल्या होत्या. पण प्राचार्यांनी मात्र मवाळ सूचना देऊन सोडले. स्टाफमधल्या कुणालाच हे प्रकरण आवडले नव्हते. या बाईंविषयी माझ्या मनात काहीच नाही. स्वभाव म्हणून मी विसरुनही गेलो होतो. आताचा हा निकाल बहुधा त्याच प्रकरणाचा उत्तरार्ध. असो.

गुजरबाई ‘खूप छान बोललास’ म्हणाल्या. खरेबाईंनी तर ‘गिरगावातल्या साहित्य संघात एखाद्या वक्त्याचे भाषण ऐकतेय असे वाटले’ अशी प्रशंसा केली.

त्याच दिवशी संध्याकाळी नाचाची प्रॅक्टिस होती मुलींची. मी आणि ताई बोलत होतो. भारती-छाया होत्या. ताई न राहवून म्हणालीच शेवटी – “आलेल्या वसंताला सामोरे जा.”

मी मौन. “विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे.”- ताईचे मागे लागणे. मी मौनच राहिलो. विषयांतर करीत होतो.

त्या प्रश्नाचे उत्तर आज ताईला दिले. व्हरांड्यात आम्ही उभे होतो. छाया, भारती येत होत्या. त्यांना थांबवले. म्हटले –

“ताई, यांची ओळख. या दोघी माझ्या नव्या बहिणी.”

ताईला निश्चितच ते खूप लागले असावे. पण तिने त्यांचे हसून स्वागत केले.

नंतर ताईला हसतच म्हटले – “त्या दिवशीच्या तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळालेच असेल.”

६ ऑगस्ट १९८३

आज ‘बहादुरशाह जफर’ वर कॉलेजच्या हॉलमध्ये बोललो.

९ ऑगस्ट १९८३

विद्यार्थी प्रतिनिधी सभेचे उद्घाटन आज झाले. सांस्कृतिक समितीची सचिव म्हणून ती आणि वाङ्मय समितीतर्फे मी व्यासपीठावर शेजारी शेजारी बसलो होतो. ती म्हणाली, “खोकतोयस. डॉक्टरकडे गेला नाहीस?”

ही चौकशी, काळजी कशाला आता? आणि किती दिवस? आयुष्यात सोबतीने चालायचे ठरले होते आपले. आता एकट्याचाच प्रवास असणार आहे.

भारती, छाया माझ्यावर रागावल्यात असे अशोक हिरेकडून कळले. तसाच गेलो त्यांच्याकडे. तर त्या बोलायला तयार नाहीत. मी हल्ली भेटत नाही, अशी त्यांची तक्रार होती. कशीतरी समजूत काढली त्यांची.

हल्ली एक वेगळी डायरी मी लिहू लागलोय. मी ती वर्गातच लिहितो आहे. ‘मेरीस...’ उद्देशून. काहीतरी असंबद्ध असेच उमटत जाते. मेरीला उद्देशून लिहिले, तरी तिला न देण्याचा इरादा आहे.

१० ऑगस्ट १९८३

तिने निरोप दिला – “तुला माझ्या मावसभावाने भेटायला बोलावलेय.” तिच्यामुळेच त्याच्याशी ओळख, काहीशी मैत्री झाली होती. त्याला भेटायला कोळीवाड्यात गेलो. त्याच्याकडून निघालो नि चालताना धुंदीत सरळ पुढे गेलो. पाहतो तर मी वेश्यांच्या वस्तीत येऊन पोहचलो होतो. थवेच्या थवे नटून थटून गिऱ्हाईके बोलावित होते. भयानक किळस आली. मलाही बोलावत होत्या. कधी तिथून बाहेर पडतोय असे झाले. अक्षरशः पळ काढत चालू लागलो. बघतो तर मी पुन्हा तिच्या मावसभावाच्या बिल्डिंगजवळ येऊ पोहोचलो होतो. ...अगदी भूलभुलैया!

११ ऑगस्ट १९८३

मधल्या सुट्टीत हात धुवायच्या-पाणी पिण्याच्या ठिकाणी आमची गाठ पडली.

तिने विचारलं – “मावसभावाला भेटलास का?”

मी “हो” म्हटले.

“काय बोलला?” तिने अधीरतेने विचारले. तिच्या-माझ्याविषयी काही बोलणे झाले असेल असे तिला वाटले.

मी म्हटले, “आम्ही घरातच बसलो होतो. काहीच विशेष बोललो नाही.”

बोलता बोलता तिने ओले हात पुसायला माझ्या हातातला रुमाल घेतला.

हे सूक्ष्मत्वाने उलगडणारे तिचे मन माझ्या मनात रण माजवून गेले.

......

भारती-छाया पुन्हा माझ्यावर रागावल्यात – मी त्यांच्याशी बोलत नाही म्हणून.

१५ ऑगस्ट १९८३

परवा कॉलेजमध्ये गीतगायनस्पर्धा झाली. ती पहिली आली. तिचे अभिनंदन करु शकलो नाही. रात्री अखेर असह्य होऊन ताईला पत्र लिहिले. त्यात पूर्ण व्यक्त झालो.

गेल्यावर्षी ती या स्पर्धेवेळी अनुपस्थित होती. तिला ‘ए मेरे वतन के लोगों’ गाताना ऐकण्याची खूप इच्छा होती. यावेळी ती पूर्ण झाली. गाणं ऐकताना मी रडलो. तिचे अभिनंदन करण्याच्या स्थितीत नव्हतो. ताईलाच आता अभिनंदन करायला सांगितले आहे.

१७ ऑगस्ट १९८३

कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत ‘नससम्राट’ मधील प्रवेश बसवायचं चाललंय. मीच ठरवलंय. तिला ‘नलू’ च्या भूमिकेसाठी यायचंय. मला हेच नकोय. ताईला लिहावेसे वाटतेय, प्लिज तिला नाही म्हणून सांग. मला सहन होणार नाही.

रिहर्सलसाठी एकत्र येणं. त्याच यातना. सुरे पोखरु लागतील धमन्या.

२१ सप्टेंबर १९८३

पहिल्याच रिहर्सलसाठी एकत्र आलो आम्ही. सुरु होण्याआधीच मी सगळं उधळून दिलं. माझा संयम सुटला होता. ताई व मी त्यावेळेपासून बोलत नाही. मी तसा पूर्णतः संपर्क तोडला आहे.

कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर लहू, रमेश, गौतम यांनी आग्रह करुन एखादं तरी स्वगत म्हणायला विनवलं. मी मानलं. दोन स्वगतं म्हटली. अभिनय, वेशभूषा, प्रभावी ठरली. सगळ्यांकडून वाहवा मिळाली.

४ नोव्हेंबर १९८३

सभोवार फटाके बेमुर्वत फुटताहेत.

आज दिवाळीचा पहिला दिवस. मी दरवर्षीसारखा आर्त झालो नाही, हे विशेष.

ही डायरी आता रात्री विकत घेतली. अचानक. पूर्वीची वही अर्धवट राहिली. बराच काळ लिहायचं थांबावावं असं वाटत होतं. तसं ठरवलंही होतं. पण अचानक ही डायरी घेतली. आता नित्यनेमाने. मात्र वाटेल, जमेल तितकंच लिहायचं.

लिहिणं सोडलं तर मी स्वतःला सोडलं, असं होईल का?

मला लिहिलं पाहिजे.

...पण काय लिहायचं?

डोक्यात संभ्रमाचे भुंगे. क्रॉसिंगवरील गाड्यांच्या हॉर्न्सचा कर्कश आवाज. त्यात एक लांबच लांब फटाक्यांची माळ मेंदूभर. मेंदू बधीर.

निश्चित कुठे जायचं...?

५ नोव्हेंबर १९८३

माझे सामाजिक जीवन मी का चितारत नाही?

पूर्वीपासून मी हे लिहीत नाही. लोकांसमोरचं ते जीवन आहे, हे त्यास कारण आहे का?

काही निश्चित आकळत नाही.

ही डायरी माझ्या जीवनातला सामाजिक संदर्भ दाखविण्यास बिल्कुल लायक नाही. डायरी लिहितात त्यातून व्यक्तीचे जीवन चरित्र समजते. इच्छा, आकांक्षा, काही गुपितं, अभिवृत्ती समजते. मी लिहितोय त्यातून यातलं कितीसं स्पष्ट होईल?

ठीक आहे. मी माझ्या आतल्या विश्वाऐवजी दुसरं काहीच मुक्तपणे इथे मांडू शकत नाही, हे मला पूर्ण पटलं आहे. आता उगीच निष्फळ प्रयत्न इतर काही लिहिण्याचा करायचा नाही.

आता लिहायला घेतलं नि बऱ्याच स्मृती दाराशी घोटाळू लागल्याहेत. दिवसेंदिवस माझ्याकडून नकळत विस्मरणाचा प्रयत्न होत चाललाय असे वाटतेय.

पण ते कितपत शक्य आहे, याची पूर्ण खात्री याक्षणी तरी मला आहे. विस्मरण चांगले. पण यातना शमण्यापुरते. माझ्या कितीशा यातना शमल्या..?

कुठवर हे प्रश्न..?

ठीक आहे. आता डोळ्यांवर झोप प्रचंड शिळा ठेवू पाहतेय. आटोपतो. आता असेच होणार. दिवसभर मी अति दमलेला असणार. त्यातच डोळ्यांवर झोप घेऊन मी रात्री लिहायला बसणार. यात काय लिहिणार? कितीसं लिहिणार?

आता झोप येते ही एक जमेची बाजू.

डोळे लवताहेत… बरे… गुडनाईट..!

७ नोव्हेंबर १९८३

सकाळी उठलो तेव्हाच मनाच्या किनाऱ्यावर वेदनेच्या पक्ष्यांचा कलकलाट. आताशा कुठे पाखरांनी दमून पंख मिटलेत.

हटकून अगदी सकाळी मागील संदर्भ आपसूक उलगडत जातात व डंख मारीत राहतात. म्हणून ‘सकाळ’ मला भयग्रस्त वाटते.

याला कारण रात्री पडणारी स्वप्ने असावीत. स्वप्ने स्पष्टपणे आठवतातच असे नाही. परंतु त्यातूनच मागील रंगमंच नव्याने प्रयोग सादर करतो व मनाचा गाभारा घंटेचे ध्वनी असंख्यदा प्रतिध्वनित करतो. दिवसभर त्याच घंटानादात मी हरवलेला असतो.

आजही तसेच. स्वप्न आठवत नाही. तसा आठवण्याचा हल्ली मी प्रयत्नच करीत नाही. शक्य तितकं विस्मरण कसं होईल हेच पाहतो. सध्या दारात कविता येताहेत अशी जाणीव होते. पण मी तिथूनच हाकलून माघारी पाठवतो.

कवितेचं स्वागत म्हणजे यातना मोहळाला आमंत्रण. लिहून मोकळं वाटणं हा नंतरचा आनंद. पण वेदनांचा जो किस मधल्या काळात काढावा लागतो तो खरेच भयंकर!

पण हल्ली जी ‘मेरीस...’ म्हणून छोटी डायरी वर्गातल्या रिकाम्या वेळातच लिहितो आहे, त्यातून लिहिलं जाणारं लिखाण कवितासदृश्यच नसतं का?

ती डायरी वेगळी लिहिण्याची अशातऱ्हेने काय गरज होती?

या ‘मेरीस’ डायरीत बहुतेक असंबद्ध व दुर्बोध लिखाण आहे. त्यात अर्थवाहकता आहे. पण ती मलाच ठाऊक. पण या दुर्बोधतेतून मला एक आगळा आनंद मिळतो. ‘सृजन’मधील लिखाणही असंच काव्यात्म व दुर्बोध असतं. कोणाला समजो न समजो. पुन्हा वाचल्याने मला मात्र आनंद मिळतो एवढं खरं.

९ नोव्हेंबर १९८३

कालपासून दव पडू लागलंय. रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात वातावरणात अलगद पांढुरके मेघ विरळ होत उतरताहेतसे वाटते. थंडी जाणवण्याइतकी सुरु झाली.

हिवाळा...माझा अप्रिय ऋतू. यातनांची वेदना याच काळात तीव्रतेने बोचत राहते.

आज स्वतःत अजून काहीतरी बदल घडवला पाहिजे असं वाटू लागलंय. बर्ट्रांड रसेलचा बुद्धिवादी थंडपणा स्वतःत रुजवावा असं वाटतंय. तसं हल्ली काहीही मनाविरुद्ध झालं तरी मी खळखळ करीत नाही. विद्ध होत नाही. स्थिर होतो. सगळ्याच्या निरर्थकत्वाची पुन्हा उजळणी करतो व मनातच गेलेल्या आयुष्यावर हसतो. धुक्यासारखी झोप मन झाकोळत चाललीय. शरीर कधीच थकलंय. आता झोपतो. काहीही विचार न करण्याचा प्रयत्न करीत.

चिरनिद्रेची सुखदता मनाला चाटून जातेय.

११ नोव्हेंबर १९८३

आताच मित्राकडून परततोय. तिथेच झोपण्याचा त्याने खूप आग्रह केला. पण मी आलो.

होस्टेलवर जेवलो. छायागीत पाहिलं. नंतर वरळी सी-फेसवर आलो.

षष्ठीचा चंद्र पश्चिमेला कललेला. समुद्रात एक रुपेरी रस्ता चमचमतेला. हवेत गारठा. समुद्रगाज.

पुन्हा एकदा वगैरे वगैरे मनभर.

ती...सी-फेस...कविता...इत्यादी.

वास्तव. रुक्षता. भणंग. एकाकी.

तपशील असाच वाढत जाणार. संदर्भ मात्र तोच.

संख्या वाढत जाणार. लक्षणं मात्र तीच.

स्वतःविषयी स्वतःशीच मौन राहता आलं असतं तर..!

१२ नोव्हेंबर १९८३

‘अगर तुम न होते’ बघून आलो. बघताना गदगदलो.

सिनेमातल्या भावनांबरोबर एकरुप होणं, ही फार पूर्वीपासूनची माझी सवय.

बरंच पुढचं आयुष्य तरळलं...

मनाचा कुंभ भरुन आलाय. मोकळा करावासा वाटतेय.

आवरतोय...

चंद्रफुलांनी डवरलेली बाग

...समोर धडधडत पेटली.

संयमाचे साखळदंड कुठवर मनाभोवती ठेवावे?

कुंपणापलीकडे पुन्हा बाग बहरत चालली...

थोड्याच काळात मालकाच्या पाटीचं अनावरण होऊन दिमाखात ते नाव बाग शान म्हणून परिधान करणार...

चंद्र...सगळ्यांसाठी उगवतो.

मला माझ्यासाठीच वाटत राहतो...

रित्या ओंजळी रित्याच राहणार.

सहस्रभेगी हातांची का आता निरर्थक मिलावट…?

शब्दांच्या लाटांनी उधाणली डोळ्यांतून भावनांची भरती;

पण किनारा कोरडा तो कोरडा...

२४ नोव्हेंबर १९८३

ती म्हणाली, “किती कविता केल्यास नंतर?”

“काही नाही.”

“केल्या असशील.”

“अजूनतरी नाही. ती केली ती एकच.”

“केल्यास की दाखव. नुसत्याच नाही. सुनवून दाखव.”

...हे आता कशासाठी? एक काळ होता कविता केली की प्रथम तिला सुनवायचो. ती ऐकते म्हणून कविता करायचो.

शीः! नको त्या आठवणी..!

आता ती कशाला ऐकण्याचा अट्टाहास धरते?

नाकारलेले शब्द ऐकण्याचा हट्ट! निरर्थक!

असे हे विरोधाभास सातत्याने येतात. अनुभवांच्या दालनात यांचाच भरणा अधिक.

तुला कळत नाही का गं! पूर्वीच्या सुनावण्यात ओढ होती नि आताच्या सुनावण्यात फक्त विव्हळणं..!

२७ नोव्हेंबर १९८३

साला सगळंच गूढ. स्त्री एक गूढ. प्रचंड गूढ. तिलाच न उकलणारं.

काही प्रश्नांची उत्तरे न शोधण्याचं ठरवलंय. अनुत्तरित प्रश्नांची संख्या बरीच मोठी झालीय.

३० नोव्हेंबर १९८३

एक वर्गमैत्रिण म्हणाली, “तुझा ‘नटसम्राट’चा फोटो सरांनी तिला दिला. पैसे न घेता. प्रेझेंट म्हणून.”

‘नटसम्राट’मधला प्रवेश मी सादर केलेला. तो माझा स्वतंत्र फोटो. एकूण छान आलाय. तो मी पाहिला. पण असे स्वतःचे कार्यक्रमातले फोटो विकत घेणं मला कधी जमलं नाही. त्यामुळे तो मी विसरुनही गेलो. तो आता (भविष्य कथन करणाऱ्या) सरांनी तिला दिला. भेट म्हणून.

सरांचं हे प्रेझेंट तिने खुशीनं स्वीकारलं का?

आता कुठवर तो फोटो जपून ठेवेल ती?

गेल्या वर्षीचा शिबिरातला माझ्या गटाचा फोटो, माझा फोटो छान आलाय म्हणून विकत घेतला होता तिने. तोही असेल तिच्याकडे.

स्मृतींचे हे जतन मला का रुचू नये कळत नाही. माझ्याकडे कोणताच फोटो नाही.

२ डिसेंबर १९८३

टिळक विद्यापीठाच्या इंग्रजीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळाल्याने तिने माझे अभिनंदन केले. त्यावेळी मी ‘मेरीस’ लिहीत होतो. ते हिसकावून घेत दाखव म्हणू लागली. तिला वाटलं कविता आहेत. मी म्हटलं, या कविता नाहीत.

“काहीही असू दे. मला वाचून दाखव नंतर.”

तिने ओझरत्या काही ओळी वाचल्या. गेली.

मी काय ऐकवू तिला हे?

ती अशी काही बघत बोलते की जसे ते पहिलेच दिवस आहेत. असं कसं साधतं तिला हे?

...अभिनंदनाचे हस्तांदोलन खंबीरपणे करणे तिला जमतच नाही. तिचा हात तिने स्वतःहून पुढे करुनही अलगद हातात दिल्यासारखा वाटतो. हस्तांदोलनातला दुसऱ्या हाताकडून मिळणारा प्रतिसाद ती देतच नाही.

ही सैलता तिची पूर्वीपासून आहे. अगदी तिच्या मनासारखीच.

३ डिसेंबर १९८३

दिवस फारच गतिमान झालेत.

...फारच वेगात चाललोय.

वेदनाही बरोबरच पळताहेत. पण वेगाच्या बेभान नशेत त्यांची जाणीव खूपच बधीर होतेय...

हा वेग कुठे रोधला जातोय पहायचंय.

आयुष्य चित्रपट म्हणून पाहायचं केव्हाच ठरवलंय.

ठीक आहे.

एखादं वळण यायचं नि गती मंद व्हायची...बघू पुढे…

६ डिसेंबर १९८३

चैत्यभूमीवर संध्याकाळी कॉलेजवरुनच गेलो.

आज गुजरबाईंकडून कळलं, माझ्या ‘उदयोन्मुख भारताचे माझे स्वप्न’ या निबंधाला पहिले पारितोषिक मिळाले.

‘विकास’ मध्ये माझी ‘निर्णय’ ही कथा छापून आली आहे.

१८ डिसेंबर १९८३

आज ‘विकास’ चे प्रकाशन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. मला, अशोकला बक्षिसे मिळाली. मी पहिला. अशोक दुसरा. बक्षिसे बाळासाहेबांच्याच हस्ते मिळाली. (बक्षीस घेताना हात न जोडता मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. अशोकनेही तसेच केले असावे. हा कार्यक्रम शिरोडकर हॉलमधला. बाळासाहेब ठाकरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी खूप गौरवपूर्ण बोलले. वास्तविक, कार्यक्रम काही बाबासाहेबांविषयी नव्हता आणि बाबासाहेबांचे अनुयायी लक्षणीय संख्येने तिथे असण्याचा तर प्रश्नच नव्हता. शिवसेनेने ‘रिडल्स’चा प्रश्न छेडला तो १९८७ साली.)

२० डिसेंबर १९८३

काल सुट्टी होती. मुक्तानंद हायस्कूलमध्ये ग्रंथालीचे पुस्तक प्रदर्शन भरले होते. तिथेच तिच्या अभिनव वाचक चळवळीचा लहूला सदस्य बनवले. निम्म्या किमतीने पुस्तके मिळणार. लहू व मी खरेदी करणार. अर्धे-अर्धे पैसे भरणार. ग्रंथालीचा हा उपक्रम फारच लाभदायक आहे.

२६ डिसेंबर १९८३

आज ताईचा वाढदिवस.

मी गेलो नाही. तिचे आमंत्रणही नव्हते.

असते तरी गेलो नसतो.

या वाढदिवस प्रकाराविषयी मला पूर्वीपासून एक प्रकारची अढी आहे.

२७ डिसेंबर १९८३

ग्रंथालीने काढलेलं ‘संकल्प’ वाचून हातावेगळं केलं. पुस्तक झपाट्यात वाचलं. होतंच तसं. सामाजिक जाणिवांनी भारलेल्या कार्यकर्त्यांची मनोगतं, निरीक्षणं, मुलाखत असे या पुस्तकाचे स्वरुप आहे. एकूण संजीव खांडेकर या संपादकाचे श्रम खूपच कारणी लागले. कारण सामाजिक चळवळीच्या चिंतनाचे एक मोलाचे संदर्भ पुस्तक म्हणून त्याचे महत्व आहे.

२८ डिसेंबर १९८३

संध्याकाळी अस्वस्थ होत होतो. काहीतरी आतून बाहेर येऊ पाहत होते. पण मन अधिक अधिक खोल जात होतं. बस्स!

सारे शब्द विस्कटून टाकले. प्रवाहात सामील झालो. नंतरचे व्यवहार मनाला झिडकारुन पार पाडले. आता बरे वाटतेय.

दुःख गोंजारण्याची सवय वाईट म्हणतात. काहींना दुःखाची नशाच चढते. ते त्यांना सारखं हवं असतं. जसं मीनाला हवं होतं तसं.

आता ‘मीना’ बऱ्याच दीर्घ काळात जवळ केली नाही. दुःखालाही जास्त काळ जवळ थांबू दिलं नाही.

कवितेपासून ‘कर्ता’ म्हणून दूर जाणं, काहीसं यामुळेच.

१ जानेवारी १९८४

आजच विशूचं लग्न झालं. ‘कविता दशकाची’ त्याला भेट दिली. पुस्तकावर लिहिलं :

‘खरं तर प्रवाहच असा बेदिल

की अंतरत गेलो आपण

अगदी आपसूक,

नि रिती झाली आपली

मध्यरात्रीची ‘दुकानं’ही...

प्रवाहाच्या बेदिली आधी

माझ्या बऱ्याच वळणांचा

आलेख

असायचा तुझ्याजवळ मौजूद.

आताची वळणे तुला अपरिचित

कदाचित कायमचीही...

विशू,

अब मुझे गम नही कि दुकान उजड़ गया

बहोत खुश हूँ मै कि दोस्तने घर बनवाया

तुम्हे घर मुबारक;

घर की ‘देवता’ मुबारक;

नयी जिंदगी मुबारक...!’

विशूच्या पत्नीचं नाव देवता. जोडी साजेशी व सुस्वरुप आहे.

एकूण विशू आता ‘संपला.’ एक काळ होता आमच्या मध्यरात्री मैफिली रंगायच्या. मनमुराद रात्र भटकंती. अगदी पूर्ण मोकळं होणं. आता सारं संपलं. हळूहळू संपत गेलं. आता तर काहीच शिल्लक नाही. भुजंग गेला. दीपक गेला.

लग्न माणसाला वेगळं करतं?

१३ जानेवारी १९८४

दिवस थोडे उरलेत.

जेमतेम दोन महिन्यांपर्यंत आपण एकमेकांसमोर आहोत. नंतर कदाचित आयुष्यात आपण समोरासमोर येणार नाही. तुला भेटावं असं वाटेल, असं वाटत नाही.

अन् माझं तर –

जाऊ दे.

२९ जानेवारी १९८४

कुठूनतरी कानावर आले. ती कोणाला तरी म्हणत होती – “हा गरीब आहे. शिवाय तोही मास्तर. मीही शिक्षिका. काय सांगावं तो पुढे जाईल की नाही?”

माझे घर पाहिल्यानंतर तिचा नकार दृढ झाला का?

मला पाहून, माझे बोलणे, विचार ऐकून माझ्या परिस्थितीचा अंदाज येत नाही. तिथे गफलत होते हे खरे.

१ एप्रिल १९८४

३० मार्च कॉलेजचा निरोप समारंभ. मी प्रतिकूल मनःस्थितीत होतो. बोललो नाही. अशोकने माझे प्रतिनिधीत्व केलं.

३१ मार्च वर्गाचा निरोप समारंभ. त्याला गेलोच नाही.

प्राचार्यांनी विचारल्यावर अशोकने सांगितले – “त्याची मानसिक स्थिती चांगली नाही.”

प्राचार्य म्हणाले – “तो अधिक भावनाप्रधान आहे.”

गुजरबाई रडल्या. आमचं तिघांचं – मी, ताई, अशोक – कौतुक करुन आमचं कार्य पाहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

आजपासून नव्याने आयुष्याला सुरुवात.

पासाच्या पाकिटात एक कोरा कागद ठेवला होता. त्यावर केवळ तिचे नाव लिहिले होते. तेवढा भाग फाडून टाकला.

कोऱ्या कागदाला भोक पडलेले दिसतेय.

सारं काही संपलं.

या क्षणी मी आतल्या आत गुदमरतोय असे वाटतेय. खदखदणं सुरु आहे. विस्फोट होत नाहीये. मी रडत नाहीये. मोकळा होत नाहीये. मी बधीर होतोय की काय?

७ एप्रिल १९८४

‘हम वफा करके भी तनहा रह गये

दिल के अरमां आँसुओं में बह गये...’

सलमा डायरीत अशीच नोंद करते. गाते. दर्द तिच्या सुरांतून, डोळ्यांतून वाहत असतो.

३१ मार्च. दुसऱ्यांदा ‘निकाह’ पाहिला. कॉलेजचा शेवटचा दिवस. संपल्याची ग्वाही. अगदी त्याच दिवशी ७२ सालात मीना गेली. मीनानंतर तीच ‘प्यास’ दिसली ती सलमाच्या डोळ्यांत.

____________________

डी.एड. चा निकाल लागण्याआधीच नोकरी मिळाली. पार्ल्याचे माधवराव भागवत हायस्कूल. शिक्षकी सुरु झाली. वर्षानंतर चेंबूरचे मुक्तानंद हायस्कूल. तो भाग -

____________________

२३ जून १९८४

आठवडा संपला. रात्र संपून सकाळ व्हावी तसा. अगदी वेगात. नवं काय मिळवलं? काही नाही. किमान वर्तमानपत्र तरी पूर्ण वाचावयास मिळावं, तर तेही नाही. सकाळी आवराआवर करुन धावत शाळा गाठावी. संध्याकाळी परतता परतता रात्र व्हावी. शाळा हेच माझं सध्याचं जग.

मुलांशी संपर्क. त्यांना घडवण्यात आपला हातभार. स्वतःचं काही देता येतं हे समाधान. असं असूनही नोकरी म्हणून पडणाऱ्या मर्यादा सहन होत नाहीत. या नोकरीत माझ्या आयुष्यातला बहुमोल वेळ, कालावधी व्यर्थ घालवतोय असं वाटतं. नोकरीच्या अशा पिंजऱ्यात मुक्त गगन भरारी स्वप्न होऊ लागलंय.

मला घर चालवण्यासाठी पैसा हवाय. त्यासाठीच तर नोकरी धरली. इतर मार्गांनी, ट्युशन्स वगैरेतून मला मिळकत झाली तर नोकरी मी करणारच नाही.

आमचा पगार रिझल्ट लागल्यानंतर प्रपोजल पाठवणे वगैरे उठाठेवी केल्यानंतर होणार. ऑगस्ट-सप्टेंबर उजाडेल बहुधा.

रिझल्टच्या बाबत शंकांची वटवाघळं मध्येच मनाच्या गुहेत फडफडतात आणि नोकरीची निश्चिंतताही दूर जात असल्याचा भास होतो.

वडील पैसे कुठूनतरी बघ म्हणून मागे लागलेत. ही वेळ कशी टळतेय समजत नाही.

आमची स्थिती बिकटतेच्या टोकाला आली असे अनेक क्षण बाबांच्या संपापासून आले. त्याचबरोबर त्या प्रत्येक क्षणी मदतही मिळाली. तशीच मदत यावेळीही लाभली व माझा रिझल्ट समाधानकारक लागला तर ही बिकट वेळ सध्याच्या डळमळीत काळातली शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

......

ताईला पत्र लिहिलेलं फाडलं. दुसरं लिहिलं. त्यात एवढंच नोंदवलं –

‘ताई,

मी चुकलो. मला माफ कर.

सुरेश’

यापेक्षा अधिक लिहून काय साधणार होतो? स्वतःचं समर्थनच. आता समर्थनाला वेळही नाही व ते समर्थन ताईच्या यातनाग्रस्त मनापुढे व्यर्थ आहे. आपलं व्यक्त होणं दुसऱ्याच्या समजण्यावरच प्रवाही, मोकळं होत असतं. दुसरा समजण्याच्या स्थितीत नसेल तर ते आतच अव्यक्त राहणं ठीक आहे.

स्वतःला ‘एकटा’ करण्यात यशस्वी होत चालल्याची खात्री वाटू लागली आहे.

२६ ऑगस्ट १९८४

अखेर शाळेत रुळलो. रुळणं अपरिहार्य होतं. मुलांची माझ्याबद्दलची मते चांगली आहेत. ६ वीतल्या एका मुलीनं पिरिअड संपल्यावर आपणहून सांगितलं, “सर, तुम्ही छान शिकवता.”

मी छान शिकवतो, याचं मलाही भान आहे. आमच्या सुपरवायझर कालेलकर बाईंनी सुद्धा माझा पाठ ‘ऑब्झर्व्ह’ केल्यानंतर कौतुक केलं.

शिक्षक इथेच समाधान पावतो.

...पण मी समाधानी आहे?

२८ ऑगस्ट १९८४

शाळा हेच माझं जग झालं आहे. सकाळी १०.३० ला चेंबूरला गाडी पकडली की रात्री १० ला चेंबूरला परतायचं.

शाळा तशी ५.५० ला संध्याकाळी सुटते. पण मला शाळेच्या वेळाव्यतिरिक्त ८ वाजेपर्यंत चालणारा अभ्यासवर्ग सांभाळावा लागणार आहे. त्याचे मासिक १०० रु. मिळतील असा अंदाज आहे.

मी आणि अशोकने पुण्याला एफ. वाय. बी. ए. ला प्रवेश घेतला. पाटील सरांची मदत झाली. आम्ही तिकडे रेग्युलर स्टुडंट असणार आहोत. प्रत्यक्षात आम्ही इकडेच. कारण ‘पत्रद्वारा’ पद्धत पुणे विद्यापीठात आमच्यासाठी नाही.

(मुंबईत बी. ए. साठी १२ वीची अट होती. त्यामुळे मुंबईत प्रवेश शक्य नव्हता. पुणे आणि शिवाजी विद्यापीठात मात्र डी.एड.ची दोन वर्षे ही ज्युनिअर कॉलेजला समांतर धरली जात असत. तिथे १२ वी उत्तीर्ण असण्याची अट नव्हती.)

सुरेंद्राच्या पत्राला उत्तर लिहिलं – ‘दिवस महिन्याच्या डब्यात बसून वर्षांच्या गाडीने कधीच निघून जातील. आपण म्हातारे होऊ व येणाऱ्या भावी पिढीकडे आशाळभूतपणे पाहत बसू.’

शेवटी असंच होणार की काय?

माझा मार्ग वेगळा आहे.

समाजात काहीतरी सुधारित बदल हवाय. तो घडवायचा आहे. पण नेमका कसा? समाजाचे निश्चित स्वरुप काय? आपण नेमके कुठे आहोत? आपल्या शक्ती तसेच मर्यादा कोणत्या?

असे अनेक प्रश्न सोडवायचे असतील तर अभ्यासाची गरज आहे. समाज जवळून न्याहाळण्याची, त्याचे अंतःप्रवाह अजमावण्याची गरज आहे. अन् यासाठी मोकळ्या वेळेची आवश्यकता आहे. हा मोकळा वेळ अर्थातच नोकरी न करण्यानेच मिळू शकणार आहे.

नोकरीतून मी मुक्त होऊ शकेन?

प्रश्नाचं उत्तर ठामपणे ‘नाही’ असं द्यावं लागेल. माझ्या पगाराच्या अपेक्षेत घर व कर्ज आहे. आई, वडील, भावाचे शिक्षण, आजवरचे कर्ज माझ्या पगाराचे वाटेकरी आहेत. त्यात आई-वडिलांचे आजारपण फार त्रासदायक आहे. या कचाट्यातून डोके वर काढणे केवळ अशक्य!

अशावेळी स्वतःचं ‘मी’ पण विसरुन जाणं शहाणपणाचं ठरतं. मी कोण आहे? मला कुठे जायचंय? अशा प्रश्नांना बधीर होऊन बगल देणं हाच यावर पर्याय ठरतो.

पण हेही मला कठीण आहे. अत्यंत दुर्दम्य इच्छाशक्ती माझ्या ठायी आहे. मी यातून निश्चितच मार्ग काढेन याची राहून राहून खात्री वाटत असते.

वय वर्षे १९ पूर्ण. या वयात नोकरी करावी लागतेय. कॉलेज गाजवण्याची धमक असूनही ते करु शकत नाही. कॉलेजला न जाताच ते पूर्ण करावं लागणार आहे.

३ सप्टेंबर १९८४

सकाळी बँकेत जाऊन पहिला पगार घेतला. एकूण ८३४ रु. २० पैसे. आयुष्यातला नोकरीचा म्हणून पहिलाच पगार. आई-बाबांच्या हातात देताना आम्हा सगळ्यांनाच भरुन आलं होतं.

आठ पूर्ण नोटा होत्या. पण सगळ्यांना वाटा फुटल्या. मी फक्त बघत राहिलो.

अतीव समाधान – मी कमावता झालो. बरबाद होता होता घर वाचलं. आता ओढगस्तीत का होईना घर जगेल.

माझ्याकडे बुद्धीची धार आहे. पण बुद्धीच गंजत पडलीय. झेप घेण्यास बळकट पंख आहेत. परंतु, त्यांना दोरीने आवळून एकत्र बांधलंय. डोक्यात योजना, कल्पना आहेत; पण त्यांची वलये फक्त रांजणातच उमटतायत.

माझ्या या कथासूत्रात ‘क्लायमॅक्स’ हवाय. पण वास्तववादी कलात्मक कथानकात क्लायमॅक्स असा नसतोच.

मग..?

११ सप्टेंबर १९८४

आमच्या गावात एक शिक्षिका आली आहे. ती बौद्ध आहे. तिनेही याच वर्षी डी. एड. केलं आहे. वयाने १९ च्या दरम्यान आहे. वहिनीची कल्पना मी तिच्याशी लग्न करावे. आई-बाबाही या बातमीने उल्हसित झालेत. करुन टाकूया म्हणताहेत.

याबाबत मला नेमकं काय वाटतं?

प्रथम लग्न न करण्याच्या निर्णयानं ही गोष्ट मनातून उडवून लावली. पण नंतर मात्र घरची स्थिती, माझा होत चाललेला कोंडमारा, यातून बाहेर भरारण्याची आत्यंतिक खोल ऊर्मी, म्हाताऱ्या आई-वडिलांचा शेवटच्या घटकांचा संतोष इ. बाबींनी मनाची चाके उलटू लागली.

मी हिच्याशी लग्न केलं तर –

ती शिक्षिका आहे. ती नोकरी करील. संसार, घर चालवण्यास ही फार मोठी मदत. आई-वडिलांना स्वतःचं माणूस मिळाल्याचा आनंद होईल. घर सर्वस्वी माझ्यावर अवलंबून ही स्थिती राहणार नाही. काही काळाने मी नोकरीतून काढता पाय घेऊन वाचन, चिंतन, लेखन व कृती करु शकेन. कामजीवनाला मुकलो अशी मध्येच बोच मनाला लागणार नाही.

प्रश्न..?

मी तिच्या शरीराशी लग्न करणार का?

मनाची समरसता ही आजवरच्या अनुभवातून गौण ठरतेय. तरीही वरचा मूलभूत प्रश्न माझ्याबाबत राहणारच. तडजोड, समायोजन म्हणून काही काळ मी अभिनय करेन. पण पुढे-मागे संघर्षास तोंड फुटणारच नाही कशावरुन?

सामाजिक क्षेत्रात भणंग होऊन भटकणं; तेही तिच्यावर घर सोपवून, हे तिला कितपत पटेल, मानवेल?

माझ्या ‘मीना’च्या एकाकीपणाच्या नशेचं काय? धड तीही नशा भोगता येणार नाही व धड संसारात रमणार नाही; मधल्या मध्ये त्रिशंकू तर होणार नाही?

मुले होणं, त्यांचं मोठं होणं, त्यांच्याविषयीच्या जबाबदाऱ्या वाढणं, त्या पार पाडताना दमछाक होणं ही कल्पना फार दूर ठेवली होती मनापासून मी. कारण ही बाब मला बिल्कुल सोसणारी नाही. इथे मला पलायन करणे जमेल का?

आता वर लिहिलेले संभाव्य फायदे अनुभवायला या संसाराच्या अपरिचित चक्रव्यूहातून बाहेर पडणं शक्य होईल का?

१८ सप्टेंबर १९८४

मी आता नित्यनेमाने पैसा कमावणारा झालो. माझं कमावतेपण हे किती समाधान देणारं आहे, याचा अंदाज मी ज्या स्थितीत वाढलो, त्या स्थितीतल्या व्यक्तीलाच येऊ शकतो.

डायरीत दारिद्र्यामुळे घरची होणारी दशा, माझ्या मनाची ससेहोलपट मी कधीच पूर्णतः मनमोकळेपणाने व्यक्त केली नाही. त्यामुळे डायरी वाचून माझ्या आर्थिक स्थितीबाबत सत्य आकलन होणं कठीण आहे.

अर्थात डायरी लिहिताना लिहिलेलं स्पष्ट, पूर्ण, सर्वांना समजेल असे असावं हे मला कधीच पटलेलं नाही. त्यामुळेच मनाची स्पंदनं ‘प्रेम’ भावने संबंधातच अधिक करुन डायरीतून ऐकू येतात.

मीना, गुरुदत्त मी माझे मानतो. परंतु, ती दोघंही श्रीमंत होती. माझ्या व त्यांच्या व्यथा निर्माण होण्यामागची कारणं अलग आहेत. ‘पैसा’ हा माझ्या व्यथानिर्मितीचा फार मोठा प्रेरक घटक आहे.

मीना, गुरुदत्त एकटे एकटे राहू शकले. मी राहू शकतो?

नाही. एक कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे. माझ्या पायांत, हातांत मजबूत साखळदंड आहेत. ते तोडावेत तर या कुटुंबाचा सर्वनाश करावा लागेल.

हे कुटुंब किमान स्थिर असावं, तर तेही नाही. पगार होऊन आठ दिवस झाले नाहीत, तोवर वडील इतरांकडे खर्चासाठी पैसे मागू लागले.

माझा पगार घरी पुरत नाही. कर्ज व खर्च दोन्ही सांभाळण्यासाठी माझा पगार अपुरा आहे.

हल्ली सतत मनात येतं, पैसे मिळवण्यासाठी अजून काहीतरी केलं पाहिजे. किमान घर स्थिर ठेवलं पाहिजे.

क्लासेस चालवणं हा एक पर्याय माझ्या अखत्यारीतला आहे. पण ते करण्यासाठी वेळ नाही. पुढच्या वर्षी चेंबूर किंवा जवळपास एखाद्या शाळेत नोकरी करुन क्लासेस करता येणं शक्य होईल.

आयुष्यातला उमेदीचा काळ कदाचित घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा दवडावा लागणार आहे.

प्रश्न स्वतःचा. उत्तरंही स्वतःच शोधली पाहिजेत.

३१ ऑक्टोबर १९८४

इंदिरा गांधी यांची हत्या.

एका अजिंक्य सम्राज्ञीचा आज अंत झाला.

सकाळी ९.२०. खोलीबाहेर पडताच बाहेर उभ्या अंगरक्षकांनी स्टेनगनने गोळ्या घातल्या. १६ गोळ्यांनी अक्षरशः चाळण केली असणार. (नंतर हा आकडा २९ होता असे कळले.)

मृत्यू ११ वाजता झाला. पण रेडिओला उपचार चालू आहेत म्हणून सांगण्यात येत होतं. त्या दरम्यान उच्चपदस्थांची बैठक सुरु होती. सायंकाळी ६ वाजता रेडिओला निधन झाल्याची स्पष्ट बातमी दिली गेली.

भारताला हादरा देणारी ही बाब आहे.

बाहेर रस्त्यावर शुकशुकाट झाला. दुकाने, हॉटेले, थिएटर सर्व बंद. स्मशानकळा पसरलेली.

रेडिओवर, टी.व्ही.वर दुःखार्त संगीत सुरु आहे. अर्ध्या-अर्ध्या तासाने बातम्या दिल्या जात आहेत.

इंदिरा गांधी मरेपर्यंत पंतप्रधान राहणार ही माझी खात्री होती. आज त्या पंतप्रधान म्हणूनच गेल्या.

इंदिराजींच्या कर्तृत्वाची बरी-वाईट गोळाबेरीज केली तर भारताला त्यांच्यासारखं समर्थ नेतृत्व कोणाचंच लाभलं नाही, हे शंकातीत. इंदिराजींचं नेतृत्व भारताला दिलासा देणारं होतं.

आता यानंतर देशाचा पंतप्रधान राजीव गांधी निवडला गेला आहे. ही बातमी न पसंद पडणारी. (लोकशाहीत रक्ताचा वारस का?) पण येणाऱ्या निवडणुकीत खरं भविष्य ठरेल.

धोरण व निर्णय यातील मुत्सद्दीपणा, मनाची प्रचंड खंबीरता असलेला एकही नेता आज नाही. खऱ्या अर्थाने भारत अनाथ वाटू लागलाय.

३ नोव्हेंबर १९८४

आज इंदिराजींची अंत्ययात्रा. दोन दिवस दंगे भडकून ५०० माणसं ठार झालीत. प्रत्येक शीख हा सर्वसामान्य माणसाला हिंसक शत्रू वाटू लागलाय. परदेशी शीख अतिरेक्यांनी या हत्येप्रीत्यर्थ शँपेनच्या बाटल्या फोडून भारतीय वकिलातींपुढे नाचून आनंद व्यक्त केला.

‘खलिस्तानची’ मागणी फारच तीव्र झालीय. मृत्यूस बेदरकारपणे सामोरे जाण्याची धार्मिक प्रेरणा अतिरेक्यांत ठासून भरलेली आहे. हे अलिकडील बऱ्याच प्रकारांवरुन दिसून येते. भारत सरकार या दहशतवादाला यापुढे कितपत तोंड देऊ शकेल कळत नाही.

.....

३० तारखेला मला अप्पूचं म्हणजे अपर्णा बांदकरचं ग्रीटिंग कार्ड आलं. सोबत कळवलं होतं – २७ तारखेला घरी ये. अर्थात वेळ टळून गेली होती व वेळ असती तरी मी गेलो नसतो.

डी. एड. च्या सर्व स्मृतिघटकांपासून दूर जाणं, हा माझा विचार असताना अशातऱ्हेने घरी जाणं बरं ठरेल का? त्यात अप्पूच्या घरी तर नकोच!

जवळच भाऊचा धक्का. एका संध्याकाळी अप्पू, मी, अशोक व ती भाऊच्या धक्क्यावर सूर्यास्त पाहत बसलो होतो.

तिचं लगट करुन बसणं. स्वतःची भेळ आग्रहाने खाऊ घालणं.

ते संवाद...

तिचे सूचक शब्द...

निघताना ‘ती बघतेय बघ’ म्हणत आकाशातील चंद्रकोरीकडे निर्देश करणं.

नंतर रस्त्यात –

“डी. एड. संपल्यावर आपल्यातले कोण कुठे जाईल नाही! आता एकत्र आहोत. पुढे वेगळे होणार...” मी म्हणालो.

त्यावर ती – “नाही. आपण एकत्र राहायचंच.”

“पण कसं शक्य आहे हे?” मी.

“नाही. राहायचंच.” ती ठामपणे बोलत होती.

तिच्या मनातली गोष्ट मला नंतर उघड झाली. तोपर्यंत ‘एकत्र राहायचंच’ हा तिचा निश्चय माझ्या डोक्याचा भुंगा करत होता.

हे सारं अपर्णा बांदकरच्या ग्रीटिंग कार्डमुळे प्रकर्षाने आठवलं. मग खूप काही आठवत गेलं. डोकं जडबधीर झालं.

२७ तारखेला अपर्णाच्या घरी तीही असणार. परीक्षेनंतर ती आणि मी समोरा समोर आलोच नाही. आता येऊही नये.

समोर येण्याच्या बऱ्याच वेळा मी चुकवत आलोय. रिझल्ट आणायला वेगळ्या दिवशी गेलो. ताईच्या भावाच्या रिसेप्शनला नाही गेलो. अमृतेबाईंकडे ताई व मी एकदा निघालो होतो. तिथे ती भेटणार आहे हे कळल्यावर काही निमित्त काढून मी जाणे रहित केले.

अप्पूला ग्रीटिंग कार्ड पोहोचल्याची पोच म्हणून पत्र पाठवावं म्हणतोय. पण तेही नक्की ठरत नाही. पत्र पाठवावे तर त्यात काय लिहावे? उगीच फिरुन जुन्या आठवणी येणारच. अगदी रुक्षपणे लिहावं तर कसं...?

लिहावं की नको या द्वंद्वात बराच काळ लोटला जातोय. निर्णय अजून नाही.

४ नोव्हेंबर १९८४

अखेर अपर्णाला पत्र लिहिलंच. तिने ग्रीटिंग कार्ड पाठवलं. त्याची साधी पोच न देण्याइतकार कठोरपणा ठीक नाही. तिला लिहिलं. बरं वाटलं.

१८ नोव्हेंबर १९८४

तिच्या बहिणीच्या लग्नाला मी गेलो नाही. बबनकडे माझ्यासाठीची निमंत्रण पत्रिका दिली होती. ती स्वतःहून भेटण्याचा प्रयत्न करीत नाही, ही एक चांगली गोष्ट आहे. ताईकडे ती येते. माझ्याकडे ताईबरोबर कधीतरी येणं तिला कठीण नाही. तरीही ती येत नाही, ही अत्यंत समाधानाची बाब. बहिणीच्या लग्नाचं आमंत्रण, ही एक औपचारिकता तिने दाखवली, एवढंच. प्रत्यक्ष माझं येणं तिला गृहीत नसावंच.

बहिणीनंतर आता लग्नाचा तिचा क्रमांक. या लग्नाचे आमंत्रण तिने स्वतः देऊ नये म्हणजे झालं. असाच निरोप आला तरी पुरे.

९ डिसेंबर १९८४

वडिलांना प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे मिळाले. १८ हजार रुपये. त्यातले जवळ जवळ १० हजार रु. कर्जाचे जाणार. निदान आता कुणाचे कर्ज उरणार नाही. माझ्या पगारात घरखर्च भागू शकेल.

जाधवबाईंकडे त्यांनी पुस्तकांना दिलेले व एकदा घरखर्चासाठी दिलेले असे दोनशे रुपये त्यांना परत करायला गेलो. परंतु त्यांनी ते घेण्यास नकार दिला.

म्हणाल्या – “दिले ते घेण्यासाठी नव्हे.”

मी आग्रह केला. म्हटले – “बाई, माझी आता ऐपत आहे. मला ऐन गरजेच्या वेळी तुम्ही मदत केलीत, हेच खूप आहे. माझ्यासारखे गरजू अजून कॉलेजमध्ये मिळतील. त्यांच्यासाठी हे पैसे तुम्हाला उपयोगाला येतील. त्यांना तुम्ही देऊ शकाल.”

बाईंनी ठामपणे नकार दिला.

शिरोडकर सरांचे ४५० रु. बाईंकडेच दिले. “शिरोडकर सरांना स्वतः भेटता आले नाही. कारण शाळेच्या वेळात वेळ काढणे जमत नाही. पुन्हा कधीतरी नक्की येईन.” असे बाईंना म्हटले. वास्तविक कॉलेजवर जायला मला मन होत नव्हते. वेळ काढणे तसे फार जड नव्हते.

डी. एड. ला भेटलेली ही सर्व माणसे खऱ्या अर्थाने ‘माणसे’ होती. यांनी माझ्या मनावर आजन्म टिकतील असे आदर्श ठसे उमटविलेत.

(आमचे प्राचार्य अ. ना. जोशी. कडक. बेरकी नजरेचे. त्यांनी मला गणवेश व पुस्तकांवेळी केलेली मदत आधी नोंदवली आहेच. त्यांचे पुरोगामीत्व असे काही बोलण्यात कधी कळत नव्हते. पण एकदा एका उच्चवर्णीय मुलाने राखीव जागांवरुन आमच्यातल्या दलित मुलाला छेडले. आम्ही ती तक्रार घेऊन जोशी सरांकडे गेलो. त्या मुलाला सरांनी बोलावले. ‘तुझ्या आजवरच्या पिढ्यांनी आरक्षण भोगले त्याचे काय?’ या शब्दांत आमच्यासमोर त्याला झाडले.)

२ जानेवारी १९८५

मधल्या काळातली एक महत्वाची बाब म्हणजे मी आणि अशोकने खटपटी करुन शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतला. पुण्याची सेमिस्टर पद्धत जमेलसे वाटेना. वर्षातून दोन वेळा प्रत्येकी १०-१२ दिवस दोनदा सुटी मिळणे नोकरीत शक्य नव्हते. यावेळी पैसे होते, म्हणून हे जमलं. अन्यथा हे वर्ष सोडून द्यायचीच तयारी मी केली होती.

ताईच्या वाढदिवसाला ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ ताईला दिला. लहूकरवी पुस्तक पाठवले. मी आकस्मिक अडचणींमुळे येऊ शकत नाही, असे सांगायला सांगितले. तिथे येणाऱ्यांत ‘ती’ असण्याची शक्यता दाट होती. इतरांना निमित्त पटले. मला तेच हवे होते. ताईला अर्थातच ही थाप आहे हे माहीत होतं.

......

अवि-ताई लग्न करण्याच्या तयारीत आहेत. अविने घर सोडल्यात जमा. त्याच्या आईने चार-पाच दिवसांपूर्वी रस्त्यात मला शिव्या हासडल्या. म्हणाल्या - “माझ्या घरावर विस्तव ठेवलास. देव तुझं कधी चांगलं करणार नाही.”

मी निमूट ऐकलं. हे मनावर घ्यायचं नसतं.

१३ जानेवारी १९८५

आज टीव्हीवर ‘प्यासा’ झाला.

तोच गुरुदत्त. माझ्यातल्या ‘मी’चं एक मूलभूत रुप.

गुरुदत्तला कोणा व्यक्तिविषयी तक्रार नव्हती. ही समाजरचना त्याला नको होती. ही व्यवस्था माणसाच्या जीवनातला खरा आनंद गिळंकृत करुन बसलीय. तकलादू मीनार व्यवहाराच्या पायावर बसवू पाहणे, या अट्टाहासात खोटं हास्य चेहऱ्यावर आणून त्यालाच खरं मानून आपण चालू लागतो.

गुरु, मीना अपरिहार्यपणे माझ्या आयुष्यात प्रवेश करती झाली. आज माझ्या आयुष्याची दोन दशकं पूर्ण होताहेत. उद्या संक्रांतीपासून मला एकविसावं वर्ष लागेल. परंतु ज्या कोवळिकीत मीना, गुरुदत्त जवळचे झाले, ती तीव्रता मात्र अजूनही आहे. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोण अधिकाधिक वस्तुनिष्ठ होत चालला तरी तडजोडीपेक्षा फारकतच घेणं मला पचनी पडतं आहे. मनात आतल्या आत ‘मीना-गुरुदत्त’ जिवंत असणं ही माझी अतूट, अखंड सोबत आहे. एस.एस.सी.ची परीक्षा असूनही एक दिवस पूर्वी ज्या ओढीने मी ‘प्यासा’ पाहिला, त्याच ओढीने आज पाहिला.

१४ जानेवारी १९८५

दुपारी रवींद्र आला होता. त्यांच्या आनंद नगरमध्ये मला व्याख्यानासाठी बोलावत होता. विषय तूच ठरव म्हणाला. त्यांच्याकडून सुचवला गेलेला विषय होता – ‘आंबेडकर व त्यांचे राजकारण’.

मी सांगितलं, “या विषयावर सध्या मी वाचतोय. मी बोलू शकेन. परंतु, माझं वेगळं काँट्रिब्युशन असणार नाही. जे पुस्तकात आहे, तेच मी मांडणार. हे मला पसंद नाही. अधिकारवाणीने एखाद्या विषयावर बोलता आले पाहिजे, असे मला वाटते. म्हणून सध्या मला बोलावू नकोस. काही कालावधी जाऊ दे.”

मी त्याला वेगळं काय सांगणार होतो? व्याख्याता हा फक्त विचारांचा, माहितीचा वाहक असता कामा नये. त्याला स्वतःला विद्यमान परिस्थितीशी त्या विचारांचा, माहितीचा सांधा जोडता आला पाहिजे. तसेच त्या विचाराच्या समर्थनार्थ अगर खंडनार्थ विविध ग्रंथांतले, प्रसंगांतले संदर्भ देऊन स्वतःचे संशोधित अंदाज, तर्क, अनुमान वा संदेश स्पष्ट करता आले पाहिजेत. यासाठी प्रचंड वाचनाची गरज आहे. तीही त्या विशिष्ट विषयाच्या अनुषंगाने.

माझे वाचन त्या अर्थाने अजून काहीच नाही. वाचन आहे. परंतु अभ्यास वगैरे प्रकार तितकासा जोरात नाही. मी बोलू शकतो. भाषण देणे ही गोष्ट मला नवी नाही. वादविवाद ही गोष्टही तशी नवी नाही. परंतु व्याख्यान ही गोष्ट नवी आहे. व्याख्यानात श्रोत्यांच्या अनेकांगी प्रश्नांची उत्तरे देण्याची समर्थता व्याख्यात्यात असली पाहिजे. श्रोत्यांना माहीत नसलेल्या अशा नव्या गोष्टी प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत. व्याख्याता हा ‘मार्गदाता’ या नात्याने तिथे उभा असतो.

यावेळी गावी गेल्यावर लोकांसमोर मी बोलणार आहे. जमल्यास गावोगावी जाईन. स्थिती बघेन. तिथे प्रबोधनपर बोलेन. त्या सामाजिक परिस्थितीत काय करणे, कसे वागणे योग्य आहे, असे मला वाटते ते बोलेन. पण ‘आंबेडकर व राजकारण’ अशा विषयाला स्पर्श करताना स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे बघावे असे मला वाटते. ज्या बाबींवर माझे विचार ठरायचे आहेत, ज्या बाबींत मी अपूर्णता अनुभवतोय ती बाब पूर्णतेचा आव आणून लोकांसमोर कशी मांडू?

१६ जानेवारी १९८५

आता माझा पगार झाला ९१८ रुपये. कर्ज तसे काही नाही. बहुतेक भागलं. आता आई-वडिलांचा आजार व भावाचे शिक्षण. मनावर कुटुंबाचं टेन्शन वगैरे आता नाही. पगार घरात पुरतो. त्यातून बचत अजून तरी नाही. नोकरी वरिष्ठांना समाधानकारक आहे. मलाही दगदग असली तरी हा व्यवसाय समाधान देतोय.

ही माझी सध्याची स्थिती. मनाने मी खंबीर आहे. कुठे गुंतत नाही. अपेक्षा ठेवत नाही. नाजूक स्वप्ने पुढे येण्यास धजत नाहीत. कोणाबद्दल तीव्र आठवण वा वेदना नाही. दिनक्रमात क्वचित बदल होतो. दिवस प्रचंड गतीने पळताहेत.

आर्थिक व मानसिकदृष्ट्या मी स्थैर्य अनुभवतोय.

१९ जानेवारी १९८५

‘....’,

तू आठवत राहतेस पुन्हा पुन्हा. आठ महिने झाले. आपण एकमेकांसमोर आलो नाही.

मी तुला का आठवावं? असं काय तू मला दिलंस?

‘वणवा पेटलेल्या रानातून तो धावत सुटतो बेबंद

वेदनांचे कळप घेऊन...

पोहोचतो तिच्या महालात

ज्वाळांनी लडबडलेले दोन्ही हात समोर करुन विचारतो –

देतेस मला तुझ्या डोळ्यांतील समुद्र?

ती निमूटपणे ठेवते त्याच्या हातात

जळजळीत निखारे

उत्तरादाखल.’

तुला वाचून दाखवलेली ही कविता. तू कविता वाचण्याचा आग्रह केला नव्हतास. मी स्वतःहून वाचली. तू निमूट ऐकलीस. काहीच प्रतिक्रिया न दाखवणं ही सुद्धा एक प्रतिक्रियाच असते, हे आता उमजलं.

परिस्थितीचा वणवा भडकला होता तेव्हां मी तुझ्या डोळ्यांतून ओसंडणारे धैर्य अपेक्षित होतो. पण तूच ढासळत चालली होतीस.

तुला उद्देशून लिहायला लागलो तर धरण कंप पावू लागले. मनाचे बांध असे ढासळू द्यायचे नाहीत. सावरणारं कोणीच नाही. स्वतःच स्वतःला सावरायचं आहे. आजवर असंच स्वतःला सावरत आलो. ताईने तिच्यापरीने आधार दिला. आता पुढेही तिच्याकडून अपेक्षा करायची का?

तुला विसरण्याच्या प्रयत्नात तू अधिकाधिक आठवू लागतेस.

वरील ओळ लिहिली आणि मागील डायऱ्या पेटीतून काढल्या. खूप वेळ गेला. बराच तपशील उगाळला गेला. डोळे पाणावले. मध्येच तुझी चिठ्ठी मिळाली. उघडण्याचे धैर्य झाले नाही.

२० जानेवारी १९८५

सकाळी उठलो. तर रेडिओवर सूर उमटत होते – ‘हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते, मगर जी नही सकते तुम्हारे बिना’

अजब योगायोग..! जे विसरायचं तेच आपणहून पुढे. तिच्या पत्रातल्या सुरुवातीच्या ओळी याच आहेत. हे गाणं ऐकलं की त्या ओळी व त्यामागील सर्व आठवणं ओघानं आलंच.

१६ जून १९८५

गावी असतानाच आमच्या चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलचा कॉल आला. मुलाखतीसाठी एक दिवस मुंबईस आलो. सुमारे ६० जणांमधून माझी निवड झाली. एकच जागा होती. सध्याची ही शाळा घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर. स. ७ ते १२.३०. शाळेत सहकारी उत्तम. प्रशासनाचा दबाव नाही. याआधीच्या शाळेपेक्षा कितीतरी पटीने उत्तम.

४ सप्टेंबर १९८५

जगाला सुखी करु पाहणारी ताई सगळ्यांची आयुष्ये सावरण्याच्या प्रयत्नात विफलताच अधिक साधते...

या चार वर्षांच्या कालावधीत ‘वसंत बहार’ (आमच्या गटाला ताईने दिलेले नाव) शब्द ताईने फोल ठरुनही प्रेमाने कवटाळला. ही प्रचंड जीजिविषा आजही आहे का तिच्यात..?

तत्त्व, भावना, व्यवहार व एकूण समाज व्यवस्था यांचे सूक्ष्म पदर उलगडत जाणारा हा ‘वसंत बहार’ खऱ्या अर्थी ‘वसंत हार.’ मधला ‘ब’ काढला की पुरे. – ‘वसंत (ब)हार’.

ध्येयाने पेटलेले, व्यवहाराशी सांगड घातलेले, डरपोकपणे पळून गेलेले, बधीर होऊन संवेदना गोठलेले, मानसिक संतुलन हरवलेले असे सर्व लोक इथे भेटतात.

‘वसंत (ब)हार’ ही कादंबरी लिहायला हीच सुयोग्य वेळ आहे.

माझे मत लहूने उचलून धरले. तो तटस्थ आहे. तो लिहीन म्हणतोय.

५ सप्टेंबर १९८५

शिक्षक दिनानिमित्त शाळेत परिसंवाद झाला. मी बोललो. प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच. अर्थात चांगल्या.

११ सप्टेंबर १९८५

काल सकाळी सोनलच्या (माझी विद्यार्थीनी) आईने म्हणजे केशकामतबाईंनी (त्या याच शाळेत प्राथमिक विभागात शिक्षिका आहेत.) वर्गावर येऊन माझ्या परिसंवादातल्या भाषणाची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या –

“आमच्याही मनात हे येतं. पण बोलण्याचं धारिष्ट्य होत नाही. याच विचारांची आवश्यकता आहे. सोनल तुमच्याविषयी नेहमी बोलते. आमच्या शनिवारच्या उपासाबद्दल बोलते. आपण शिकवताना हाही वैज्ञानिक दृष्टिकोण त्यांना दिला पाहिजे.”

या प्रशंसेतून माझ्या भाषणाचे प्रभावीपण नजरेस येते. माझ्या विचारांचे मुलं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात हे वारंवार आढळते.

काल संध्याकाळी लिमयेबाईंनी (आमच्या पर्यवेक्षिका) गाठले.

“सर, तुम्ही चेंबूर हायस्कूलमध्ये किती साली होता?”

“मी ८१ ला एस.एस.सी. झालो.”

“तुम्ही फाटक सरांना ओळखता?”

“प्रत्यक्ष नाही. पण त्यांच्याबद्दल ऐकलंय. वाचलंय. मला त्यांना भेटायचं आहे. पण त्यांचा पत्ता मला माहीत नाही.”

“ते माझे वडील.”

मला आनंद झाला. बाईंनी सुचवले - मी भाऊंना भेटावे. त्यांच्याशी चर्चा करावी. पटले तर घ्यावे. नाही तर सोडून द्यावे. ते अभ्यासवर्गही चालवतात.

मलाही हे मान्य झाले. आजवर मी भाऊ फाटक हे नाव कम्युनिस्ट चळवळी संदर्भात ऐकले होते. आमच्या चेंबूर हायस्कूलधले माजी शिक्षक म्हणून पंडित सरांच्या बोलण्यातूनही त्यांचा उल्लेख मी ऐकला होता. भेटण्याची उत्सुकता होती. ती संधी अशारीतीने चालून आली.

लिमयेबाई म्हणाल्या - “कर्वेबाईंकडून (आमच्या उपमुख्याध्यापिका) तुमच्याबद्दल ऐकले होते. तुम्ही सोशल वर्क करता वगैरे. पण आपला तसा संबंध आला नव्हता. मी दुपारी. तुम्ही सकाळी. म्हणून मी बोलले नाही. परंतु तुमचे भाषण ऐकल्यावर मात्र निश्चित भेटावं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला बोलले. आपल्याकडे काही जण मी तुम्हाला खेचलं वगैरे म्हणतील.”

मी म्हटले – “मी झापडं लावलेली नाहीत. माझे विचार ठरताहेत. मी सगळ्यांना जाणून घेतोय. भाऊंना भेटण्यास म्हणूनच मला खूप आनंद होईल.”

लिमयेबाईंचे मिस्टर कमानीच्या युनियनमध्ये आहेत. त्या भाऊंच्या एकुलत्या कन्या. बाईंची मुलगीही काम करते संघटनेचे. ‘मुलगी झाली हो’ ग्रुपमध्ये ती आहे.

शनिवारी भाऊंना भेटायचं ठरवतोय.

वाचून, ऐकून विचार ठरवण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून विचार ठरवणे केव्हाही श्रेष्ठतम.

१३ सप्टेंबर १९८५

आता वांद्र्याहून आलो. तिथे त्रैलोक्य बौद्ध सहाय्यक गणाचे धम्मवर्ग चालतात. जगातील बऱ्याच देशांत असे धम्मवर्ग सुरु करण्यात या संघटनेला यश येत चाललंय. आम्ही ‘धम्म प्रसार प्रबोधिनी’ साठी यांचेच मुख्यत्वे सहाय्य घेतो. धम्मावर अधिकृतपणे टिप्पणी, चर्चा करण्यास योग्य अशी एकमेव चळवळ मला ही वाटते.

धम्म प्रसार प्रबोधिनीच्या स्थापनेपूर्वी धम्माबाबत मार्गदर्शक म्हणून या संघटनेच्या शोधात (वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजच्या शेजारचे होस्टेल) ‘सिद्धार्थ विहार’ वर गेलो. तिथेही यांचे वर्ग चालतात असे कळले होते. गेलो तेव्हा वर्ग बंद होते. तिथेच रतनकुमार पाटलीपुत्र यांच्या रुममध्ये पत्ता विचारावा म्हणून गेलो. पत्ताही मिळाला आणि रतनशी ओळख, चर्चाही झाली.

प्रथम जेव्हा धम्मचारी बोधीसेन यांच्याशी भेट झाली, तेव्हाच आम्ही अत्यंत प्रभावित झालो. बोधिसेनांचे व्यक्तिमत्वच प्रसन्न, तेजःपुंज. बोलका चेहरा. त्यांचे बोलणेही पटकन दुसऱ्याशी मैत्री साधू पाहणारे.

त्यांच्या वर्गाचे वातावरणही प्रसन्न असते.

१५ सप्टेंबर १९८५

काल भाऊ फाटकांशी भेट झाली.

लिमयेबाईंच्या वयावरुन त्यांच्या थकलेपणाचा अंदाज भाऊंना प्रत्यक्ष भेटल्यावर साफ कोसळला. मी अन् लहू होतो. मुत्सद्दीपणा आणि मुरब्बीपणा शब्दाशब्दांतून जाणवत होता. आजवर ज्या ज्या लोकांना भेटलो, चर्चा केली त्या सगळ्यांत भाऊ मुद्देसूद व प्रभावी ठरले. आम्हाला त्यांनी प्रश्नोत्तरांचे बौद्धिक घेऊन अक्षरशः चारी मुंड्या चीत केल्यासारखे वाटू लागले. भाऊंना समोरील माणूस ‘नेमका’ जाणता येतो.

“माणसाच्या सहजप्रवृत्ती आहेत ना?”

“आहेत.”

“मग माणूस युद्ध करतच राहणार. सहजप्रवृत्ती या जन्मजात असतात. तुम्ही कशासाठी समाजसेवा करता? सहजप्रवृत्ती बदलता येत नाहीत. तुमची समाजसेवा म्हणजे गाढवाला घोडा करण्याचाच प्रकार म्हटला पाहिजे.”

“गुलामगिरी प्रतिगामी की पुरोगामी?”

“प्रतिगामी.”

“टोळी युगात कैद्याला ठार करीत. कारण टोळीवाल्यांना अन्नाला आणखी भार नको असायचा. शेतीचा शोध लागला. स्थिर जीवन आले. तीन महिने काम. वर्षभर पुरेल एवढे अन्न मिळू लागले. माणूस अतिरिक्त उत्पन्न काढू लागला. कैद्याला ठार न करता गुलाम करुन कामाला लावले गेले. या कैद्याला जीव न घेता कामाला लावणारा माणूस हा शत्रू वाटेल का?”

“नाही.”

“मग गुलामी प्रतिगामी कशी? उलट ती प्रगतीची एक अवस्था ठरु शकेल.”

अशा प्रकारचे प्रश्न व उत्तरे यांनी मेंदूवरची कवचं उडाल्यागत झाले.

लहू व माझा ते अभ्यासवर्ग घेणार आहेत.

काल भाऊंनी स्त्री मुक्ती संघटनेच्या बैठकीचे आमंत्रण दिले. ती बैठक आज त्यांच्या घरीच होती. ‘मुलगी झाली हो’ हे नाटक शिक्षक दिनाच्या मेळाव्यात आम्ही पाहिले होते. त्याने प्रभावित झालो होतो. त्यात काम करणाऱ्यांची भेट इथे झाली. बैठकीतल्या मिलिंद रानडे, सुजाता खांडेकर, ज्योती म्हापसेकर यांनी पटकन मित्रत्व साधले आमच्याशी.

संघटनेचा उद्देश व सध्याचे कार्यक्रम यात वावगे काहीच वाटत नाही. सारं हवंच आहे असं वाटतं. मग का उतरु नये यात?

१९ नोव्हेंबरला ‘हुंडा घेणार नाही-देणार नाही’ अशी शपथ घेण्याचा कार्यक्रम करायचा तसेच पाळणाघरांची मागणी करणाऱ्या निवेदनावर सह्यांची मोहीम घ्यायची या बैठकीत ठरले.

या सगळ्यात उतरायचे. अनुभव घ्यायचा. यातूनच चळवळीचा पुढील मार्ग मी शोधून शकेन.

.....

महानगरपालिकेचा कॉल आला. पण न जाण्याचं ठरवलं. आताची शाळा इतकी सोयीस्कर आहे की फक्त पैश्यांसाठी म्युनिसिपालिटीत जाणे मला जमणार नाही.

१७ सप्टेंबर १९८५

भाऊंशी झालेल्या चर्चेसंबंधी विस्तृत लिहिले पाहिजे. या चर्चेतला प्रत्येक शब्द मौल्यवान आहे. तो साठवला गेला पाहिजे. पण त्यासाठी खूप लिहावं लागेल. बराच वेळ द्यावा लागेल. हा वेळ आता देणं मला रास्त वाटत नाही. सातत्याने चाललेल्या अभ्यास मंडळातून समग्रपणे जे आढळलं तेवढं लिहिलं तरी पुरे.

भाऊंची विचार करण्याची शैली उत्कृष्ट आहे. कठीण संकल्पनाही व्यवहारातली, सद्यस्थितीतली उदाहरणे देऊन ते पटवतात.

देशाच्या वर्तमान स्थितीत स्वतःचा, उद्देशाचा संदर्भ, स्थान शोधण्यास या अभ्यासाचा खूपच उपयोग होईलसे वाटू लागलेय. कारण विचारांची चक्रे गतिमान होऊ लागलीत. आतापर्यंत तरी ही चळवळ मला, माझ्या उद्देशाला बाधक न ठरता पोषकच ठरेल असे जाणवतेय.

भाऊंच्यात प्रामाणिकता आहे. सत्यप्रियता आहे. चर्चेत त्यांच्या तोंडून बाहेर पडते ते बुद्धाने आधीच सांगितलेले तरी असते अथवा त्याला अधिक सहाय्यक होत असते. नीतिमत्ता, माणसातील चांगुलपणा या बुद्ध धम्मातील कळीच्या बाबी भाऊंनाही कळीच्या वाटतात.

१९ सप्टेंबर १९८५

माझे वाचन अत्यंत तोकडे आहे. समोर तर प्रचंड खंदक आडवा आलाय. ज्याला समर्थपणे ओलांडण्यासाठी मला उभारायला हवाय ज्ञानाचा मजबूत पूल.

समाजातील आताच्या वाऱ्यांमागे भूतकालीन कटिबंधाची कारणे असतात. निव्वळ आताचे वारे प्रमाण मानून त्यांच्या दिशेत जहाज हाकारणं योग्य होणार नाही.

थोडावेळ थांबावे लागले तरी चालेल; पण हा आवश्यक अभ्यास मला केलाच पाहिजे.

२४ सप्टेंबर १९८५

संध्याकाळी परळला आमच्या डी. एड. कॉलेजवर गेलो. स्त्री मुक्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांना द्यावयाच्या निवेदनावर सह्यांची मोहीम सुरु केली आहे. त्यातील काही फॉर्म घेऊन गेलो. प्राचार्यांनी सहकार्य केलं तर एकदम १०० सह्या मिळतील हा विचार होता. शिवाय डी. एड. म्हणजे स्त्रियांचाच भरणा. ही चळवळ त्यांच्यापर्यंत नेण्याची संधी मिळेल, ही आशा होती.

प्राचार्यांनी ‘सत्कार्याला नेहमी सहकार्य करु’ अशा शब्दांनी दिलासा दिलाच. शिवाय एखाद्या शनिवारी माझं ‘स्त्री मुक्ती’ वर व्याख्यान आयोजित करण्याचीही मनीषा त्यांनी बोलून दाखवली.

सरांनी त्याआधी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने माझी बरीच उलट तपासणी केली.

सरांकडूनच ‘सेवासदन’ व ‘विनिता विनयालय’ या डी. एड. कॉलेजांचा पत्ता घेतला. सुरुवात चांगली झाली म्हटल्यावर इतर ठिकाणी नकार मिळेलसे वाटत नाही.

कॉलेजमध्ये नंतर माझ्या शिक्षकांची भेट घेतली. महानगरपालिकेच्या शिक्षकांसाठीच्या मुलाखतीला मी न जाणं शिरोडकर सरांना आवडलं नाही. संस्थेच्या शाळा असल्याने आपलं स्वातंत्र्य राहतंच असं नाही. इतर काही करायला संधी मिळत नाही. वरिष्ठांशी पटतंच असं नाही. असा शिरोरडकर सरांचा विचार. बी.एम.सी.त अधिक वेळ, मोकळीक, कमी कष्ट असे त्यांना वाटते. खरेबाई, अमृतेबाई यांची मते मात्र मला अनुकूल होती.

आजच गणेशोत्सवानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कॉलेजचाही कार्यक्रम होता. यातील ‘महाराष्ट्र दर्शन’ संजयनेच डायरेक्ट केले. अमृतेबाईंच्या घरी मी व संजय गेलो होतो. तेव्हाच त्यांनी संजयला विनंती केली होती.

डी. एड. च्या मुला-मुलींची रेलचेल पाहून आमचे दिवस आठवले. स्थिर झालो. प्रवाह सुरु होता. हा काळ म्हणजे धबधबा. कोसळल्यानंतर किती प्रचंड वेगाने इतस्ततः होतात सगळे...!

जाऊदे.

.....

...कोणताही धर्म न घेता तुम्हाला फक्त माणूस म्हणून कायद्याने राहता येत नसेल तर मात्र एकमेव पर्याय ठरु शकतो तो म्हणजे बौद्ध धर्म. जात-धर्म न लावता जर राहता येत असेल तर मी यापुढे तेच करीन. नाही तरी धर्म या प्रकाराखाली नाईलाजानेच बौद्ध धर्म येत होता. जगात प्रत्येकाला मानव म्हणून राहता आले पाहिजे. ‘बौद्ध’ ही त्याची विचार-आचारसरणी. तो त्याचा धर्म नव्हे.

२६ सप्टेंबर १९८५

आयुष्यात भावनांचे पूर येणारे ओढे कोरडे झालेलेही बघण्याचे प्रसंग येतात. आता सवय झालीय म्हणून काही विशेष वाटत नाही. परंतु, सुरुवातीला भरतीनंतरची कल्पनातीत ओहोटी अत्यंत यातनादायी ठरली.

एखादी वस्तू भूतकाळात आपल्याला उपयोगी पडली असेल. पण आता ती काहीच कामाची नसेल तर त्या वस्तूबद्दल वाटणारे ‘मूल्य’ निश्चितच कमी असेल. भावना गौण ठरते. व्यवहार श्रेष्ठ होतो.

निर्जीव वस्तूबद्दल हे ठीक. परंतु, माणसांबद्दल हाच दृष्टिकोण ठेवायचा का? ‘सद्यउपयुक्तता’ हाच निकष त्यांनाही लावायचा का?

…प्रामाणिक वाटणारेही कर्जबुडवे निघताहेत.

२८ सप्टेंबर १९८५

पौर्णिमेचं पिठूर चांदणं पडलंय. काही झालं तरी या काँक्रिटच्या जंगलातही मला चांदणं जाणवल्याशिवाय राहत नाही.

पौर्णिमेला मला फार भारलेपण येतं. सारी सृष्टीच रंध्रारंध्रातून धुंद पाव्याचे सूर स्रवत असते.

२२ ऑक्टोबर १९८५

आज दसऱ्याला साने गुरुजी मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा होता. लेफ्टनंट जनरल अरोरा प्रमुख पाहुणे होते. मी-लहू गेलो होतो. आर.एस.एस.चा जाहीर कार्यक्रम कसा होतो, नियोजन कसे असते हे पाहणे हा मुख्य उद्देश.

संचलन व नियोजन अगदी उत्कृष्ट. शिस्त हा प्रकार अगदी नेटका. फाफटपसारा नाही. घोषणांच्या आरोळ्या, गदारोळ नाही. सारं काही सुटसुटीत.

आर.एस.एस. ‘जातियता’ नष्ट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आता कार्यरत होणार आहे, असे स्पष्ट झाले. पण ही जातियता कोणत्या मार्गाने, कोणत्या कार्यक्रमाने नष्ट होणार हे स्पष्ट झाले नाही.

तेथून चैत्यभूमीवर ‘भारतीय बौद्ध महासभे’च्या जाहीर सभेला आलो. जेमतेम १०० लोक असतील. मिराताई आंबेडकर प्रमुख पाहुण्या. संस्थेच्या अध्यक्षच पाहुण्या हे कसे? म्हणजे घरातलीच व्यक्ती पाहुणी!

तिथून ‘शिवतीर्था’वर शिवसेनेची सभा ऐकायला गेलो. तेच उलटसुलट कोलांट्यांचे बाळासाहेबांचे भाषण.

.....

अशोक बी.एम.सी.च्या शाळेत लागला. मला कॉल येऊनही मी गेलो नाही. बऱ्याच जणांनी मला मूर्खात काढले. घरीही वडील तसेच इतर मंडळी संतापली.

१४ नोव्हेंबर १९८५

भाऊबीजेला कविता वहिनींनी ओवाळले. लहूने न् मी दोघांनी एक पुस्तक भेट दिलं - ‘मी तरुणी – छाया दातार’

१६ नोव्हेंबर १९८५

खरं तर जगातला प्रत्येक माणूस मूलतः चांगला असतो. विशिष्ट परिस्थितीशी त्याच्या वृत्तीच्या जुळणाऱ्या तारा कशा झंकारतात यावर त्याचे चांगले-वाईट व्यक्तिमत्व ठरते. वध करणाऱ्या मारेकऱ्यांना ईश्वराने क्षमा करावी म्हणून विनवणारा येशू, करुणेचा महासागर डोळ्यांत साठवून विश्वातील प्राणिमात्रांशी मैत्री साधू पाहणारा बुद्ध ही या पृथ्वीवरील माणसांची खरी रुपं आहेत.

सब्बे सत्ता सुखि होन्तु. सारे जग सुखी होऊ दे. माझे शत्रूत्व कोणाशी असावेच का?

२२ नोव्हेंबर १९८५

ताई-अविचे आज रजिस्टर्ड लग्न झाले.

‘वसंत बहार’ ग्रुपमधील एक प्रकरण इथवर पोचलं.

(आधीच आंतरधर्मीय लग्न म्हणून घरच्यांचा विरोध. त्यात लग्न कोणत्या पद्धतीने व्हावे यावरुन मी उत्पात माजवला होता. त्यावरुन आमच्यात तीव्र ताण तयार झाले होते. दोघांचे धर्म भिन्न. त्यातील बौद्ध कुणी नाही. तरी ते पुरोगामी विचारांचे म्हणून लग्न बौद्ध पद्धतीनेच व्हावे हा माझा अति अट्टाहास होता. तसे होणार नसेल तर रजिस्टर्ड लग्न हा पर्याय मी मान्य करणार होतो.)

अवि परीक्षा देऊन आला होता. सुभाष बाभूळकर, दया हिवराळे, भालचंद्र आपटे, रमेश, लहू, संजय व ज्योती श्रीवास्तव असे इतर बरोबर होते.

ज्योती, दया व सुभाष यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. लहू, मी व संजय २१ वर्षे पूर्ण नसल्याने त्यास पात्र नव्हतो.

ताईला कार्यालयाच्या बाहेर आल्यावर रडू कोसळलं. ज्योतीने तिला बाजूला नेलं. मी जवळ गेलो तर मला एकदम बिलगली व अधिकच रडू लागली. मलाही भरुन आलं होतं. पण सावरलं.

हॉटेलमध्ये अविने सगळ्यांना खायला घातले. नंतर आझाद मैदानात आम्ही थोडा वेळ बसलो. नंतर स्टेशनवर ताईला-ज्योतीला पोहोचवून अवि दया आदी मित्रांबरोबर होस्टेलला गेला.

लग्न हा प्रकार अशातऱ्हेने व्हावयास नको होता. अविचे अजून पेपर चालू आहेत. लग्न झाल्यावरही ती दोघं वेगळी...

२७ तारखेला रिसेप्शन झाल्यावर ती दोघं एकत्र येणार बहुतेक.

ताईच्या घरचे लोक प्रतिष्ठा जपण्यासाठी हे रिसेप्शन करु इच्छिताहेत.

.....

वसंत बहारच्या घटकांची तशी वाताहतच झाली. मुख्यतः मानसिक. ..आणि त्यामुळे नातेसंबंधांत.

मी या सगळ्यातून निभावलो आहे. निभावलो म्हणण्यापेक्षा बराच तयार झालो आहे. मला या सर्व यातनांनी घडवायला मदतच केली. मी अगदी सरळ उभा राहू शकलो. आता सगळ्यांकडे व्यवस्थित बघू शकतो. वसंत बहारने माझ्या व्यक्तित्वाला धार आणली. तेज आणले.

२४ नोव्हेंबर १९८५

सकाळपासून ताई-अविच्या रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिका वाटत होतो. सोबत अशोक होता.

मध्ये अशोक दुसरीकडे गेला. त्यावेळी मी ‘विद्यालक्ष्मी’वर गेलो. नूतन भेटली. तिला पत्रिका दिली. ज्योतीने दिलेले ब्लाऊज ताईला पोहोचवण्यासाठी नूतनला सांगितले. ती पत्ता माहीत नाही म्हणाली. मी म्हणालो, “चल, लांबून घर दाखवतो.” ती थोडा वेळ विचार करत राहिली. नंतर तयार झाली. घराजवळ आलो तर तिने मलाच वर चलण्याचा आग्रह केला. गेलो. तिथे अवि-सुभाष भेटले. आम्ही सगळे खाली आलो. नूतनने मला पोचवायला येण्यास भाग पाडले. म्हणाली, “मला भीती वाटते.” दिवसाढवळ्या दादरला भीती वाटते म्हणजे कमालच झाली!

अशोक वाटेत भेटला. मला शोधतच होता. मध्ये आम्हाला अप्पू, चिमी भेटली. तिथेच आम्ही थांबलो. नूतन गेली पुढे. त्यांना पत्रिका देऊन आम्ही कोळीवाड्याला स्मिता कांदळगावकरकडे गेलो. तिथून सुभाष सोनवणे, नंतर उपेंद्र खैरे, पुण्यप्रभा शेट्ये, सुरेखा देशिंगकर यांना भेटून वांद्र्याला गेलो.

अमृतेबाई बसमधून आम्ही उतरताना चढत होत्या. तेवढ्यात त्यांना निरोप दिला. गव्हर्नमेंट कॉलनीत सुरेंद्रकडे गेलो. नंतर दादरला परत जाऊन ताईकडून आणखी पत्रिका घेतल्या. कमी पडत होत्या.

ताई म्हणाली – “नूतन तुझी स्तुती करत होती. माझा भाऊ सुरेश चांगला आहे.”

तिच्याशी काही गोष्टी बोलायच्या होत्या. ताई बोलेल असे वाटल्याने मी तिची इतर वास्तपुस्त करत राहिलो. ताईही बोलू शकली नाही आणि मीही नाही. बहुधा त्यामुळेच ‘चांगला भाऊ’ ठरलो.

ताईकडून विक्रोळीला भरत मोरेच्या घरी गेलो. तो नव्हता. त्याच्यासाठी तसेच अशोक हिरेसाठीच्या पत्रिका घरच्यांजवळ दिल्या. नंतर जीवक गायकवाडच्या घरी गेलो. त्याने जेवायला घातले. काळेला भेटलो. मग घरी आलो.

पायाला भिंगरी लावून आम्ही फिरत होतो.

मध्ये चारु (चारुशीला मांजरेकर) कडे गेलो ते सांगायचे राहून गेलं.

सुरेखा देशिंगकर एक वर्ष सिनिअर आम्हाला. त्यांच्या निरोप समारंभाला तिने कधीकाळी तिच्या डब्यातलं मी खाल्ल्याची आठवण करुन दिली होती. त्यावेळी तिने घरी येण्याचं आमंत्रणही दिलं होतं. मी कबूल केलं होतं. पण नव्हतो गेलो. आज पत्रिकेच्या निमित्ताने आकस्मिकरित्या जाणं झालं.

चहा आईने दिला. ती फक्त एका जागी उभी होती. आम्ही जाताना बाहेर व्हरांड्यात आली. जिना उतरताना हात हलवून तिचा निरोप घेतला. रस्त्यावर आल्यावर वर पाहावेसे वाटत होते. नाही पाहिले.

एक संवेदनशील मुलगी होती ती. तिच्या संबंधातले छोटे-छोटे प्रसंग आठवत राहिले.

२७ नोव्हेंबर १९८५

अखेर ताई-अविचं रिसेप्शन झालं.

जुने चेहरे आले. तोंडदेखले बोलले. हसले. तिऱ्हाईतासारखे निघूनही गेले.

ताईच्या घरचे मिरवत होते. व्हिडिओ शुटिंगसाठी प्रत्येकजण कॅमेऱ्यापुढे येण्यास झपाटलेला.

ज्योती श्रीवास्तव नाही आली.

‘स्त्रीमुक्ती’ तर्फे भारती, नीला आल्या होत्या.

सबंध कार्यक्रम होईपर्यंत मी ‘आनंदी’ अभिनय वठवला. संपल्यानंतर मात्र डोकं बरंच ठणकू लागलं.

बाहेर पौर्णिमेचा हिवाळी चंद्र मस्त पाझरतोय. हा चंद्र सर्वस्वी आपला आहे. हे चांदणं आपलं आहे. धूसरता आपली आहे.

६ जानेवारी १९८६

चार तारखेला बबनच्या ‘उद्गार’ कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. ताई आली होती.

कार्यक्रम सुरु असतानाच आम्ही दोघं उठून खाली येऊन बोलत बसलो.

दोघंही आनंदात आहोत, असं ती म्हणाली.

ताई पहिल्याहून आता वेगळी वाटली.

१७ फेब्रुवारी १९८६

शनिवार-रविवार आम्हा शिक्षकांची बोर्डीला सहल गेली होती. काल रात्री परतलो.

डी. एड. काळातली बोर्डी तशी या सहलीत बोचली नाही.

गुरुवार-शुक्रवार शाळेत स्नेहसंमेलन होतं. माझ्यावर ‘विजय निकेतन’ ची जबाबदारी होती. त्याच्या वतीने ‘महाराष्ट्र दर्शन’ हा कार्यक्रम संजयकडूनच बसवला होता. छानच झाला. दुसऱ्या दिवसासाठी संपूर्ण कार्यक्रम पाहुण्यांना दाखवण्यासाठी निवडला गेला. माझ्या निवेदनाचंही बरंच कौतुक झालं. मॅनेजमेंटच्या लोकांच्या मनातही माझी एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. कोठेकर सरांनी तर टी. व्ही. वर निवेदकासाठी अर्ज करण्यास सांगितले.

संजयमध्ये कलागुणांचा एवढा विकास झाला असेल असे वाटले नव्हते. त्याच्यासारख्यांचा समाजाला उपयोग ‘कलापथका’सारख्या प्रकारातून होऊ शकेल. प्रचाराचे ते एक प्रभावी साधन आहे.

१९ फेब्रुवारी १९८६

साहित्यिक मित्र त्याच्या साहित्यिक-संशोधक मित्राला संदर्भासाठी उद्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ हवा आहे. तो आताच्या आता तू दे. तेवढ्यासाठीच मी आज आलोय, असे म्हणाला.

मी लगेच पुस्तक घरुन घेऊन आलो. पण डोक्यात भयंकर सणक भरली होती.

ही साहित्यिक मंडळी बाबासाहेबांच्या विचारांची अत्यंत अभिमानी लोकं. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ जवळ ठेवू शकत नाहीत, ही नामुष्कीची गोष्ट आहे. प्रत्येक बौद्ध कुटुंबात हा ग्रंथ असलाच पाहिजे. ज्यांनी आदर्श दाखवायचा त्या सुशिक्षित, पुढारलेल्या, समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकांची ही गत. परिस्थिती अत्यंत नाजूक की हे पुस्तकही विकत घेता येऊ नये अशी असेल तर ठीक आहे. किंवा पुस्तक मागणारी व्यक्ती इतर समाजाची असती तरी ठीक होते.

पुस्तक आणलं होतं. पण न देता मित्राला म्हटलं, “मी नाही देत. ठरलं माझं. मी का नाही देत हे तू लक्षात घे. जर त्याला गरज आहे, तर उद्या सकाळी दादरला निमजीभाईच्या दुकानातून घे म्हणावं. माझा तत्त्वामुळे पुस्तक द्यायला नकार आहे.”

मित्र फारच दुखावला. मला पर्वा नव्हती. तत्त्वकठोरता, तीही प्रसंगोचित, माझ्यात ठासून भरलेली आहे. संबंध कायमचे दुरावले तरी मी त्याची पर्वा करत नाही. ताईच्या बाबतीत मी जी कठोरता दाखवली, ती खरंच भयंकर होती. ताईबाबत मी जर कठोर होऊ शकतो, तर इतरांबद्दल का नाही?

शेवटी जाता जाता मित्र बोलला – “तो गरीब आहे. एकट्याच्या पगारात खाणारी तोंडं अनेक आहेत. तो एवढ्या ६० रु. किमतीचं पुस्तक घेऊ शकत नाही.”

मी तत्क्षणी म्हणालो – “तो गरीब आहे ना! हे घे पुस्तक. ज्यांची बिल्कुल ऐपत नाही, अशांना मी नेहमीच मदत करीन.”

मित्राने पुस्तक घेतले.

पुस्तक घेण्याची ऐपत त्या संशोधक साहित्यिक मित्राची नसावी, हे मत मला बिल्कुल पटत नाही. पण माझा मित्र बोलला ना स्वतःच्या तोंडाने तो गरीब आहे म्हणून! प्रश्न मिटला.

२७ फेब्रुवारी १९८६

प्रकाश-आनंदला मी व संदीप भेटलो. निवडणुकीनंतरची ही पहिलीच भेट. त्यामुळे बरंच काही विचारायचं होतं. आमच्या ग्रुपचा किमान प्रकाश तरी निवडून आला, याचे खूप समाधान आहे.

बौद्धजन पंचायत समितीच्या इतिहासातली ‘तळवटकर पराभवाची’ ही आत्यंतिक कलाटणीची घटना. परंतु आता ज्यांच्या हाती कारभार जाणार आहे, तेही मला विश्वासार्ह वाटत नाहीत. विरोधी पॅनेल अंतर्गतच अनेक पॅनेल्स आहेत.

आनंदच्या पराभवाचं मी केलेलं विश्लेषण बरोबर आहेसं वाटतंय. प्रकाश आंबेडकरांच्या पाठिंब्याचा स्पष्ट उल्लेख अथवा पत्रक लोकांना प्रचारावेळी दाखवायला नको होतं. प्रकाश आंबेडकरांच्या भारतीय बौद्ध महासभेच्या पंचायत उखडून त्या जागी झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील स्थापनेचा पंचायतीच्या शाखा पदाधिकाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. पंचायत समितीमध्ये या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आपले पॅनेल घुसवून निवडून आणून ती बरखास्त करणार आहेत, असा सत्ताधाऱ्यांनी प्रचार चालवला. लोकांना पंचायत चालवणारे लोक कसे का असेनात, पण पंचायत टिकणे महत्वाचे वाटले.

५७ पैकी विरोधी पॅनेलचे २० जण, ७ अपक्ष व उरलेले सत्ताधारी गटाचे आले. परंतु सभापती व उपसभापती यांच्या निवडणुकीवेळी ३ उमेदवार फोडण्यात विरोधकांना यश आले. तळवटकरांना हा मोठाच हादरा आहे. निवडून आलेले देवकेकर हे पी. एच. डी. झालेले आहेत, म्हणूनच त्यांना उभे केले गेले. बाकी त्यांचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाला काहीच देणे नाही.

ही निवडणूक तशी अचानकच मला समजली. धम्म प्रसार प्रबोधिनीतल्यांना उभे करता येण्याची तयारी करता आली नाही. शिवाय अनुभवही नव्हता.

राजा जाधव, एस. एम. पवार यांनी मला उभे राहायला खूप आग्रह केला. मी तयारही झालो. पण वयाचा प्रश्न होता. तेव्हा २१ वर्षे नुकतीच पूर्ण होत होती. शिवाय उमेदवार पंचायत समितीचा सभासद होऊन पाच वर्षे पूर्ण झालेला हवा. १८ वर्षांनंतर सभासद होता येते. त्यानंतर पाच वर्षे म्हणजे वयाची २३ वर्षे पूर्ण हवीत निवडणुकीला उभे राहण्यासाठी.

एस. एम. पवारांना ही बाब सांगितली. ते म्हणाले, “बिनधास्त! बघूया आपण काहीतरी.”

त्यांच्या म्हणण्याखातर संजय सकपाळने आपल्या शाखेत मला सभासद करुन घेतले. पाच वर्षांची पावती बनवली. मी पात्र झालो.

परंतु, डोक्यात उलटसुलट चक्रे फिरत होती. मध्यंतरी ज्या विरोधी पॅनेलच्या बैठका झाल्या, त्यातून एस. एम. पवार वगैरेंची व्यक्तिमत्वं बरीच स्पष्ट झाली. सत्ता हे यांचं मुख्य ध्येय. धम्म ही दुय्यम बाब. मी सत्तेत शिरु पाहत होतो धम्म पसरवण्यासाठी. पण तिथे शिरल्यानंतर या आताच्या मित्रांशी झगडण्याची वेळ येणार हे स्पष्ट दिसू लागलं. तशी वेळ आली तर ज्यांनी मला खोटी पात्रता मिळवायला मदत केली, तेच माझी अंडीपिल्ली बाहेर काढायला मागेपुढे पाहणार नाहीत. कदाचित नंतर मी बदनामीमुळे कधीच पंचायतीच्या निवडणुकीला उभा राहू शकणार नाही.

एस. एम. पवारांना नंतर मी स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी मला डरपोक ठरवले. मी ही ‘डरपोकगिरी’ मान्य केली.

नुकत्याच झालेल्या विजेत्या विरोधी उमेदवारांची गुप्त बैठक झाली. कार्यकारिणी संदर्भात. प्रकाश कांबळेचं धार्मिक तसेच शैक्षणिक समितीसाठी राजा जाधव यांनी नाव सुचवले. परंतु, या समितीसाठी अभ्यासू व पदवीधर व्यक्ती असायला हवी असे वि. ल. मोहिते यांनी हरकतीचे मुद्दे उपस्थित केले. एस. एम. नी सुद्धा प्रकाशला पाठिंबा दिला नाही.

तालुक्याच्या एकीकरणाच्या सभांत याच वि. ल. मोहिते यांच्याशी आमचे वाद झालेत. त्यांच्या दृष्टीतही ‘धम्म’ ही बाब दुय्यम होती. प्रकाशला त्यांनी केलेला विरोध हा धम्म प्रसार प्रबोधिनीला विरोध होता.

आज बोलताना धम्म प्रसार प्रबोधिनी जोरात कार्यरत करण्याचे ठरले. मध्ये गती थंडावण्याचे कारण आनंदच्या मते पदाधिकारी न नेमणे. प्रकाशच्या मते कुणीच आपली जबाबदारी उचलली नाही. मी यावर मत मांडले नाही. फक्त ‘कलापथक’ ही कल्पना मांडली.

प्रकाश व आनंदने ती उचलून धरली. त्या दिशेने प्रयत्न सुरु करायचे ठरले.

२ मार्च १९८६

आज भाऊंना भेटलो. ही भेट बऱ्याच मध्यंतरानंतर.

भाऊंच्या दृष्टीने मी उदासीन होत चाललोय; किंवा मनात गोंधळ असावा.

उदासीनता नाही. परंतु गोंधळ निश्चित. संपूर्ण जगाच्या संदर्भात स्वतःला, स्वतःच्या समाजाला शोधण्यातच गोंधळ आहे.

भाऊ अत्यंत प्रामाणिकपणे व चिकाटीने एखाद्या प्रश्नाला भिडतात. ही प्रामाणिकता व मोकळेपणाच मुळात मला आकर्षित करण्यास कारण आहे. कोणत्याही प्रश्नाचा समग्र विचार करण्याची भाऊंची तयारी असते.

भाऊ मार्क्सवादी. मार्क्सवादाने होणाऱ्या हानीची तीव्रता फायद्यापेक्षा अधिक अजून तरी मला जाणवली नाही. मार्क्सचा, बुद्धाचा संबंध चळवळीत नेमका काय? कुठे? हे सारं माझं ठरायचं आहे. परंतु सर्वांच्या हिताचे प्रश्न सगळ्यांना मान्य होईल अशारीतीने हाती घेता येतील. त्यासाठी नेमका एखादा ‘इझम’ पूर्ण समजण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. भाऊंकडून मार्क्स सुस्पष्ट समजण्याची शक्यता आहे. ते तो लादत नाहीत. उद्या मी मार्क्सविरोधी होईन अथवा समर्थक होईन. भाऊंची प्रतिमा मात्र मनात तीच राहील.

२९ मार्च १९८६

‘प्यासा’ पाहिला.

लागेल तेव्हा बघतो. पुन्हा पुन्हा.

स्वतःचं प्रतिबिंब पाहायला माणसाला खूप आवडतं.

‘जला दो, जला दो, फूँक डालो ये दुनिया’ म्हणणारा गुरुदत्त रंध्रारंध्रात पेटून उठतो.

गुरुदत्तची ‘प्यास’ बहुजन समाजातील सजग युवकाची प्यास आहे. सगळ्या उदात्त स्वप्नांची, वृत्तींची राख व्हायला कारण कोण?

नकार देणारी प्रेयसी? सभोवतालची माणसं?

नाही. ही सारी निमित्तमात्र.

प्यासा सुरुवातीला पाहिला तेव्हा मात्र हेच खरं वाटलं होतं. नंतर प्यासा नव्या नव्या पैलूंनी दृश्यमान होऊ लागला.

गुरुदत्तला कोणा व्यक्तीविषयी शिकायत नाही. आहे ती इथल्या समाजाच्या ‘ढाँचा’ बद्दल. व्यवस्थेबद्दल. ही व्यवस्था या सर्व घटनांना कारण आहे.

माणसाचे माणूसपण छिनणारी ही व्यवस्था मोडली तर गुरुदत्त ‘प्यासा’ राहणार नाही.

गरीबीतून तेजाळणारा ‘अमिताभ’ आवडतो. पण आत रुतून बसत नाही. तो साथी वाटत नाही. हा अमिताभ स्वसामर्थ्यावर पैसा, प्रतिष्ठा मिळवतो. दारिद्र्यात भोगलेल्या दुःखाचे उट्टे काढतो. पण ही ‘व्यवस्था’ बदलावी असे म्हणत नाही. पीडित युवकाने अमिताभसारखे स्टंट करावेत नि परिस्थिती सुधारावी, असे सामर्थ्य सगळ्या युवकांत कसे येईल?

असे श्रीमंत अथवा सुधारले जाणे म्हणजे फक्त वर्ग बदलणे होईल. वर्ग नाहीसे करणे नाही.

बोर्डीला सहलीला गेलो असताना रामुगडे सर पवार सरांना म्हणाले होते, “क्लासेस, ट्युशन्स करा. सकाळपासून रात्रीपर्यंत. महिन्याला पगाराव्यतिरिक्त दोन हजार शिलकीत पडले पाहिजेत.”

पवार सर माझ्याबरोबरच या वर्षी लागलेत. ते बी.एस.सी. बी.एड. आहेत. मुंबईत तसे ते एकटेच. स्वतःचे घर नाही. घर, कुटुंब करायचं. चार काँक्रिटच्या भिंतीतले पांढरपेशी आयुष्य मिळवायचं झालं तर दोन हजार महिन्याला शिलकीत पडूनही कमी पडतील.

रामुगडे सरांचा सल्ला चुकीचा होता का?

नाही.

पण घर, कुटुंब यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत कामच करायचं का? ज्या कामातून सार्थ असं काहीच निर्माण होत नाही.

जीवनातले तारुण्याचे क्षण हे मिळवण्याचे दिवस असतात. पण फक्त पैसा एवढाच याचा अर्थ आहे का?

जे तरुण शिक्षक नाहीत, क्लासेस करु शकत नाहीत, अशांना घर, कुटुंब यांची स्वप्नेसुद्धा स्वस्त दराची असावीत. आणि जे नोकरीलाच नाहीत, अशांनी स्वप्ने पाहणे हे तर महापाप..!

आज ट्युशन क्लासेसना ऊत आलाय. हे क्लासवाले सुद्धा ढोर मेहनत करतात. यांचा दिवसातला प्रत्येक क्षण क्लास अधिक पॉप्युलर कसा होईल, याच विचाराने घेरलेला.

पालकांनाही मुलगा क्लासला गेला की कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.

मुलाचा कोणता फायदा यातून होतो?

माझ्यापुढे हाच प्रश्न उभा आहे. मी क्लासेस चालवून काय साधणार?

पैसा. चार-दोन विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीत भर.

बस्स! एवढंच.

मात्र मी माझा ‘वेळ’ घालवणार. जे मिळवायचं ते बाजूलाच राहणार. मी किती ‘बिझी’ आहे, असं भासवत स्वतःच्या अकर्तृत्वाचं समर्थन करत राहणार.

अगदी नकळत मी वरच्या वर्गात जाणार.

स्वसामर्थ्यावर पैसा मिळवून कुटुंब, नातलग या मर्यादेतच लोकांचे कल्याण होईल. पण इथल्या सामान्य तळातल्या युवकांचं काय?

त्याच्याजवळ हे सामर्थ्य नाही. हा त्याचा दोष आहे?

स्वसामर्थ्यावरच पैसा मिळवता येतो, हे जर खरं असतं तरी मला मान्य होतं. परंतु असं नाही. स्वसामर्थ्य नसलेले, पिढीजात शोषक इथे आहेत. जे कर्तृत्वशून्य असूनही ऐश करतात.

जगातल्या उत्पादन साधनांची मालकी जेव्हा सामूहिक होईल, तेव्हा कोणालाही ढोर मेहनत करावी लागणार नाही. कमी मेहनतीतही सर्वांना पुरेसे मिळेल.

ही ‘रचना’ हाच मोठा दुष्मन आहे. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत, हेच मुख्य काम. स्वतःसाठी पांढरपेशी ‘घर’ तयार करण्यासाठी ‘रचने’चे गुलाम होऊन पैसा मिळवण्यात अहोरात्र मेहनत, हे व्यर्थ आहे. उलट ‘रचना’ बळकट करण्याचे ते महापाप आहे.

२३ एप्रिल १९८६

परीक्षा संपली. मोठं टेन्शन गेलं. आता उद्देशाप्रत जाण्याच्या वाटचालीच्या विचारांची डोक्यात उलथापालथ आहे. प्रश्न अनेक आहेत. उत्तरे सोडविण्याची रीत सापडत नाही.

यानंतर आयुष्याची जेमतेम ३० वर्षे मिळतील असे गृहीत धरुन हा विचार करतोय. या काळाचा पुरेपूर फायदा करुन घेतला पाहिजे.

देशाचा हा काळच असा उदासीन, गोंधळाचा वाटतोय. कोणतेच आंदोलन मूळ धरत नाहीये. समाज ढवळून निघेल अशी चेतना कुठेच आढळत नाही. जागतिक संदर्भात इथला अगदी लहान समाज घटक कसा हलवावा, याचे निश्चित उत्तर मला उलगडत नाही.

‘मानवमुक्ती’ हा उद्देश धरला तर येथील विविध समाज घटकांमधील कोणत्या समान प्रश्नांवर आंदोलन उभारता येईल?

२४ जून १९८६

गावाकडचे दिवस बरीच प्रतिष्ठा देऊन गेले. त्या विभागातल्या अग्रणी कार्यकर्त्यांत मला स्थान मिळाले. इकडे आल्यापासून मनाची घालमेल वाढली. गावात जो प्राकृतिक आनंद आहे, तो इथे नाही. ‘का’ मनात थैमानतोय.

शाळा आता माझ्या मनाच्या पूर्ण आवाक्यात आहे. मानसिकदृष्ट्या शाळा काहीच त्रास देत नाही. माझ्या तासाची नवीन मुलांना आल्या आल्या लागणारी ओढ आगळं शिक्षकी समाधान देऊन जाते.

२५ जून १९८६

स्त्री मुक्ती संघटनेत मुली व मुलगे आहेत. त्यांच्यातच लग्नं जमली तर फार बरे, असा भाऊंचा विचार. मिलिंद-अश्विनीच्या लग्नात ते आमच्याशी पहिल्यांदा यासंबंधी बोलले. मलाही हा विचार पटला. त्यानंतर मी मांडलेल्या एका मुद्द्याशी भाऊही सहमत झाले. ‘टू रुम’ किंवा ‘वन रुम’ मधली मुलगी एकदम झोपडीत येणं कठीण.

लग्नाचा विचार निश्चित रुप धारण करत नाही. एक मात्र खरं. आकर्षण क्षेत्रात येणाऱ्या मुलींबद्दल भावनात्मक आनंद फार काळ मनात टिकत नाही. व्यावहारिकतेवरच त्या मुलीचे मापन सुरु होते.

शाळेत या वर्षी मला क्लासटीचरशिप नाही. परंतु, इतर अनेक व्याप मागे आहेत. अर्थात हे व्याप माझ्या इंटरेस्टचे आहेत. गेल्या वर्षीच्या माझ्या बहिःशालेय उपक्रमांतल्या चमकेमुळेच या वर्षी मला वर्ग व विषय यांत सवलत दिली, हे निःसंशय. शाळेतील माझ्या लोकप्रियतेला हे सर्व पोषकच.

१३ ऑगस्ट १९८६

अनेक शक्यता गृहीत असतानाही त्यांहून भिन्न, आकस्मिक घडते. काल झालं. अंतर्बाह्य डहुळलोय. ओठाशी येता येता खेचलं जाणं नवं नाही. पण याचा घाटच निराळा. म्हणूनच तर उचल खाल्ली. इतकं सारं होऊनही; ठरवूनही.

मागच्या दैनंदिनी काढल्या. हा एक आधार शोधण्याच प्रकार. ‘मीना’लाही काही काळ भेटलो.

पुनर्विचार.

प्रत्येक वादळानंतर, वावटळीनंतर पुनर्विचार:

‘यानंतर पूर्ण एकट्याने...’

अयशस्वीतेइतकी या क्षेत्रात दुसऱ्या कशाचीच खात्री नाही मला. ‘शाप’ हा प्रकार दृश्यमान होत असताही माझा दैवास नकार. हे अजब.

उद्या परवा भळभळ कमी होईल.

आता फक्त मुकाट दात गच्च आवळून सोसणे...

१८ सप्टेंबर १९८६

काल गावावरुन आलो. ७ दिवस होतो. बौद्ध युवा मंच आणि भावकी यांच्यात आलेली तेढ दूर करण्यासाठी गेलो होतो. काम झाले.

निसर्गाची ही विलोभनीय अवस्था पहिल्यांदाच पाहिली. या काळात पूर्वी कधीच गावी गेलो नव्हतो.

३ जानेवारी १९८७

२५ डिसेंबरला तिचं लग्न झालं.

त्यावेळी मी विदर्भात स्त्री मुक्ती संघटनेच्या दौऱ्यावर होतो. इकडे लग्न सोहळा सुरु असताना मी संघटनेच्या ‘हुंडा नको ग बाई’ नाटकाच्या प्रयोगात काम करत होतो.

ती लग्नपत्रिका द्यायला घरी आली होती. मी भेटलो नाही.

५ सप्टेंबर १९८७

भाऊंच्या सहवासात आल्यापास्नं माझ्यात खूपच बदल होऊ लागला आहे. सर्वच पातळ्यांवर. या बदलांची नोंद वेळच्या वेळी झाली असती तर माझी घडण व तिचा क्रम स्पष्ट व्हायला मदत झाली असती.

२ ऑक्टोबर १९८७

स्त्री मुक्ती संघटनेच्या कोकण दौऱ्यावरुन परतलो. वाटेत चवदार तळ्यावर थांबलो. बसमध्ये मी सत्याग्रहाची माहिती दिली. गदगदत होतो. प्रत्यक्षात तळे पाहताच ढसढसा रडलो. शारदा मावशीने, आम्ही सर्वांनीच ‘जग बदल घालुनी घाव’ म्हटले.

बाबांना राजावाडी हॉस्पिटलला हलवले.

३ ऑक्टोबर १९८७

आज लेक्चरला गेलो. भाषाशास्त्र. उरकाउरकी सुरु आहे.

बाबांशी बोललोय हॉस्पिटलमध्ये शक्य तितके एकटे राहण्याचा प्रयत्न करा. त्यांना पटतेय. मी रोज संध्याकाळी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात दोन तास बसायचे ठरवतो आहे. असे केले नाही तर काही खरं नाही.

‘अश्वत्थामा. चिरंतन भळभळ...’ असं काहीतरी लिहावसं वाटलं. नाही लिहिलं.

सार्कची ७ राष्ट्रांची परिषद झाली.

१२ नोव्हेंबर १९८७

सुवर्णा भुजबळ व भारती परळकर शाळेत भेटायला आल्या होत्या. सुवर्णा म्हणाली – “तुझ्याशी खूप बोलायचं आहे.”

‘संवेदना’ संबंधी विद्याला म्हटलं, “पाटील सरांनी स्वतः पुढाकार घेऊन करायला हवं. आपण सुचवत राहावं. ते काही करत नाहीत तोवर शांत राहावं.”

भाऊंकडे गेलो होतो. भाऊ हॉस्पिटलमध्ये. फ्रॅक्चर. पाणी पिताना चक्कर येऊन पडले. ऑपरेशन व्यवस्थित. ‘आंबेडकर पुस्तक होळी’ प्रकरणीचा माझा लेख, या घटनेवरील प्रतिक्रिया, एम. ए. ची तयारी इ. बद्दल बोललो.

उद्या आम्हा एम. ए. च्या विद्यार्थ्यांची श्री. ना. पेंडसेंशी मराठी विभागाच्या वतीने चर्चा.

काल कोकण दौऱ्याचे रिपोर्टिंग बुधवारच्या दादर बैठकीत केले.

आज मुंबई मराठीवर अभ्यासाला बसलो होतो.


Read more »